शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

संपादकीय - क्रिकेटची लक्तरे वेशीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 06:09 IST

बोर्डाशी करार असताना कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही

भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे राष्ट्रीय संघ निवडकर्ते चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक खुलासे केले. त्यामुळे क्रिकेट विश्वात भूकंप झाला. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटबाबत केलेल्या खुलाशानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचाही राजीनामा दिला. हे खळबळजनक खुलासे अशावेळी झाले आहेत, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी नवी दिल्लीत खेळविली जात आहे. पुढील दोन सामन्यांसाठीही संघ निवड बाकी आहे. मुख्य निवडकर्त्याच्या या खुलाशाने जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्डाची मान शरमेने खाली गेली. कोहली आणि गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्मांनी केला. कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर चेतन शर्मा स्पष्टच बोलले. कोहलीला वाटत होते की, सौरव गांगुलीमुळे कर्णधारपद गमवावे लागले; पण तसे नाही. निवड समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बरेच लोक होते. गांगुलीने कोहलीला निर्णयाचा एकदा विचार कर, असे सांगूनदेखील कोहलीने ते ऐकले नाही. खेळाडू ८५ टक्के फिट असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शन घेतात, हा चेतन शर्मा यांचा गौप्यस्फोट बरेच काही सांगून जातो.

बोर्डाशी करार असताना कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही. चेतन शर्मा यांनी त्याचे उल्लंघन केले. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली. त्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जानेवारीत पुन्हा शर्मा यांचीच मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली. शर्मा यांच्याव्यतिरिक्त शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे चार सदस्य आहेत. चेतन शर्मा यांची ही दुसरी टर्म होती. यावेळी त्यांचा कार्यकाळ ४० दिवसांत संपला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चेतन शर्मांनी दोन्ही टर्ममध्ये आपले पद गमावले. शर्मा पदावरून पायउतार झाले; पण त्यांच्या खुलाशाचा परिणाम अनेक खेळाडूंसह त्यांच्यावरही दिसून येणार आहे. स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलेल्या माहितीमुळे भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांची माहिती जगासमोर आली. यानंतर शर्मांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बीसीसीआय यासंबंधी खुलासा करून चेतन शर्मा यांना पदावरून दूर करेल, याची शक्यता असताना अखेर शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला. आपल्याशिवाय टीम इंडियाचे पान हलत नाही, रोहित-हार्दिक हे आपल्याला लाडीगोडी लावत असतात, अशा आविर्भावात अनेक वक्तव्ये केली होती. यानंतर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकत होती. बीसीसीआयला नव्या अध्यक्ष निवडीचा निर्णय लवकर घ्यावा लागेल कारण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन कसोटी सामने आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणे शिल्लक आहे. चेतन शर्मा क्रिकेट खेळायचे त्यावेळी अशीच एक घटना घडली, जी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. फक्त एका चेंडूमुळे त्यांच्यावर देशात तोंड लपवून, वेशांतर करून फिरण्याची वेळ आली होती. १९८६ मध्ये आशिया कपच्या फायनलमध्ये शारजा मैदानावर भारत-पाकिस्तान आमने-सामने होते. पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. चेतन शर्माच्या हातात चेंडू होता. जावेद मियाँदादने शर्मा यांच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर चेतन चाहत्यांच्या नजरेत ‘व्हिलन’ बनले. शर्मा यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा शेवटही वाईट झाला. १९९४ ला देशासाठी चेतन शर्मा शेवटचा सामना खेळले. न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात २३ धावा मोजल्या. स्टीफन फ्लेमिंगने एका षटकात सलग पाच चौकार मारले. चेतन शर्मा यांना त्या सामन्यात ते एकमेव षटक देण्यात आले होते. स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. क्रिकेट विश्वातील सर्वांत मोठ्या आणि बलाढ्य संस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचा हा प्रकार आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे भवितव्यदेखील धोक्यात येण्याची भीती वाटते. भविष्यातील वाटचालीसाठी ठोस तोडगा न शोधल्यास हा गडद डाग कायम राहील.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघBCCIबीसीसीआयRohit Sharmaरोहित शर्मा