उन्हाळ्याची देणगी
By Admin | Updated: May 1, 2016 03:15 IST2016-05-01T03:15:22+5:302016-05-01T03:15:22+5:30
मेमहिना आत्ता कुठे सुरू झाला आहे. अजून अख्खा महिना या उकाड्यात काढायचा, कसं होणार? असे तक्रारीवजा सूर या दिवसांत घरोघरी ऐकायला मिळतात. त्याचबरोबरीने रंगतात

उन्हाळ्याची देणगी
- भक्ती सोमण
मेमहिना आत्ता कुठे सुरू झाला आहे. अजून अख्खा महिना या उकाड्यात काढायचा, कसं होणार? असे तक्रारीवजा सूर या दिवसांत घरोघरी ऐकायला मिळतात. त्याचबरोबरीने रंगतात ते गावाला जायचे बेत. कारण तिथे तर आजीच्या हातचे पदार्थ खायला मिळणार असतात. पण गावात किंवा शहरात काय हा उन्हाळा संपूर्ण वर्षासाठी पर्वणीचा महिना असतो. वर्षभराचे तिखट, मसाला करायचा आहे. काही हरकत नाही! दुपारच्या उन्हात लाल मिरच्यांना आणि खड्या मसाल्यांना काही दिवस उन्ह दाखवलं की पुरतं. मग थोडंसंच भाजून मिक्सरवरून काढलं की मसाला तयार असतो. उन्हात भाजल्यामुळे पदार्थांना आलेला खमंगपणा घरच्यांनाही तृप्त करतो. त्यामुळेच विविध मसाल्यांची रेलचेल या महिन्यात बघायला मिळते.
या काळात तयार केले जाणारे पदार्थ म्हणजे पापड, कुरडया, सांडगे वगैरे. गावात हे पदार्थ करताना येणारी मजा खूपच भारी असते. माझ्या घोसाळा गावात या दिवसांत पापडांसाठी होणारी लगबग अनुभवली आहे. दुपारी जेवणं झाली की माझी अलका आजी मामीबरोबर पापडाची तयारी करते. त्यासाठी उखळीवर पोह्याचे पीठ, तिखट मीठ वगैरे घालून ते कुटले जायचे(आजही जाते). एकदा तिची या गोळ्याबद्दल खातरी झाली की मग गावातल्याच बायका पापड लाटायला बसायच्या. हे करताना मध्येच तो गोळा खाण्यासाठी आम्हा मुलांची मस्ती चालू असायची. आमच्या मागण्यांना कंटाळून मग आजी उखळीवर पुन्हा डांगर करण्याठी झटायची. पोह्याचे ते डांगर तेलाबरोबर खाणे म्हणजे... त्यासाठी शब्दच अपुरे.
तर तांदूळ तीन दिवस पाण्यात ठेवून ते आंबवून घ्यायचे मग दळून घ्यायचे. फणसाच्या पानावर फेण्या सारवून त्या वाफेवर उकडवायच्या. त्या मऊसूत तांदळाच्या फेण्या आणि पिकलेल्या आब्यांचा वर्षभर टिकणारा साखरांबा करावा तोही कमला आजीनेच. तर मालती आजी आंब्याचा रस काढून तो शिजवून वर्षभरासाठी करायची. या आणि अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या असतील.
विविध साठवणीचे पदार्थ या कालावधीत होतात. ते करताना गृहिणीला मिळणारे समाधान हे घरातल्यांना वर्षभर सुख देणारे असते. म्हणूनच मे महिन्याच्या घामाच्या या धारा श्रमसाफल्य झाल्याचा आनंद देतात ते उगाच नाही!
वाळवलेल्या पदार्थांचा उपयोग
या कालावधीत भाज्या वाळवून वर्षभर त्यांचा वापर करता येऊ शकतो. काही पंजाबी भाज्यांमध्ये कसुरी मेथी घालतात. ही कसुरी मेथी म्हणजेच उन्हाळ्यात वाळवलेली मेथी. ही मेथी बटाटा घालूनही छान लागते. मेथीप्रमाणे पालक, लाल माठ यांच्याबाबतीतही असे प्रयोग होऊ शकतात. तर मुगाचे भजीला लागते त्याप्रमाणे थोडे जाडसर पीठ घेऊन त्याचे छोटे गोळे उन्हात वाळवायचे. ते वर्षभर टिकतात. या मुगवड्या दुधीची भाजी करताना घालता येतात. शिवाय आलं, लसूण, कांदा, टॉमेटो यांचे वाटण करून त्या ग्रॅव्हीत थोड्या तेलात परतून मग उकडलेल्या मुगवड्या घालून केलेली भाजी केवळ अप्रतिम लागते.