मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते?
By गजानन जानभोर | Updated: October 10, 2017 00:35 IST2017-10-10T00:35:26+5:302017-10-10T00:35:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारक समितीशी संघाचा काहीच संबंध नाही, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी न्यायालयात सांगणे संघाच्या

मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारक समितीशी संघाचा काहीच संबंध नाही, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी न्यायालयात सांगणे संघाच्या आजवरच्या प्रामाणिकपणाच्या लौकिकाला बट्टा लावणारे आहे. संपत्ती वाचविण्यासाठी किंवा आर्थिक लाभ उकळण्यासाठी राजकीय नेते किंवा उद्योगपती अशी चलाखी करीत असतात. त्यांच्या धंद्यातील ती भ्रष्ट अपरिहार्यता असते. पण संघाने केवळ फुटकळ लाभासाठी असे नीतीभ्रष्ट होणे निष्ठावंत संघ स्वयंसेवकांना अस्वस्थ करणारे आहे.
संघाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया या चर्चित प्रकरणाचे निमित्त तसे किरकोळ. ‘नागपूरच्या रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समिती ही संघाच्या मालकीची नाही’, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र संघाने उच्च न्यायालयात अलीकडेच सादर केले. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात नागपूर महानगर पालिकेच्या निधीतून संरक्षक भिंत व अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेसंदर्भात संघाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ‘राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था नाही, त्यामुळे मनपाला त्या ठिकाणी कुठलीही विकासकामे करता येत नाहीत’, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. तर ज्या ठिकाणी ही कामे होणार आहेत, त्या डॉ. हेडगेवार स्मारक समितीशी आमचा काहीही संबंध नाही, हा संघाचा दावा आहे. संघाबद्दल कणव वाटायला लावणारी ही गोष्ट आहे. केवळ दीड कोटींच्या विकासकामांसाठी या ‘राष्ट्रभक्त’ संघटनेने केलेली ही कायदेशीर चलाखी आहे. तो या संघटनेचा सांस्कृतिक पराभव जसा आहे तसाच केवळ दीड दमडीसाठी लाखो स्वयंसेवकांना पूज्य असलेल्या हेडगेवारांशी आपले नाते नाकारण्याचा कृतघ्नपणाही आहे. या प्रकरणातील आणखी एक हास्यास्पद बाब अशी की, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान या प्रकरणात आम्हाला प्रतिवादी करा, असा अर्ज डॉ. हेडगेवार स्मारक समितीने उच्च न्यायालयात सादर केला आहे. स्मारक समिती नोंदणीकृत असल्याने स्वाभाविकच याचिका फेटाळली जाईल आणि दीड कोटींची विकास कामे रद्द होणार नाहीत, हा त्यामागील डाव आहे. दुसरीकडे हेडगेवारांशी असलेले नाते ‘कायदेशीर’ तुटले तरी चालेल, पण दीड कोटी जाऊ द्यायचे नाहीत, हा संघाचा अप्पलपोटेपणा आहे.
या प्रकरणात वाद निर्माण होताच ‘आम्हाला तुमच्या पैशातून नकोत ही विकासकामे’, असे बाणेदारपणे संघाने मनपाला सुनावले असते तर या राष्टÑभक्त संघटनेची प्रतिमा एवढी काळवंडली नसती. रेशीमबागेत असलेले संघाचे स्मृती भवन आणि स्मृती मंदिर या दोन वास्तू सरकारी मदतीतून उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या बांधकामासाठी स्वयंसेवकांनी एकेक रुपया गोळा केला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सतत प्रवास करीत असतात. पण, सरकार पुरस्कृत कुठलेही आदरातिथ्य ते कटाक्षाने टाळतात. संघाबद्दल आदर वाढवणारी अशी असंख्य उदाहरणे समोर असताना केवळ दीड कोटींसाठीच एवढी लाचारी का? २००८ मध्ये संत गजानन महाराज जन्मशताब्दीनिमित्त सरकारने देऊ केलेले १० कोटी रुपये शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी झिडकारले होते. संघाची ही अगतिकता बघितल्यानंतर अशावेळी शिवशंकरभाऊंच्या निष्कलंक सेवेची प्रकर्षाने आठवण होते.
gajanan.janbhor@lokmat.com