सोन्याची द्वारका करणारा खरा दामबाब दिसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:04 AM2020-05-02T02:04:07+5:302020-05-02T02:04:28+5:30

डोलणारी शेतं, मायेच्या सावलीचा विसावा देणारी आंब्या-फणसाची झाडं. झुळझुळ डोलणारी शेते... तात्पर्य, इथला देव देवळातच नाही तर निसर्गातही त्याची प्रचिती आहे.

There was a real commotion | सोन्याची द्वारका करणारा खरा दामबाब दिसला

सोन्याची द्वारका करणारा खरा दामबाब दिसला

Next

- डॉ. व्यंकटेश हेगडे
आपली गोमंत भूमी म्हणजे देवभूमी. देवभूमी हे बिरूद मिरवायला इथे देवळं आहेत. चर्चेस्, मशीदीही आहेत. इथला मानकुराद आंबा बाकीच्या आंब्यापेक्षा रूचकर व गोड आहे. इथे देवळं आहेतच; पण निसर्गाच्या एका दैवी संगीतावर डोलणारी माडाची व पोफळीची झाडं आहेत. इथं सूर्याचं दर्शन बऱ्याच लोकांना त्याच्या समुद्रातील प्रतिबिंबात होतं. डोलणारी शेतं, मायेच्या सावलीचा विसावा देणारी आंब्या-फणसाची झाडं. झुळझुळ डोलणारी शेते... तात्पर्य, इथला देव देवळातच नाही तर निसर्गातही त्याची प्रचिती आहे.
देवळं बांधणं हा गोवेकराचा छंद. म्हणून गोव्यात असंख्य देवळं आहेत. देवळात देवाच्या मूर्ती आहेत. रोज पूजा अर्चा होत आहे. उत्सवप्रेमी गोवेकरांना खांद्यावरील देवाच्या पालखीचं वजन कळतच नाही. उत्सवामुळे नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी बहरत असतात. भजनात आम्ही संत ज्ञानेश्वर ते तुकोबारायांचे अभंग अगदी विविध रागात गातो; पण त्या अभंगाचा अर्थ लक्षात घेत नाही. खरं भजन म्हणजे त्या अभंगाचा अर्थ लक्षात घेऊन ते संताचे विचार आचरणात आणावे. मानसिक ताण तणावाच्या दिवसात एखादा देवाच्या नामाचा गजर गुणगुणावा किंवा शक्य असल्यास सकाळी नामस्मरण करावं. देवळात मद, मत्सर, वासना, लोभ, राग, द्वेष आदी दैत्यी (राक्षसी) गुणांबद्दल जागृती येऊन त्या गुणांचा त्याग करावा आणि प्रेम, शांती, आनंद, सेवा, दान, करुणा त्या दैवी गुणांचा साक्षात्कार व्हावा. ते गुण बहरावेत हे देवळाचं प्रयोजन. देवळांत देवाची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर आपल्या अंतरातील दुर्गण व दैत्यी गुण त्यागून देव बनून उभं रहावं. आपल्या अंतरातला देव त्या मूर्ती समोर बसून अनुभवावा. दैवी गुणांत आपल्यातल्या देवत्वाचा साक्षात्कार व्हावा. जागृत होत, मत्सर, राग, लोभ, आकस, वासना आदी गुणांना देवळातच देवाच्या चरणी वहावे. तात्पर्य देवालयाचं प्रयोजन हे देवळातून बाहेर देव बनून यावं.


आज लाखो रुपये खर्चुन, मोठमोठी अनुष्ठानं देवालयात होतात. बाकीच्या कार्यक्रमांतही लाखोची उलाढाल होते. गोव्यातील अनेक देवळे खूप श्रीमंत आहेत आणि त्या श्रीमंत देवळात अनेकवेळा श्रीमंतीतील अवगुण दिसतात. देवस्थानचा कारभार पहाण्याची कमिटी निवडण्यात कधीकधी अनिष्ट पद्धतीचा अवलंब होतो आणि अनेक कमिटीच्या कार्यात प्रचंड भ्रष्टाचारही होेतो.

पण आज कोरोनाचं महाभयंकर संकट सर्व जगावर आलंय आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी शक्य असेल त्यांनी मदत करण्याचं आवाहन केलंय. अनेक श्रीमंत देवळांना शक्य आहे. काही देवळांनी मदत दिलीही आहे. जांबावलीच्या श्री दामोदराच्या देवळाच्या कमिटीने, प्रकाश कुंदे व त्याच्या सहकाऱ्यांनी ३३३३३३ रुपये दिले. श्री दामोदर हा माझा कूळदेव व ग्रामदेव. पण आज अंतरातून मला माझ्या श्री दामोदराचं खरं दर्शन झालंय. देवाला हवी असलेली कृती कमिटीने केलीय. दयेचा सागर, मायेचे आगर, आनंदाचे घर म्हणजे देव. ही खरी देव पूजा. एखाद्याच्या अंतरांतलं दु:ख हिरावून नेणं आणि त्याचे दुखाश्रू पुसणं ही खरी देव भक्ती. भक्ती म्हणजे मिळालेलं प्रेम. आपलं अस्तित्व प्रेम, शांती व आनंद आहे असं गुरुवर्य परमपूज्य श्री श्री रवीशंकर म्हणतात.
आज खुद्द देवानं आपलं देवत्व सिद्ध केलंय. आज तो दामोदर वेगळा दिसतो. त्या मूर्तीत कुठंतरी मला समाधान, तृप्ती, आनंद, करुणा याचा संगम दिसतो. दामबाब हा श्री कृष्णाचं रुप. कृष्णानं सोन्याची द्वारका केली. देवळांच्या सहकार्यानं ही गोमंतकाची देवभूमी सुवर्णभूमी व्हावी. दान हा देव हे उमगावं.
(आर्ट आॅफ लिव्हिंग)
 

Web Title: There was a real commotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.