देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:26 AM2019-01-30T04:26:40+5:302019-01-30T04:26:54+5:30

‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे केले होते भूमिपूजन; देशवासीयांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे केले आवाहन

The 'Te' speech of 'George' awakening patriotism | देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

googlenewsNext

नागपूर : जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या वेळी देशातील सैनिकांची मूठ मजबूतच हवी, असे आग्रही प्रतिपादन करीत त्यांनी देशवासीयांना भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन केले होते.

२१ जून २००० रोजी सिव्हिल लाइन्स येथील हिस्लॉप महाविद्यालयाजवळील जागेत वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री हरीन पाठक, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व तत्कालीन खासदार विजय दर्डा, तत्कालीन ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री तसेच ‘लोकमत’चे वर्तमान ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी झालेल्या जोशपूर्ण भाषणात जॉर्ज फर्नांडिस यांनी देशप्रेमाचे स्फुलिंग जागविले होते. स्वातंत्र्याची लढाई आपण का लढलो होतो, कुठली मूल्ये त्यामागे होती, सैनिक सीमेवर धारातीर्थी का पडत आहेत आणि आपण नेमके कुठे आहोत, असे प्रश्नच त्यांनी नागरिकांसमोर उपस्थित केले होते. सैनिकांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान हे भ्रष्टाचार व अत्याचार मिटविण्यासाठी होते. वाईट कामे करणाऱ्यांना सूट देण्यासाठी नव्हते. सैनिक आपल्या देशाची मूठ आहे. ती मजबूत असलीच पाहिजे. अर्धांगवायू झालेले बाहू चालणार नाहीत. यासाठी देशाला भ्रष्टाचारमुक्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले होते.

गणवेशात असलेल्या एका मेजरला कारगीलला जात असताना रेल्वे आरक्षणासाठी १०० रुपयांची लाच द्यावी लागल्याची घटना सांगत त्यांनी संपूर्ण सभागृहाला आत्मचिंतन करायला भाग पाडले होते. फर्नांडिस यांनी ‘लोकमत’च्या पुढाकाराचे विशेष कौतुकदेखील केले होते.

जॉर्ज गरिबांचा आवाज होते
जॉर्ज फर्नांडिस हे खरे समाजवादी नेते होते. ते गरीब तसेच वंचितांचा आवाज होते. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे तसेच आमच्या कुटुंबाचे ते घनिष्ट मित्र होते. जॉर्ज साधे जीवन जगायचे. जेव्हा ते देशाचे संरक्षणमंत्री होते, तेव्हा त्यांनी कारगील युद्धात शहीद जवानांच्या मुलांसाठी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाद्वारे निर्मित वसतिगृहाचे २००० साली नागपुरात भूमिपूजन केले होते. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाद्वारे प्रकाशित लेफ्टनंट कर्नल व्ही. पी. सिंह यांचा राष्ट्रभक्तीने भारलेला कविता संग्रह ‘रक्तांजली’चे लोकार्पणदेखील फर्नांडिस यांनी केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- विजय दर्डा, चेअरमन, ‘एडिटोरिअल बोर्ड’, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह

देशातील कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून, आपण स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाºयांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाºया यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

ज्येष्ठ कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी आयुष्यभर कामगार, कष्टकरी, शोषित, वंचित वर्गासाठी कार्य केले. एका हाकेवर मुंबई बंद करणारे असे ते लोकप्रिय कामगार नेते होते. फक्त मैदानातच नव्हे, तर लोकसभेतही त्यांनी कामगार, वंचितांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे नुकसान झाले आहे.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

कामगार-कष्टकºयांसाठी लढताना स्वत:च्या जीवाची, सुख-दु:खाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचा राजकारणातील सुरुवातीचा काळ संघर्षाचा असतो. मात्र एकदा सत्ता, पद-प्रतिष्ठा मिळाली की, तो तडजोडीचे, हितसंबंध जपण्याचे राजकारण करतो. सामान्य माणसाचे प्रश्न त्याला फार महत्त्वाचे वाटत नाहीत. जॉर्ज फर्नांडिस मात्र आयुष्यभर फक्त लढतच राहिले. ते कधी प्रस्थापित झाले नाहीत. आपल्यातील कार्यकर्तेपण त्यांनी नष्ट होऊ दिले नाही. म्हणून ते माझ्यासाठी ‘आयकॉन’ होते.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री.

Web Title: The 'Te' speech of 'George' awakening patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.