ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 07:57 AM2021-07-23T07:57:48+5:302021-07-23T07:58:11+5:30

मी आणि माझी बायको गौरी, दोघेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक आहोत! स्टेडियम्स रिकामी असली, तरी आमची मने उत्साहाने भरलेली असतील!!

t shirts to be worn to empty chairs in olympic | ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स

ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स

Next

- राकेश शेंबेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातला सर्वात मोठा इव्हेन्ट आज जपानमध्ये घडत आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२१! सगळ्या जगाचं ऑलिम्पिककडे लक्ष लागून असलं आणि त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात टोकियोत; जपानमध्ये काय स्थिती दिसतेय?  एक नक्की की, ऑलिम्पिक म्हटल्यावर जो उत्साह, जे चैतन्य, जो जोश नागरिकांमध्ये दिसायला पाहिजे तसा तो इथे अजिबात नाही. अर्थातच याला कारण कोरोना! एरवी जपानी लोक  अत्यंत उत्साही. त्यांना साजरं करण्यासाठी कसलंही निमित्त पुरतं. इथे तर थेट  ऑलिम्पिकच, म्हणजे जपान्यांचा उत्साह खरं तर शिगेला पोचला असता एरवी. पण ‘नॉर्मल’ परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप अंतर आहे. जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला असताना,  बिकट अवस्थेशी झुंजणाऱ्या जपानमध्ये ऑलिम्पिकच्या उत्साहाऐवजी भीतीच जास्त दिसते.

 इथे टोकियोत चार प्रकारचे लोक दिसतात. काहींना ऑलिम्पिकशी काहीच देणंघेणं नाही... अजूनही ऑलिम्पिक रद्दच करावं असं काहींना वाटतं...काही जण तटस्थ आहेत, म्हणजे ऑलिम्पिक होवो, अथवा न होवो, त्यांना फारसा फरक पडत नाही आणि चौथा गट आहे ऑलिम्पिकसाठी अतिशय उत्साही आणि आतूर असलेल्यांचा, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचा... 

रस्त्यावर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऑलिम्पिकचा फारसा उत्साह दिसत नसला, तरी ऑलिम्पक व्हिलेज, ज्या ठिकाणी खेळाडू राहातात, त्या ठिकाणी मात्र उत्साहाला उधाण आलेलं दिसतं. ऑलिम्पिकनिमित्त सरकारनं शनिवार, रविवारला जोडून आणखी दोन दिवस कर्मचाऱ्यांना सुट्या म्हणजे चार दिवसांचा मोठा विकेंड जाहीर केला आहे. पण ऑलिम्पिकची झलकही  दिसणार नसेल, तर इथे तरी कशाला थांबा, असं म्हणून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे प्लॅन रचले आहेत. तिथे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर बसून टीव्हीवर सामन्यांचा आनंद घेऊ म्हणून त्यांनी आपापल्या बॅगा भरल्या आहेत. 

ऑलिम्पिकच्या निमित्तानं इथे साधारण अडीच वर्षांपूर्वी व्हाॅलेन्टिअर्स (स्वयंसेवक) नेमण्याची सुरुवात झाली. त्यावेळी लोकांमध्ये उदंड उत्साह होता. त्यासाठी  लाखो लोकांनी अर्ज केले होते. त्यातल्या केवळ साठ हजार लोकांची निवड झाली. त्यात मी आणि माझी बायको गौरी, आम्ही दोघेही होतो!  पण त्यावेळचा उत्साह आणि आताचा उत्साह यात मात्र जमीनअस्मानाचं अंतर आहे. बाहेरच्या काय, घरच्याही प्रेक्षकांना प्रवेश नाही म्हटल्यावर आम्हाला काही कामच उरलं नाही. स्टेडियमभोवती भिंती उभारून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेकांचं स्वयंसेवकपदच रद्द करण्यात आलं. त्यावेळचं प्रत्येकासाठीचं मिशनही ‘टू मेक द गेम सक्सेसफूल’ असं होतं, ते आता फक्त ‘टू सपोर्ट द गेम’ एवढ्यापुरतंच उरलं आहे. 

कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्यात इथे कोरोना रुग्णांची संख्या दररोज जास्तीत जास्त ३,५०० इतकी होती. आपल्या दृष्टीनं ही संख्या ‘खूप तुटपुंजी’ वाटत असली तरी जपान्यांसाठी ती खूप होती आणि त्यामुळे ते हादरले होते. नंतर ही संख्या कमी होत दोन आकडी म्हणजे रोज ९०-९५ इतकी खाली आली, पण इथला ताजा - बुधवारचा कोरोना रुग्णांचा आकडा होता १,८००! कोरोना जर पसरत गेला, तर ऑगस्टपर्यंत रुग्णांची रोजची संख्या ३,००० पर्यंत जायला वेळ लागणार नाही, याची भीती नागरिकांमध्ये आहे. 

जपानमध्ये वेगवेगळ्या देशांतून खेळाडूंसकट ६० हजार लोक आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यातील युगांडाचा एक खेळाडू पळून गेला, तरी जपानमध्ये ती खळबळजनक घटना ठरली होती. साठ हजारातून एक जण मिसिंग, ही म्हटलं तर फार मोठी गोष्ट नाही, पण राष्ट्रीय माध्यमांनीही याची खूप मोठी दखल घेतली आणि लोकांमध्ये तो चर्चेचा विषय होता.  जनतेत उत्साह दिसत नसला, जागोजागी बॅनर्स, लायटिंग, झगमगाट असला काहीही प्रकार दिसत नसला, तरी ऑलिम्पिक जसजसं पुढे सरकेल, चाहत्यांचे आवडते खेळाडू जिंकत जातील, तसतसं लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाला उधाण येत जाईल. ऑलिम्पिकबाबतचं वातावरण काहीसं उदासीन असलं तरी जपानी लोक ऑलिम्पिक यशस्वी करतील याविषयी कोणतीही शंका नाही. आम्हा स्वयंसेवकांचं ट्रेनिंगही अतिशय जोरात सुरू आहे. येणाऱ्या पाहुण्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. आम्हा प्रत्येक स्वयंसेवकाला एक किट दिलं गेलं आहे. त्यात बॅग, टी शर्ट‌्स, शूज, कॅप इत्यादी गाेष्टी आहेत. हे किट आणि इथला अनुभव म्हणजे आमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असेल, पण स्टेडियम रिकामं, ओकंबोकं वाटू नये, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, यासाठी आम्हाला दिलेले टी-शर्ट‌्स आम्ही रिकाम्या खुर्च्यांना घालणार आहोत... वातावरणात प्रफुल्लता नसेल, पण पाहुण्यांच्या स्वागतात आणि आयोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही हे नक्की! 
rakesh.shembekar@gmail.com
 

Web Title: t shirts to be worn to empty chairs in olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.