पाळणा लांबविण्याची 'गोळी' आता पुरुषांच्याही हाती!
By Shrimant Mane | Updated: July 29, 2025 08:01 IST2025-07-29T08:01:04+5:302025-07-29T08:01:04+5:30
पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या लवकरच प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होतील. संततिनियमनाचे महिलांवरील ओझे कमी करणाऱ्या या नव्या संशोधनाबद्दल...

पाळणा लांबविण्याची 'गोळी' आता पुरुषांच्याही हाती!
श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावून वगैरे म्हणतात तसे स्त्रियांनी कर्तबगारी गाजवली, हे काैतुकाचे शब्द इतिहासजमा होऊ पाहत आहेत. स्त्रिया आता खरोखरच बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षाही पुढचा इतिहास लिहू लागल्या आहेत. मात्र, एक क्षेत्र अजूनही असे आहे की, जिथे सगळी जबाबदारी स्त्रियांनीच उचलायची असते. पुरुष तिथे नुसतेच मागे नाहीत, तर त्यांनी जणू पूर्णपणे अंग काढून घेतले आहे. हे क्षेत्र आहे संततिनियमनाचे, याविषयी सारे उपाय स्त्रियांनीच करायचे, असा जणू अलिखित नियम आहे; पण हे चित्र बदलविणारे नवे संशोधन पुढे येत आहे.
पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांच्या संशोधनाने गेल्या आठवड्यात नवा, ऐतिहासिक टप्पा गाठला असून, ‘चला, अपत्यप्राप्ती पुढे ढकलण्यासाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांच्या बराेबरीने जबाबदारी उचलण्यासाठी सज्ज व्हा,’ असा संदेश तमाम पुरुषांना देणारे हे नवे संशोधन आहे. याचा अर्थ पुरुष काही जबाबदारी उचलतच नाहीत असे नाही. कंडोम्सचा वापर, थेट नसबंदी असे उपाय पुरुषही करतात; पण ते साध्या गोळीसारखे सहज, सोपे नाहीत. नसबंदी तर अंतिम उपाय. ही झाली सगळ्या जगाची गोष्ट. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात मात्र सगळे ओझे महिलाच उचलतात.
इंग्लंडमधील ‘युवर चाॅइस थेराप्युटिक’ ही कंपनी स्वत:च्या नावाने ‘वायसीटी-५२९’ नावाची गोळी बाजारात आणत आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी उपचार म्हणून ती घेता येईल. ती सुरक्षित व अत्यंत परिणामकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे तिचे परिणाम रिव्हर्सेबल आहेत आणि ती नाॅन-हार्मोनल आहे. म्हणजे गर्भनिरोधक साधनांमुळे स्त्रियांमध्ये जसा संप्रेरकांचा असमतोल तयार होतो, त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात, तसे पुरुषांमध्ये होणार नाहीत. इतर औषधांप्रमाणे आधी उंदरांवर या गोळीची चाचणी घेण्यात आली. नंतर नाॅन-ह्युमन प्राइमेट म्हणजे वानरगणांवर चाचणी झाली. दोन्हींमध्ये चांगले परिणाम आले.
गोळी बंद केल्यानंतर उंदरांमध्ये ४ ते ६ आठवड्यांमध्ये, तर वानरांमध्ये १० ते १५ आठवड्यांमध्ये प्रजननक्षमता परतली. यानंतर आधीच नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या १६ धडधाकट पुरुषांवर क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या. या मानवी सुरक्षा चाचण्यांचे प्राथमिक निष्कर्ष अत्यंत उत्साहवर्धक आहेत. ‘वायसीटी-५२९’ गर्भनिरोधक गोळी पुरुषांची शूक्राणू निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाची चयापचय प्रक्रिया थांबविते. रेटिनाॅइक ॲसिड रिसेप्टर अल्फा (आरएआर-ए) प्रथिनांना लक्ष्य बनविते. परिणामी, शुक्राणू तयारच होत नाहीत आणि गर्भधारणेचा प्रश्नच निर्माण होत नाही. न्यूयाॅर्कमधील वेल कार्नेल मेडिसीनमधील संशोधकही ‘टीडीआय-११८६१’ नावाच्या अशाच गोळीवर काम करीत आहेत. तिचे प्रयोग सध्या उंदरांवर सुरू आहेत. त्यात आढळले की, ही गोळी सोल्युबल ॲडनेलील सायक्लेज नावाच्या प्रथिनांचे स्त्रवण थांबविते. त्यामुळे शूक्राणूंची गती काही तासांसाठी संथ होते.
हे नवे संशोधन संततिनियमनाचे महिलांवरील ओझे कमी करील. हार्मोनल व नाॅन-हार्मोनल अशा दोन्ही प्रकारच्या गर्भनिरोधक उपायांमुळे होणारे दुष्परिणाम सध्या महिला भाेगतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टिन अशी संप्रेरके प्रसवणाऱ्या गोळ्या किंवा दर तीन महिन्यांनी घ्याव्या लागणाऱ्या इंजेक्शनमुळे मळमळ, डोकेदुखी, उदासीनता, मासिक पाळीतील अनियमितता, चिडचिड व अस्वस्थता असे दुष्परिणाम होतात. रक्ताच्या गाठी होतात. गोळ्यांच्या अतिवापराने हाडे ठिसूळ होतात. हृदयरोग, कर्करोगाचा धोका उद्भवतो. त्वचेवर लावण्याचे पॅच किंवा गर्भनिरोधक रिंगचे दुष्परिणाम अधिकच असतात. काॅपर आयडी म्हणजेच तांबी, फिमेल कंडोम, सर्व्हायकल कॅप, स्पर्मिसाइड्स ही साधनेही धोकादायक आहेत. अशावेळी पुरुष गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांना या सगळ्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकेल.
पुरुषांवर संततिनियमनाची जबाबदारी टाकणाऱ्या या गोळ्या लगेच उद्या बाजारात येतील असे नाही. असे कोणतेही नवे औषध बाजारात आणताना अधिकाधिक चाचण्या घेण्यात येतात. हे औषध मानवी आरोग्यासाठी अगदीच सुरक्षित आहेत, याची खात्री करून घेतली जाते. तूर्त या संशोधनाचे महत्त्व हेच की, पाळणा लांबविण्याची जबाबदारी एकट्या स्त्रीवर टाकून पुरुषांना नामानिराळे राहता येणार नाही. अर्थात, त्यापुढे पोटात मूल वाढविणे, त्याला जन्म देणे हे बाईलाच निभवावे लागणार असले, तरी अपत्यप्राप्तीच्या निर्णयात पुरुषांना अधिक जबाबदारी उचलता येईल, हे महत्त्वाचे!
shrimant.mane@lokmat.com