स्काॅटलंडमध्ये एक दुर्गम बेट आहे. हे बेट दिसायला अतिशय देखणं, पण दुर्गम, दूर आणि पाण्यात असल्यामुळं तिथे कायमचं राहण्यासाठी येण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. काही जण पर्यटनासाठी म्हणून तिथं जातात, पण त्यापलीकडे फारसं कोणी या ठिकाणी फिरकत नाही. त्यामुळे इथली लोकसंख्याही अगदी तुरळक आहे. तुरळक म्हणजे किती? - तर फक्त १२०!
कोलोन्से हे या बेटाचं नाव. रिचर्ड आयर्विन हे स्कॉटलंडमधले एक उद्योजक. आज त्यांचं वय ६५ वर्षांचं आहे. पण, ते जेव्हा तरुण होते, त्यावेळी आपलं लग्न झाल्यानंतर हनिमूनसाठी ते या निसर्गरम्य ठिकाणी आले होते. हे ठिकाण त्यांना आणि त्यांच्या पत्नीला इतकं आवडलं की कधीतरी आपण इथेच राहायला आलो, तर काय बहार येईल असा विचार त्यांच्या मनात आला. पण, हा विचार प्रत्यक्षात आणणं खरंच खूप कठीण होतं. कारण, तिथला निसर्ग खुणावणारा असला तरी तिथे कायमस्वरूपी राहणं तसं अवघड होतं.
कारण, जगण्याच्या दृष्टीनं अनेक असुविधा तिथे होत्या. दळवळणाची सुविधा नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी बेटाबाहेर असलेल्या ठिकाणांवर, शहरांवर अवलंबून राहावं लागणार होतं. व्यापार-उद्योग करायचा तर तेही सोपं नव्हतंच. पण, रिचर्ड यांच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता. त्यामुळे अनेक पर्याय त्यांनी तपासले आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतलाच. या बेटावर काही तरी उद्योग सुरू करायचा. त्यानुसार साधारण तीन वर्षांपूर्वी त्यांनी इथे एक छोटा उद्योगही सुरू केला. हा उद्योग त्यांनी वाढवला, नावारूपाला आणला. हे उत्पादन त्यांनी स्कॉटलंडमध्ये पाठवायला सुरुवात केली. पूर्ण वेळ या बेटावर राहूनच हा उद्योग सांभाळणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे रिचर्ड आणि त्यांची पत्नी काही काळ या बेटावर येतात, बेटावर असलेल्या लोकांना उद्योगाच्या कामकाजाची रूपरेषा सांगतात आणि पुन्हा शहरात येतात.
रिचर्ड यांनी या बेटावर उद्योग सुरू केल्यामुळे इथल्या लोकांच्याही रोजीरोटीची सोय झाली. पण, रिचर्ड यांच्यासमोर आता नवीच समस्या उभी राहिली आहे. त्यांचं वय झालं आहे. त्यांच्याकडून अजून फार काळ काम होणार नाही. त्यांनी नावारूपाला आणलेला धंदा आता कोण पुढे नेणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याशिवाय आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे या बेटावरची लोकसंख्याही आता म्हातारी होत आहे. आधीच इथली लोकसंख्या बोटावर मोजण्याइतकी, त्यात तरुणांची संख्या तर अगदी नगण्य, त्यामुळे रिचर्ड चिंताक्रांत आहेत.
या बेटाच्या आणि इथल्या लोकांवरील प्रेमापोटी आता त्यांनी जाहीर केलं आहे, कोणातरी तरुणानं माझा हा उद्योग ताब्यात घ्यावा. मोठ्या कष्टानं उभारलेला हा सगळा डोलारा मी त्याला अगदी फुकटात द्यायला तयार आहे. त्यानं फक्त हा उद्योग वाढवावा, इथल्या लोकांची काळजी घ्यावी आणि या बेटावरील लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
या बेटावर किराणा मालाचं एक दुकान, पुस्तकांचं एक दुकान, एक गॅलरी आणि एक छोटीशी शाळा आहे. या शाळेकडे पाहून त्यांचे डोळे डबडबतात. सध्या या शाळेत फक्त चार मुलं आहेत. इथल्या शाळेत आणि घरांत गोकुळ नांदावं हीच त्यांची आता अखेरची इच्छा आहे..