शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

...फिर भी रहेंगी निशानियां !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:03 IST

राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे. त्यानिमित्ताने आजही जनमानसांवर प्रभाव असलेल्या या ‘दी ग्रेटेस्ट शोमॅन’चे कृतज्ञ स्मरण.

- विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक

रणबीर राज कपूर अर्थात ‘दी ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन सिनेमा’ असे बिरुद मिळालेल्या राज कपूर यांची आज जन्मशताब्दी. सक्रिय कारकीर्द संपून चाळीस वर्षे उलटून गेली तरीही ज्यांच्या दृष्टीच्या, शैलीच्या आणि वंशाच्या वारसखुणा नित्यनूतन राहू पाहणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रभाव राखून आहेत असा हा अद्वितीय कलाकार!

चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवेश वर्ष १९३५ चा; पण पहिले लक्षणीय यश मिळाले ते अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून साकारलेल्या आग (१९४८) चित्रपटामध्ये. पुढच्याच वर्षी मेहबूब खानच्या ‘अंदाज’ आणि स्वतःचीच निर्मिती असलेल्या ‘बरसात’च्या प्रचंड यशामुळे ‘पृथ्वीराज कपूरचा धडपड्या मुलगा’ या प्रतिमेपलीकडे राज यांची  स्वतंत्र आणि यशस्वी ओळख प्रस्थापित झाली. आणि अर्थातच पुढे अनेक वर्षे दंतकथा बनून राहिलेल्या ‘आरके’ स्टुडिओचीही. 

वयाची पंचविशीही उलटलेली नसताना अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि स्टुडिओचा मालक म्हणून राज कपूर एक मोठे प्रस्थ बनले होते. १९८५ च्या ‘राम तेरी गंगा मैली’ या त्यांच्या शेवटच्या मोठ्या चित्रपटापर्यंत ते स्थान कायम राहिले. हिंदी चित्रपटसृष्टीत १९५० चे ‘सुवर्ण दशक’ ते १९८० चे ‘विचलित दशक’ असे स्थित्यंतर घडतानाच्या काळातील बदलांशी जुळवून घेत आणि त्यांना दिशा देत राज कपूर ‘दी ग्रेटेस्ट शोमन’ म्हणून कालसुसंगत राहिले.

राज कपूर यांचे समकालीन प्रतिभावान काही कमी नव्हते. मेहबूब खान, बिमल रॉय, व्ही. शांताराम यांच्यासारखे दिग्दर्शक, गुरुदत्तसारखा अभिनेता-दिग्दर्शक आणि दिलीपकुमार, देवानंद यांच्यासारखे लोकप्रिय अभिनेते ही स्पर्धा होतीच. साठीच्या दशकानंतर वाढत्या वयाशी जुळवून घेत राज कपूरनी पडद्यावरील नायकपण सोडून दिले; पण स्पर्धा वाढूनही दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातील नायकत्वाच्या स्पर्धेमध्ये मात्र शेवटपर्यंत टिकून राहिले. वर्ष १९७० चा ‘मेरा नाम जोकर’ साफ आपटला. त्याच्या अपयशानंतर टिकून राहण्यासाठी त्यांनी व्यावसायिक गणितांसाठी लागणाऱ्या चित्रपटी ऐवजालाच प्राधान्य दिले. १९७० नंतर आलेले ‘कल आज और कल’, ‘बॉबी’, ‘धरम करम’, ‘सत्यम-शिवम-सुंदरम’, ‘प्रेमरोग’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ हे चित्रपट त्याच ‘टिकण्या’च्या प्रयत्नांना आलेले यश होते.

अभिनेता, दिग्दर्शक आणि विशेषतः निर्माता म्हणून व्यावसायिक गणितांचे राज कपूरना वावडे कधीच नव्हते; पण या व्यावसायिक समीकरणांमध्ये सामाजिक आणि कलात्मक मूल्ये चपखलपणे भरण्याची उत्तम शैली त्यांनी पन्नाशीच्या दशकातच आत्मसात केली होती. म्हणूनच परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील द्वंद्व, स्त्रीचे स्वातंत्र्य आणि मर्यादा, नेहरू-प्रणित समाजवादी राष्ट्रनिर्मिती स्वप्न, गाव आणि शहरातील सांस्कृतिक-मूल्यात्मक संघर्ष, नवस्वतंत्र-नवशिक्षित पिढीच्या आकांक्षा आणि अपेक्षाभंग अशा साऱ्या समकालीन महत्त्वाच्या सामाजिक मूल्यांना त्यांनी चित्रपटांमध्ये महत्त्वाचे स्थान दिले. ‘आवारा’ (१९५१), ‘बूटपॉलिश’ (१९५४), ‘श्री’ ४२० (१९५५), ‘जागते रहो’ (१९५६), ‘जिस देश मे गंगा बहती है’ (१९६०) ही त्याची ठळक उदाहरणे.

