'या' कठीण काळात जगाला हवे नवोन्मेषी नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:25 AM2020-08-20T03:25:51+5:302020-08-20T03:26:02+5:30

डिजिटल दरीचीही जोड मिळाल्याने नेतृत्वाच्या अपयशाचा व सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या असफलतेचे पूर्वसंकेत यातून मिळू लागले आहेत.

In these difficult times, the world needs innovative leadership | 'या' कठीण काळात जगाला हवे नवोन्मेषी नेतृत्व

'या' कठीण काळात जगाला हवे नवोन्मेषी नेतृत्व

Next

-डॉ. अश्वनी कुमार
कोरोनाने सुखचैनीला सरावलेल्या जगाला खडबडून जागे केले असून, संकटातही टिकाव धरण्याच्या मानवाच्या सामूहिक क्षमतेपुढेही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता समाजाच्या सामाईक भवितव्याविषयी काही मूलभूत प्रश्नही उभे ठाकलेत. जगात आधीपासूनच असलेल्या असमानतेत या महामारीने भर टाकली आहे. त्यास डिजिटल दरीचीही जोड मिळाल्याने नेतृत्वाच्या अपयशाचा व सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या असफलतेचे पूर्वसंकेत यातून मिळू लागले आहेत.
यामुळे बदलत्या काळानुरूप समर्थ नेतृत्वाची गरज पूर्वी कधीही नव्हती एवढी आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. मानवी मूल्यांच्या अविचल पायावर उभे राहून जे सर्वांसाठी आनंदी आणि सुरक्षित भविष्यकाळ घडवू शकेल, अशा नेतृत्वाची या घडीला इतिहासाला प्रतीक्षा आहे. थोर स्त्री-पुरुष आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवीत असतात, यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो; पण इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणांवर भविष्याला कलाटणी देण्यात योग्य नेतृत्वाचीच भूमिका केंद्रस्थानी असावी लागते, हे गत अनुभवाने सिद्ध झालेले सत्य आहे. विल ट्युरांट यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘राजकारण व उद्यमशीलता ही इतिहासाची फक्त चौकट असते. त्यात खरे प्राण नेतृत्वामुळेच फुंकले जातात.’ तसे ‘ए स्टडी ऑफ हिस्टरी’ या महान ग्रंथात अरनॉल्ड टॉयन्बी सांगतात की, संस्कृतींचा उदय व अस्त हा मानवी समाजापुढे वेळोवेळी आलेली संकटे व त्यांचा त्याने कसा मुकाबला केला, याचा इतिहास असतो. एखादे नेतृत्व उदयाला येण्यास जे संदर्भ असतात, ते त्या नेतृत्वाइतकेच महत्त्वाचे असतात.


या पार्श्वभूमीवर जगात सध्याचे चित्र भयानक व निराशाजनक आहे. लोकशाही मूल्यांचा -हास होत आहे. नीतिमूल्ये गुंडाळून केवळ सत्तेच्या जोरावर हेतू साध्य केले जात आहेत. लोकशाही संस्थांचे खच्चीकरण होत आहे. कठीण व अपरिहार्य निर्णयासाठी सर्वसंमती तयार करणे सोडून दिले जात आहे. यामुळे लोकशाही व्यवस्थेच्या जिवंतपणाविषयीच शंका निर्माण होऊ लागली आहे. जगापुढील सामाईक आव्हाने आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्याने सोडविण्याऐवजी संकुचित राष्ट्रवाद वरचढ ठरत आहे. सुरक्षेची गरज व नागरी हक्कांचे पावित्र्य यातील संतुलन बिघडत चालले आहे. फेक न्यूज व असत्य माहिती पसरविण्याचे पेव फुटले आहे. स्वत:ची अर्थव्यवस्था सावरणे जगाला कठीण झाले आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार होऊन त्यांचे सुमारे ३.४ खर्व डॉलर उत्पन्न बुडाले आहे. त्यातून सामाजिक असंतोष वाढीस लागत आहे. देशा-देशांतील वितुष्ट वाढत आहे. ही सर्व परिस्थिती सामाजिक अस्थिरता व राजकीय उलथापालथ यास पोषक ठरेल, असे आदर्श कॉकटेल आहे.
डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून नागरिकांच्या खासगी आयुष्यात शिरकाव वाढविण्याची सरकारांची प्रवृत्ती वाढीस लागल्याने कार्यक्षमता व नीतिमत्ता, तसेच सत्ता व मूल्ये यांचे संतुलन कोलमडून पडत आहे. मानव तंत्रज्ञानाने अधिक सक्षम झाला असला तरी डिजिटल विश्वातील असमानता, अल्गॉरिथम्सवर आधारित प्लॅटफॉर्म व व्यक्तिगत माहितीचे व्यापारीकरण याने त्याचा खासगीपणाचा मूलभूत अधिकार व मानवी प्रतिष्ठेपुढे गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा स्वनियंत्रित यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची सोय नसणे, सायबर सुरक्षेच्या बाबतीत जे लागू करता येतील असे जागतिक पातळीवर नीतीनियम नसणे, सायबर गुंडगिरीचा वाढता सुळसुळाट, सांप्रदायिक ध्रुवीकरण व त्यातून समाजमाध्यमांच्या मदतीने चिथावला जाणारा हिंसाचार यामुळे आताच्या हक्कांच्या विश्वात स्वातंत्र्य व प्रतिष्ठा कुंठित होत आहे. ‘डिजिटल कोड वॉर’ने नवा सैधांतिक संघर्ष उभा राहून जगात नवी फूट पडण्याची शक्यता आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या चौखूर उधळणाऱ्या वारुला लगाम घालण्याची शासन व्यवस्थेची क्षमता कमकुवत होत आहे.

