- विनायकराव पाटीलआश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा. शेतकरी अन्नदाता आहे, त्याच्याकडे मतदाता म्हणून पाहू नका़ खोटी आश्वासने देऊन शेतकºयाला फसवू नका. निवडणुकांमध्ये मतांसाठी खोटी आश्वासने देता व सत्ता आली की अनेक नियम व अटी लावून चुकीचे व अर्धवट निर्णय घेता़ त्याची मोठी प्रसिद्धी करून शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे वागता़ हे सर्व काही एकदा सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे़ मग कोणीही सत्तेत असो़महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे़ दुष्काळ, नंतरची अतिवृष्टी़, शेतीमालाला भाव नाही़, बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण आणि लग्न अशा अनेक अडचणींवर मात करून संघर्ष करीत शेतकरी जगत आहे़ दोन वेळा चुकीची कर्जमाफी झाली़ ज्यामध्ये थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ झाले़ मात्र न मिळणारा पीकविमा, कर्ज न देणाºया राष्ट्रीयीकृत बँका यामुळे शेतकºयांचे जगणे कायम अवघडच राहिले़ या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत राहिल्या़ विदर्भ, मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण तीन पटीने वाढले़ एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र सत्तासंघर्षात दंग आहेत़सरकारने केलेली कर्जमाफी चुकीची आहे़ कारण सध्याच्या कर्जमाफी योजनेमधून वगळलेला चालू बाकीदार व अपात्र थकबाकीदार ठरलेला एकही शेतकरी मार्चअखेर कर्ज भरणार नाही़ कारण त्याला पुढील कर्जमाफीसाठी थकबाकीदार व्हायचे आहे़ ज्यामुळे बहुतांश लोकांचा कर्ज न भरता थकबाकीदार होण्याकडे कल वाढला आहे़ मराठवाड्यातील दोन जिल्हा बँकांची अंदाजित आकडेवारी पाहिली तर एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी १६ हजार आणि फक्त व्याज भरून चालू बाकीदार राहिलेले शेतकरी ५९ हजार आहेत़ अन्य एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी २५ हजार तर फक्त व्याज भरून चालू बाकीदार शेतकरी १ लाख ४८ हजार आहेत़ या आकडेवारीवरून असे दिसते, थकबाकीदार शेतकºयांची संख्या कमी आहे़ मात्र व्याज भरून चालू बाकीदार बनलेल्या शेतकºयांची संख्या खूप मोठी आहे़ आता भविष्यात हे चालू बाकीदार शेतकरी पुढील कर्जमाफीच्या आशेने कर्ज न भरता थकबाकीदार होतील.
...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:02 IST