... then the fear of mental stress will take a terrible turn !, the story of lonely sad children without friends | ...तर मानसिक तणाव भीषण रूप घेईल, अशी धास्ती वाटते!, दोस्तांविना एकेकट्या उदास मुलांची कहाणी

...तर मानसिक तणाव भीषण रूप घेईल, अशी धास्ती वाटते!, दोस्तांविना एकेकट्या उदास मुलांची कहाणी

-  विजय दर्डा 

(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

महाराष्ट्रात चाललेला सत्तासंघर्ष, पोलीस दलातील वादग्रस्त घडामोडी, छत्तीसगडमधला नक्षल्यांचा उपद्रव, पश्चिम बंगाल व इतर राज्यांत मास्क न लावता निवडणूक प्रचार सभांना खच्चून गर्दी करणारे लोक, कोरोनाचा वाढता प्रकोप, औषधे आणि लसींचा तुटवडा भासत असल्याने सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, या संकटकाळात पायाखालची जमीन सरकू नये, म्हणून धडपड करणारे व्यापारी-व्यावसायिक असे सगळे महत्त्वाचे विषय सोडून, मी आज देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांबद्दल लिहायचे ठरवले - आहे. त्यामागे  कारणही तसेच आहे. मुले, विशेषत: विद्यार्थी आज प्रचंड तणावाखाली आहेत. यातून मोठी मानसिक समस्या उद्भवेल की काय, अशी भीती वाटावी, इतका तो तणाव जास्त आहे. 

मुलांच्या भवितव्याच्या  काळजीने जीव कासावीस व्हावा, अशी परिस्थिती आहे. कोरोनाने निर्माण केलेली विचित्र परिस्थिती मुलांसाठी दिवसेंदिवस जास्तच बिघडत चाललेली मला दिसते. बालवाडीत जाणारी मुले आज स्क्रीनसमोर बसून ऑनलाइन अभ्यास करताना दिसतात.  डोळ्यांच्या डॉक्टरांशी चर्चा झाली, तेव्हा ते मला म्हणाले,  या अभ्यासातून लाभ तर काही होणार नाहीच, पण या लहान मुलांच्या दृष्टीवर त्याचा नक्की परिणाम होईल. या मुलांना स्क्रीनचे विचित्र व्यसन लागेल. ही सवय इतकी विचित्र तऱ्हेने या मुलांचा कब्जा घेईल की, मोबाइल, संगणकाचा पडदा हेच त्यांचे जीवन होऊन जाईल. या वयात मुलांनी घराबाहेर खेळले, बागडले, हुंदडले पाहिजे. स्क्रीनशी जखडली गेलेली मुले त्यापासून  शतयोजने दूर जातील.

मुलांवर होणाऱ्या या समकालीन दुष्परिणामांची चर्चा सध्या जगभरात सर्वत्र होते आहे.  देश-विदेशातील अनेक मनोविश्लेषकांशी मी  त्याबद्दल बोलत  असतो. जे ऐकतो, ते काळजी वाढवणारेच आहे. मुले प्रत्यक्षात एकमेकांना भेटत नाहीत, एकमेकांचा हात हातात घेत नाहीत, गळ्यात गळे घालत नाहीत, दंगा-मस्ती करीत नाहीत, हे गंभीर आहे, असे एका मनोवैज्ञानिकाने मला सांगितले. स्पर्शाची एक भाषा असते. त्यातून प्रेम कळते, समरसता काही शिकवत असते. भेटण्यातला, मस्ती करण्यातला आनंद मुलांचे भावविश्व फुलवतो.  

