आकाशातही दहशतवादी
By Admin | Updated: July 19, 2014 08:46 IST2014-07-19T08:46:46+5:302014-07-19T08:46:46+5:30
मलेशियाचे प्रवासी विमान रॉकेटच्या मार्याने जमीनदोस्त करणार्या युक्रेनविरोधी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा दिली गेली पाहिजे.

आकाशातही दहशतवादी
अॅमस्टरडॅमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियाचे प्रवासी विमान रॉकेटच्या मार्याने जमीनदोस्त करणार्या व त्यातील २९५ प्रवाशांचा हकनाक बळी घेणार्या युक्रेनविरोधी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा दिली गेली पाहिजे. युक्रेनच्या भूमीवर या विमानाच्या सापडलेल्या ब्लॅकबॉक्समध्ये रॉकेट उडविणारे दहशतवादी आणि त्या दुर्दैवी विमानाचे वैमानिक यांचे संभाषण नोंदविले गेले आहे आणि ते ऐकणार्यांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. कसेही करून हे विमान पाडायचेच असा मनसुबा आखून या दहशतवाद्यांनी ते पाडले व त्यातील निरपराधांचे प्राण घेतले. प्रवासी विमाने जेमतेम ३0 ते ५0 हजार फुटांच्या उंचीवरून आकाशात उडतात आणि पाहायला बरेचदा दुर्बिणींचीही गरज नसते. ती पाडायची व त्यातील माणसांचे बळी घ्यायचे असे जगभरच्या दहशतवाद्यांनी उद्या ठरविले तर विमानप्रवास यापुढे असुरक्षित होणार आहे. मलेशियन एअरलाईन्सचे एकाच वर्षात कोसळलेले हे दुसरे विमान आहे. मार्च महिन्यात त्या देशाचे ७७७ याच श्रेणीतले प्रवासी विमान बेपत्ता झाले व ते कुठे कोसळले याचा नक्की पत्ता अजूनही लागलेला नाही. त्यामागचे कारणही कोणाला अजून कळले नाही. युक्रेन हा एकेकाळी रशियाच्या सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता. आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र देश म्हणून तो उदयाला आला. त्यातील क्रिमिया या प्रांतात रशियन वंशाचे लोक बहुसंख्य आहेत. रशियाचे सध्याचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आल्यापासून क्रिमियातील रशियनवंशीयांचा ओढा रशियाकडे वाढला व आम्हाला रशियात सामील व्हायचे आहे असे म्हणत त्यांनी एक उग्र आंदोलन सुरू केले. त्या प्रांतात त्यांनीच घेतलेल्या लोकमताच्या कौलातले बहुमतही रशियाच्या बाजूने गेले. रशियन वंशाचे लोक सोडून तेथील इतरांनी त्या कौलावर बहिष्कार घातला होता हे येथे लक्षात घ्यायचे. त्यानंतर रशियाने क्रिमियाचा भाग आपल्यात रीतसर सामीलही करून घेतला. नंतर रशियाची नजर एकूणच युक्रेनकडे वळली आणि त्या देशावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याला आजवर केला जाणारा इंधनपुरवठा रशियाने थांबविला. रशियाच्या या कारवाईविरुद्ध अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन रशियाची आर्थिक नाकेबंदी केली. पण रशियावर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. पुतीन यांची साम्राज्याकांक्षा वाढली असल्याची व त्यांना पुन्हा एकवार रशियाच्या ताब्यातले सोव्हिएत साम्राज्य उभे करण्याची महत्त्वाकांक्षा जडली असल्याचा आरोप आता जगात होऊ लागला आहे. मलेशियाचे प्रवासी विमान क्रिमियातील रशियन दहशतखोरांनी या पार्श्वभूमीवर पाडले असेल तर ते रशियाने आपल्या नाकेबंदीला दिलेले उत्तर आहे असेच जगात मानले जाणार आहे. मात्र तसे करण्यासाठी मलेशियन विमानातील निरपराधांचा बळी घेण्यापर्यंत त्यांच्या कारवाईची मजल गेली असेल तर रशियाच्या साम्राज्यवादाने आता एक अतिशय घृणास्पद व अपराधी पातळी गाठली आहे असेच म्हटले पाहिजे. या पुढच्या काळात रशियाचे राज्यकर्ते आपल्या कानावर हात ठेवून या घटनेशी आपला संबंध नसल्याचे सांगतील. क्रिमियन दहशतखोरांचे ते कृत्य त्यांनी आमच्या संमतीवाचून केले असेही ते सांगू शकतील. पण त्या दहशतखोरांना तसे करण्यापासून रोखण्याचे बळ व क्षमता पुतीन आणि रशियाच्या राजवटीत नक्कीच आहे. ती त्याने वापरली नसेल व क्रिमियन दहशतखोरांना असे मोकळे रान दिले असेल तर त्यामुळे रशियाचा अपराधही लहान ठरत नाही. क्रिमियामध्ये सुरू असलेल्या दहशती कारवायांना रशियाचे पाठबळच नव्हे तर शस्त्रबळही मिळाले आहे. या दहशतखोरांच्या युक्रेनविरोधी कारवायांना रशियाने उघड पाठिंबाही दिला आहे. तसे करताना युक्रेनवर आपले नियंत्रण आणण्याच्या आकांक्षा त्याने कधी लपवूनही ठेवल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रशियाला या अपराधापासून पूर्णपणे मुक्त होता येणे अवघड ठरणार आहे. मात्र दोन देशांतील अशा संघर्षात तिसर्या देशाचे विमान पाडले जाणे व त्यातील शेकडो निरपराधांना हकनाक मृत्युमुखी पडावे लागावे याएवढे निंद्य व निषेधार्ह कृत्य दुसरे असणार नाही. या प्रकरणाचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पातळीवरून कठोरपणे छडा लावण्याची व यातील अपराध्यांना जगाच्या न्यायासनासमोर आणून उभे करण्याची गरज आहे, अन्यथा यापुढचा जागतिक विमान प्रवास धोक्याचा ठरणार आहे.