लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का?
By Shrimant Mane | Updated: April 12, 2025 09:59 IST2025-04-12T09:58:20+5:302025-04-12T09:59:41+5:30
Science Story: वैज्ञानिकांनी जीवाश्मातून तेरा हजार वर्षांपूर्वीचे दात आणि ७२ हजार वर्षांपूर्वीच्या कवटीतून डीएनए मिळवून अस्तंगत ‘डायर वुल्फ’ला जन्माला घातले, त्याबद्दल!

लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का?
-श्रीमंत माने
( संपादक, लोकमत, नागपूर)
सस्तन प्राण्यांचे कृत्रिम प्रजनन, क्लोनिंग शक्य आहे, हे १९९६ मध्ये ‘डाॅली’ नावाचे मेंढीचे काेकरू जन्माला घालून माणसाने सिद्ध केले. जैवविज्ञानाचा तो चमत्कार होता. माणसाच्याही क्लोनिंगची शक्यता निर्माण झाली. विज्ञान आणखी पुढे गेले आणि नामशेष झालेल्या, पृथ्वीतलावर अस्तित्वात नसलेल्या प्राण्याचेही पुनरूत्थान शक्य झाले. अमेरिकेच्या डलास प्रांतात कोलोसल बायोसायन्सेसने पुढचा चमत्कार घडवला आहे. क्लोनिंग व जीन एडिटिंगद्वारे अंदाजे बारा-तेरा हजार वर्षांपूर्वी, शेतीचा शोध लागत असताना नामशेष झालेली लांडग्याची ‘डायर वुल्फ’ प्रजाती पुन्हा जिवंत केली आहे. दहा फूट उंच भिंतीच्या आत दोन हजार एकरांवरील कोलोसलच्या कृत्रिम जंगलात सध्या रोम्युलस व रेमस ही गेल्या १ ऑक्टोबरला जन्मलेली डायर वुल्फ पिल्ले हुंदडत आहेत. खलिसी ही त्यांची ७० दिवसांची बहीण अजून पाळण्यात आहे.
या नावांच्याही दंतकथा आहेत. रोम्युलस हा रोमन साम्राज्याचा संस्थापक. रेमस त्याचा जुळा भाऊ. रेमसची हत्या करूनच रोम्युलस गादीवर बसला. पण, त्याआधी दोघांचे पोषण एका मादी लांडग्याच्या दुधावर झाले, अशी दंतकथा आहे. खलिसी नावही लांडग्याशी संबंधित आहे. जाॅर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘अ साँग ऑफ आइस ॲण्ड फायर’ या कादंबरीवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही ‘एचबीओ’ची मालिका जगभर गाजली. त्या कादंबरीतील काल्पनिक डोथराकी भाषेत खलिसी म्हणजे राणी.
लहानगे, गोंडस रोम्युलस व रेमस सध्या खेळकर, खोडकर आहेत. खऱ्या डायर वुल्फसारखे ते हिंस्त्र बनतील का? हे तूर्त सांगता येत नाही. कारण, त्यांचा जन्म संकरातून, सरोगसीतून झाला आहे. लांडगा, कोल्हा, खोकड परिवारातील राखाडी लांडगा हा डायर वुल्फचा निकटचा वंशज. दोघांचे ९९.५ टक्के डीएनए जुळतात.
राखाडी लांडगा तसा मवाळ. डायर वुल्फ आकाराने मोठा होता. अधिक रूंद डोके, अंगावर पातळ लोकर व दणकट जबडा ही त्याची वैशिष्ट्ये. आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या प्राण्याच्या शिकारीचे काैशल्य त्याच्याकडे होते. कोलोसलच्या वैज्ञानिकांनी जीवाश्मातून तेरा हजार वर्षांपूर्वीचे दात आणि ७२ हजार वर्षांपूर्वीच्या कवटीतून डायर वुल्फचे डीएनए मिळवले. उच्च दर्जाच्या जनुकांच्या १४ जोड्यांमध्ये क्लोनिंगच्या आधी २० बदल केले. आयव्हीएफ तंत्र वापरले. ‘ग्रेहाउंड’ या पाळीव कुत्र्याचे डोनर एग्जमधील न्यूक्लिअस काढून त्या जागी लांडग्याच्या पेशींमधील सुधारित न्यूक्लिअस टाकले. त्यातून सुदृढ भ्रूण विकसित झाले. प्रत्येक प्रयत्नात असे तब्बल ४५ भ्रूण तयार झाले. ते सगळे जन्माला आले असते तर डायर वुल्फचा कळपच तयार झाला असता. तो सांभाळणे अवघड जाईल म्हणून मोजक्याच भ्रूणांची वाढ होऊ दिली आणि रोम्युलस, रेमस व खलिसी किमान बारा सहस्त्रकांनंतर पृथ्वीवर अवतरले.
लांडग्याची ही तीन पिल्ले म्हणजे माणसांच्या मृत्यूला हुलकावणी देण्याच्या, प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या ‘लांडगा आला रे’ हाकेचे प्रतिध्वनी आहेत. त्यातून प्रश्न निर्माण होतो की, डायर वूल्फसारखे महाकाय मॅमथ हत्ती, त्याच जातकुळीतील माॅस्टोडाॅन, लांबलचक सुळे असणारी सेबरटूथ मांजरे, अस्वलांसारखे विशालकाय स्लाॅथ, उंंदरासारखे आर्माडिलो, ऑस्ट्रेलियातील डायप्रोटोडॉन, कबुतरांचे उडता न येणारे बेढब पूर्वज डोडो पक्षी पुन्हा जन्माला घालणे शक्य होईल? कोलोसलचे वैज्ञानिक म्हणतात की, २०२८ पर्यंत नामशेष मॅमथ पुन्हा जन्म घेऊ शकतो. आजच्या कल्पना, विज्ञानकथा उद्याचे वास्तव असते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये सिंहासनासाठी लढणाऱ्यांनी ग्रे विंड, लेडी, नायमेरिया, शाग्गिडाॅग, समर व घोस्ट हे डायर वुल्फ पाळले होते. स्टिव्हन स्पिलबर्गच्या ‘ज्युरासिक पार्क’मध्ये डायनासोरच्या कळपाने सिनेमाच्या पडद्यावर थरकाप उडवला होता. तसे प्रत्यक्ष घडेल का?
हे अवघड दिसते. या अजस्त्र प्राण्यांचा सर्वात मोठा शत्रू माणूसच आहे. होमो सेपियन विविध खंडांमध्ये पसरले त्या काळात ५०-६० हजार वर्षांपूर्वी नैसर्गिक अधिवासातील ‘मेगाफाॅनल’ म्हणजे अधिक वजनाच्या प्राण्यांच्या दोनशेवर प्रजाती शिकार व आगीमुळे नामशेष झाल्या. तेव्हा जगाची लोकसंख्या एक कोटीदेखील नव्हती. शेतीच्या निमित्ताने माणूस स्थिरावला. मोठे शाकाहारी प्राणी संपले. लहान प्राण्यांची संख्या वाढली. तेच छोटे प्राणी माणूस पाळायला लागला. आता पृथ्वीवर सस्तन प्राण्यांच्या बायोमासचा ९० टक्के हिस्सा मानव व त्याच्या पाळीव प्राण्यांचा आहे. ब्लू व्हेल हा सध्या आकाराने सर्वांत मोठा प्राणी आहे. गवे, समुद्री गाय वगैरेंची संख्या खूपच कमी आहे. अशावेळी अतिप्रगत विज्ञान हातात असले तरी अधिवास कसा निर्माण करणार?
shrimant.mane@lokmat.com