स्पर्शच अनुभवता येत नाहीत, तेव्हा भावविश्व फुलण्याची दारे बंदच होतात. ऑनलाइन थोडा-फार अभ्यास होईलही कदाचित, पण दोस्तांशी भेटीगाठी नसल्याने, समरसतेच्या सुखाला मात्र मुले वंचित होतील. मनोवैज्ञानिकांचे म्हणणे, मुलांमधला हा तणाव वाढत जाणार आहे. एका पालकाने मनोवैज्ञानिकाला सांगितले की, कोरोनाच्या काळात कोणालाच न भेटता आलेला, घरात कोंडला गेलेला त्यांचा मुलगा टोकाचा आत्मकेंद्रित झाला. आता संधी असली, तरी इतर मुलांना भेटण्याची त्याला  भीतीच वाटते. तो काही उत्साहच दाखवत नाही. त्याची दोस्ती फक्त मोबाइल आणि संगणकाशी झाली आहे. मनोवैज्ञानिकांनी सांगितलेले हे उदाहरण ऐकून मला दक्षिण कोरीयाताल्या त्या मुलाची आठवण आली. हा मुलगा एकटेपणात इतका बुडाला की, त्याने इतर मुलांना भेटणेच बंद करून टाकले. शेवटी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार द्यावे लागले. शरीर आणि मनावर विपरीत परिणाम व्हावा, इतका ताण मुलांवर वाढलाय,  हा या सगळ्या उदाहरणांमधला एकच मुद्दा आहे.

कोरोनाच्या काळात शाळा सुटली आहे? आणि परीक्षेचा ताण दूर झालेला नाही. पालकांना वाटते, मुलांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत, पण सरकारने आठवी, नववी आणि अकरावीतल्या मुलांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी शिक्षण खात्याने मुलांना तणावातच ठेवले होते. आता दहावी-बारावीची परीक्षा व्हायची आहे. कधी सांगतात, परीक्षा ऑनलाइन होणार, कधी सांगतात, ऑफलाइन! कधी सांगतात, प्रात्यक्षिक परीक्षा होईल, कधी सांगतात, नाही होणार!  मुलांचा अभ्यासच नीट झालेला नाही, तर परीक्षेचा हा सोस कशासाठी? मुले परीक्षा देणार कशी? एकट्या महाराष्ट्रात १०वी, १२वीच्या परीक्षेला ३० लाख विद्यार्थी बसतात.  इतक्या विद्यार्थ्यांना तणावात ठेवण्यात काय हशील आहे? इतका गोंधळ कशासाठी? अर्थात, मुलांना नको एवढा त्रास आणि ताण देण्यासाठीच आपली शिक्षणव्यवस्था प्रसिद्ध आहे म्हणा!

मनुष्यबळ मंत्रालयाचा एक अहवाल सांगतो की, ११ ते १७ वर्षांची मुले तणावाची शिकार झाली आहेत. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.  मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल, हे शोधायला प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती, पण त्यानंतरही परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही.दिल्ली सरकारने मात्र या दिशेने स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. दिल्लीच्या शाळात ‘आनंदी वर्ग’ चालतो. हसत-खेळत मुले शिकतात. असे वर्ग देशभर सुरू व्हायला हवेत. गुणदान पद्धतीही बदलली पाहिजे. परीक्षेत सर्वाधिक आकड्यातले गुण मिळणे, म्हणजे मूल हुशार असे नसते. या मार्कांच्या स्पर्धेपासून लांब राहिलेली मुले जीवनात अधिक यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते, पण समाजात मात्र अधिकाधिक मार्क, अधिकाधिक टक्के मिळविण्याची स्पर्धाच लागलेली! त्यातून मुले संत्रस्त झाली आहेत. इतकी की, आत्महत्या करण्यापर्यंत वेळ गेली. 

राष्ट्रीय गुन्हे नोंदणीनुसार, २०११ ते २०१८ या काळात सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने किंवा मिळतील या भीतीने आत्महत्या केली. त्यातली जवळपास निम्मी मुले शाळकरी वयाची होती. मी आणखी एक आकडेवारी समोर ठेवू इच्छितो. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६.९ टक्के मुलांमध्ये मानसिक समस्या आढळल्या आहेत. शहरी भागात हेच प्रमाण १३.५ टक्के दिसते. जास्त टक्के गुण म्हणजे यशस्वी जीवन नव्हे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. आपली मुले अकारण तणावाची शिकार होणार नाहीत, अशी शिक्षण प्रणाली आपल्याला घडवावी लागेल.

(vijaydarda@lokmat.com)
 

Web Title: ... then the fear of mental stress will take a terrible turn !, the story of lonely sad children without friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.