भावनांशी खेळ का करता?

By विजय दर्डा | Published: January 9, 2023 09:20 AM2023-01-09T09:20:42+5:302023-01-09T09:25:02+5:30

सम्मेद शिखरजी हा विषय ना एका धर्माचा आहे, ना एका समुदायाच्या आस्थेचा; हा संस्कृती रक्षणाचा मुद्दा आहे! संस्कृतीपेक्षा महत्त्वाचे काय असते?

The central government has banned the sale of liquor and meat in the Sammed Shikharji mountain area after strong protests by the Jain community | भावनांशी खेळ का करता?

भावनांशी खेळ का करता?

Next

-  विजय दर्डा 

जैन समाजाने प्रखर विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने सम्मेद शिखरजी पर्वत क्षेत्रात दारू आणि मांस विक्री, तसेच मोठ्या आवाजात गाणे वाजवणे यावर प्रतिबंध लावला आहे; परंतु या संपूर्ण पवित्र क्षेत्राला पर्यटन क्षेत्राच्या अधिसूचीतून हटवण्याची अधिसूचना राज्य सरकारने अजूनपावेतो जारी केलेली नाही. सम्मेद शिखरजी क्षेत्राला पर्यटन सूचीतून हटवावे लागेल, हे तर उघडच!  परंतु झारखंड सरकारला या स्थळाच्या पावित्र्याची कल्पना नव्हती का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की जाणूनबुजून अशा प्रकारची खोडी काढली गेली? 

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारावर असलेले सम्मेद शिखरजी जगभरातील प्रत्येक  जैनधर्मीयासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. जैन धर्मातील २४ पैकी २० तीर्थंकरांना येथेच निर्वाणप्राप्ती झाली. याला सिद्धक्षेत्र आणि तीर्थराज असेही संबोधले जाते. जगभरातून दरवर्षी लक्षावधी जैनधर्मीय येथे येऊन दर्शन, पूजा-अर्चा, परिक्रमा अत्यंत श्रद्धेने करतात. हिंदू धर्मीयांमध्ये  आयुष्यात एकदा चारीधाम तीर्थयात्रा करण्याची इच्छा असते, त्याच प्रकारे  जैनधर्मीय सम्मेद शिखरजी, पावापुरी, पालीताना आणि राजगीर या ठिकाणी दर्शनाला जाण्याची इच्छा बाळगतात. 

२०१९ मध्ये राज्य सरकारच्या आग्रहामुळे केंद्र सरकारने सम्मेद शिखरजीच्या संपूर्ण क्षेत्राला पर्यावरणीय पर्यटन स्थळ घोषित केले होते. जैन समाजाने तत्काळ त्यावर हरकत घेतली. केंद्राने राज्याचा आग्रह स्वीकारणे चूकच होते. गतवर्षी फेब्रुवारीत राज्य सरकारने शिखरजीला पर्यावरणीय पर्यटनस्थळ करण्यासाठी अधिसूचना जारी केली. काही खास लोकांना लाभ व्हावा म्हणून एका पवित्र धार्मिक स्थळाला पर्यटन क्षेत्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही झाला.

काही भागांत दारू, मांस याची विक्री सुरू झाल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. ट्रेकिंगच्या नावाने शिखरजीच्या नैसर्गिकतेला धक्का पोहोचू लागला. यामुळे संपूर्ण देशात असंतोष पसरला नसता तरच नवल! मग मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला. त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या; परंतु दरम्यानच्या काळात जैन साधूंना प्राणत्याग करावा लागला, हे फार दुर्दैवी आहे! 

- खरा प्रश्न हा की कुठल्याही धर्माच्या किंवा समाजाच्या भावनांशी असा खेळ मुळात केलाच का जातो? आपण राज्यघटनेमध्येच सर्व अल्पसंख्याक समुदायांचे रक्षण, त्यांची प्रतिष्ठा आणि  भावनांचा आदर करण्याची शपथ घेतलेली आहे. ते आपले कर्तव्यही आहे. घटनेच्या नजरेतून सगळे समान आहेत. कोणी मोठा भाऊ नाही ना कोणी छोटा. जैन समाजातील बहुतेक लोक आपापल्या धारणेनुसार हिंदू देवी-देवतांचीही पूजा करतात. हा समाज भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. शांती, अहिंसा, क्षमा आणि औदार्य हे जैन संप्रदायाचे दागिने आहेत. संख्येच्या दृष्टीने पाहू जाता जैनधर्मीय भले कमी असतील; पण देशाच्या स्वातंत्र्यापासून विद्यमान अर्थव्यवस्था आणि निर्माण कार्यामध्ये जैन धर्मीयांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांना दुखावणे हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय झाला पाहिजे.

खरे तर हल्ली आपल्या समाजामध्ये भावना पटकन दुखावतात. कोणीही नेता कुठल्याही समाजावर किंवा धर्मावर काहीही शेरे-ताशेरे ओढतो. कुठे धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जाते, कधी कोणावर हल्ला होतो. समाजामध्ये घृणा किती वेगाने पसरते, हे आपण सारे जाणतो. सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विभिन्न विचारांचा आदर करण्याची शिकवण देणारा आपला देश आणि सध्या आपण हे काय करून बसलो आहोत? स्वामी विवेकानंद म्हणत, धर्म ही एक अशी नैतिक ताकद आहे जी केवळ व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला शक्ती प्रदान करते. कोणत्याच धर्मात कसलाही दोष  नाही!

दोष असलाच तर तो धर्माच्या चुकीच्या व्याख्येमध्ये असतो! आपल्या देशाने तर जगातील सर्व धर्मांना सन्मानाने सामावून घेतले, सन्मान दिला. एखाद्या बागेत जितक्या प्रकारची फुले असतात, तितके त्या बागेचे सौंदर्य वाढते. त्याचप्रकारे देशाचे सौंदर्यही विभिन्न वैचारिक धारणांनीच शोभून दिसते. जगातल्या प्रत्येक धर्माला जवळून जाणण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. जगातल्या सर्व धर्मातले लोक माझे मित्र आहेत. विभिन्न धार्मिक परंपरांमध्ये मी आनंदाने सामील होतो.  आपल्या मूळ स्वरूपात कोणताही धर्म वैमनस्य शिकवत नाही, हे मी अनुभवलेले आहे. दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असे कोणताच धर्म सांगत नाही. 

सध्या निर्माण झालेले प्रश्न हे धार्मिक कडवेपणाची हट्टी अपत्ये आहेत. आपली धारणा योग्य आहे तशी समोरच्या व्यक्तीची धारणाही बरोबर असू शकेल असा विचारही हल्ली लोकांच्या मनात एकदाही येत नाही. एकांगी विचार प्रश्न अधिकच गहिरे करतो, म्हणून प्रत्येकाने दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. धर्मकारण आणि राजकारणातल्या  नेतृत्वाने आपल्या कडवट, आंधळ्या समर्थकांना आवरले पाहिजे! सम्मेद शिखरजी हा विषय ना धर्माचा आहे, ना आस्थेचा आहे. हा संस्कृती रक्षणाचा मुद्दा आहे. जर संस्कृती वाचली, तरच देश सुंदर आणि विकसित असा होईल. पर्वतराज हिमालयाची हीच शिकवण आहे, पवित्र गंगा नदी हाच निरोप घेऊन वाहत असते आणि आपले ऋषी-मुनीही हेच सांगून गेले आहेत : सन्मान आणि संस्कृतीपेक्षा अधिक महत्त्वाचे असे काहीही नाही.

Web Title: The central government has banned the sale of liquor and meat in the Sammed Shikharji mountain area after strong protests by the Jain community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.