भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय मुखवटा आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असावा, हे संघ परिवारच ठरवत असते. या पक्षात कुठेही राजकीय पेच निर्माण झाला की अमित शहांपासून राजनाथ सिंहांपर्यंत सारेच जण संघ स्थानावर येऊन नमन करून जातात. संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांना राजाश्रय आणि अर्थाश्रय मिळवून देण्याचेही काम हाच पक्ष करीत असतो. अयोध्येत विटा घेऊन जाण्यापासून तर गावागावांत गंगाजल वाटण्याच्या कामात भाजपाचेच कार्यकर्ते संघाला हातभार लावत असतात. रस्त्यावरील महाआरतीच्या गजरात हे कार्यकर्ते जेवढे भावात्म होतात तेवढ्याच त्वेषाने ते त्रिशूळही वाटतात. संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलात विविध कामगिरी फत्ते केल्यानंतर ‘परिवारातील क्षेत्रबदल’ म्हणून नंतर हेच कार्यकर्ते भाजपात येतात. आजपर्यंत या मंडळींचे असे ‘क्षेत्रबदल’ विनासायास पार पडायचे. आता सत्तास्पर्धेमुळे ते तेवढे सोपे राहिलेले नाही. त्याचे प्रत्यंतर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत येत आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने संघ परिवारातील येथील कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपा आणि संघ असे द्वंद्व या राजकीय आखाड्यात पाहायला मिळत आहे. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी या बंडखोरीचे समर्थन केल्यामुळे बंडखोरांची छाती ५६ इंचाची झाली आहे. संघ स्वयंसेवकांच्या बंडखोरीमुळे नागपुरात भाजपाला कुठलेही नुकसान होणार नाही. पण एरवी शिस्तबद्ध, नि:स्वार्थ, विचारांशी एकनिष्ठ अशी प्रतिमा असलेले संघ स्वयंसेवकही सत्तालोलूप असतात, असे संघाबद्दल ममत्व बाळगणाऱ्यांनाही आता वाटू लागले आहे. या बंडखोरांपैकी एक स्वयंसेवक चक्क बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे. बसपाचा संघाबद्दलचा विखार सर्वश्रुत आहे. असे असताना या स्वयंसेवकाने संघाच्याच बालेकिल्ल्यात बसपाची उमेदवारी स्वीकारणे, ही बसपाची सरशी की संघाची अवनती? हा शाखेतील बौद्धिकाचा विषय व्हावा एवढा संभ्रम संघजनात निर्माण झाला आहे. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांची भावसून शिवसेनेकडून लढत आहे. जोशींनी शाखेसोबतच घराकडेही लक्ष दिले असते तर त्यांच्याच घरच्यांनी संघ संस्काराची अशी माती केली नसती. नागपूर मनपा निवडणुकीत यावेळी अधोरेखित करता येणारी एक बाब ही की, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी सर्वसामान्य जागांवरही ओबीसी उमेदवार उभे केले आहेत. भाजपाच्या भविष्यातील राजकारणाचे हे सूचक आहे. संघ स्वयंसेवकांना नेमकी हीच गोष्ट खटकत आहे. सर्वसाधारण जागांवरचा आमचा हक्क तुम्ही का डावलता? हेच संघ कार्यकर्त्यांचे दुखणे आहे. या दुखण्यातूनच या बंडखोरीला खतपाणी घातले जात आहे. ओबीसी राजकारण ही फडणवीस-गडकरींची भविष्यातील गरज आहे. त्याशिवाय भाजपा बहुजन केंद्रित होणार नाही, याची त्यांना जाणीवही आहे. संघ विचारांची पुरचुंडी घेऊन पक्ष एका मर्यादेपलीकडे वाढू शकत नाही. सबब भाजपा विरुद्ध संघ हा संघर्ष दृश्य परिणाम साधण्यासाठी त्यांनाही हवा आहे. विजयादशमीच्या दिवशी गणवेश घालून संघ स्थानावर जाण्याचा नित्यक्रम हे दोघेही जण इमानेइतबारे पार पाडतात. पण, राजकारण मात्र बहुजनांचेच केले पाहिजे, हेही त्यांना ठाऊक आहे. भाजपातील बहुजन नेते, कार्यकर्ते संघाला मानत नाहीत. काही संघ पदाधिकाऱ्यांच्या आगाऊपणामुळे हे नेते तसेही त्रस्त असतात. बौद्धिक वर्गापलीकडे संघाची लुडबूड नकोच, ही भावना भाजपात नव्याने येत असलेल्या नेत्यांमध्ये आहे. संघ कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून भाजपातीलच बहुजनवादी कार्यकर्त्यांना फडणवीस-गडकरींनी एक आश्वासक संदेश दिला आहे. ही बाब राजकीयदृष्ट्या त्यांच्या पथ्यावरच पडणारी आहे. संघाशी वैचारिक मूळ कायम ठेवायचे पण राजकीय पक्ष म्हणून त्यांच्याशी अंतर राखायचे ही भाजपाची नवी रणनीती आहे. यातून एक परिणाम असा संभवतो की पुढच्या काळात भाजपातील गणवेशधारी आणि गणवेशाचा तिरस्कार करणारे, अशा दोन गटातील कार्यकर्त्यांचे ‘शीतयुद्ध’ तीव्र होणार आहे. याची सुरुवात एव्हाना झालेली आहे. - गजानन जानभोर
संघाचे बंडखोर
By admin | Updated: February 13, 2017 23:32 IST