डिजिटल विश्वाला तात्त्विक नीतिमूल्यांची बंधनकारक चौकट नसल्याने त्यांची जागा अल्गॉरिथम्स व रोबो घेत आहेत. यातून आपल्याला नेमके कसे जग भविष्यात हवे आहे, याचा निर्णय तातडीने करण्याची वेळ येणार आहे. अशा प्रकारे पूर्णपणे नव्याने जडणघडण होणाºया व न भूतो अशी आव्हाने घेऊन येणाºया भावी आयुष्याला अर्थपूर्ण आकारासाठी असामान्य नेतृत्वाची गरज अपरिहार्य आहे. अशा वेळी नेत्यांना व्यक्तिगत स्वभावविशेषांवर मात करून व संकुचित राष्ट्रवादाहून वर येऊन विचार करावा लागेल. असे करताना त्यांना अनेक नवे पूल बांधावे लागतील व अनेक जुने पूल जाळून नष्ट करावे लागतील. हाती असलेले काम फत्ते करतानाही लोकांच्या आशा-आकांक्षांची पूर्ती करण्याचे अग्निदिव्य त्यांना करावे लागेल. संघर्ष व अन्यायाने भरलेल्या जगात समाजातील शोषितांनाही त्यांच्या भवितव्याविषयी आश्वस्त करणे, राजकीय सुजाणता दाखवून टिकाऊ राजकीय सहमती तयार करणे, यात अशा नेतृत्वाचा खरा कस लागतो. म्हणूनच सचोटी, सातत्य, करुणा, अविचल निश्चय, पराकोटीची लीनता, नीतिमूल्यांची भक्कम बैठक व विविध विचार व मान्यतांच्या लोकांनाही स्फूर्ती देण्याची क्षमता अशा गुणांनीयुक्तनेतृत्वाची आता गरज निर्माण झाली आहे. अशा नेतृत्वास मोठे मन ठेवून क्षुल्लक आत्मप्रौढी बाजूला ठेवावी लागेल. अशा नेतृत्वास उद्दामपणा, आडमुठेपणा, धोका पत्करण्याऐवजी पळवाटा शोधण्याची प्रवृत्ती अशा सर्व अवगुणांना अजिबात थारा देता येणार नाही. समाजाच्या व्यापक हिताशी पक्की बांधीलकी ठेवून निर्णय घेणे ही अशा नेतृत्वाची खरी कसोटी असेल. यासाठी राजकारणालाही उच्च नैतिक उद्दिष्टांची जोड द्यावी लागेल. अशा नेतृत्वाला असंख्य आव्हाने पेलून आणि असंख्य कसोट्या पार करून तावून-सुलाखून निघावे लागणार आहे.
(ज्येष्ठ विधिज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री)

Web Title: In these difficult times, the world needs innovative leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.