हे सगळे प्रेक्षकांना रुचावे म्हणून भाबडा, वेंधळा, स्वप्नाळू, स्वतःवरच हसणारा, विनोदी असा चार्ली चॅप्लीन शैलीचा; पण भारतीय वळणाचा नायक त्यांनी साकारला. ही शैली, देखणे रूप आणि कृष्णधवल चित्रीकरणातील एक अंगभूत सौंदर्य यामुळे हा नायक लोकप्रियही झाला. खास भारतीय मेलोड्रामाशी युरोपिय ‘न्यू वेव्ह’ चित्रपटातील नववास्तववादी शैलीचा थोडा संकर करणारी शैली त्यांनी प्रस्थापित केली. वैशिष्ट्यपूर्ण चित्रीकरण, प्रकाशयोजना, भव्य सेट आणि उत्तम चित्रीकरणस्थळ यांचा वापर हेही त्यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची विलक्षण सांगीतिक जाण. राज कपूर दिग्दर्शित- निर्मित जवळजवळ सगळ्याच चित्रपटांचे संगीत कलात्मकता आणि व्यावसायिकता अशा दोन्ही पातळ्यांवर फार उत्तम ठरले. त्यात गीतकार, संगीतकार, गायक यांच्याइतकेच राज कपूर यांचे दिग्दर्शकीय योगदानही महत्त्वाचे. रोमँटिसिझम, संयत भावनाट्य, कथेतील चपखलपणा, उत्तम उत्कट संगीत आणि भव्य सेट यांचा राज कपूर शैलीतला आविष्कार असणारी तशी अनेक गाणी आहेत. 

दिग्दर्शक हा चित्रपटाचा खरा ‘ऑथर’ असतो असे मानले जाते; पण राज कपूर यांनी केवळ स्वतःलाच नाही तर त्यांच्या टीमलाच जणू ऑथर केले. लेखक म्हणून ख्वाजा अहमद अब्बास, संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, गायक म्हणून लता मंगेशकर, मुकेश, मन्ना डे अशी एक यशस्वी आणि घट्ट टीम राज कपूर यांच्यामागे समर्थपणे उभी असे.  अशा दिग्गज कलाकारांच्या एकत्रित प्रयत्नांमधून राज कपूर आणि त्यांचा चित्रपटाचा ब्रँड फक्त भारतातच नाही, तर तत्कालीन सोविएत युनियन, चीन, पश्चिम आशिया, आफ्रिका, तुर्कस्थान यांसारख्या देशांमध्ये लोकप्रिय झाला. हिंदी चित्रपटसृष्टी ‘बॉलिवूड’ होण्याआधी जागतिक करण्याचे मोठे श्रेय राज कपूर यांचे.

भावनाट्य आणि वास्तवता यांचा मध्य साधणे, गाण्यांना कथेचाच महत्त्वाचा आविष्कार मानणे, गाव-शहर यांच्यातील संस्कृती संघर्ष टिपणे, भाबडा रोमँटिसिझम जपणे आणि या साऱ्यांना कौटुंबिक नाट्याच्या, प्रणयी प्रेमाच्या चौकटीत घट्ट बांधणे ही हिंदी चित्रपटांची काही महत्त्वाची लक्षणे. राज कपूर यांनी त्यांचा लोभस आविष्कार घडविला. आजही टिकून राहतील असे काही चित्रपटीय साचे किंवा ‘टेम्प्लेट्स’ दिले. म्हणूनच राज कपूर गेले, त्याकाळची कलाकार व प्रेक्षकांची पिढीही पडद्याआड गेली तरी राज कपूर यांचे कालौचित्य टिकून राहिले. अगदी ‘प्यार हुआ इकरार हुआ’तील सूचक अशा ‘मै ना रहुंगी, तुम न रहोंगे, फिर भी रहेंगी निशानियाँ’ या ओळीसारखे.    vishramdhole@gmail.com

टॅग्स :Raj Kapoorराज कपूर