अशी ‘राष्ट्रभक्ती’ हा विस्तवाशी खेळ!
By Admin | Updated: April 8, 2016 02:40 IST2016-04-08T02:40:00+5:302016-04-08T02:40:00+5:30
वैचारिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आखलेली रणनीती त्या भूमिकेपेक्षा वरचढ ठरत गेली, तर काय होते, हे सध्या काश्मीर खोऱ्यात पाहायला मिळत आहे.

अशी ‘राष्ट्रभक्ती’ हा विस्तवाशी खेळ!
वैचारिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आखलेली रणनीती त्या भूमिकेपेक्षा वरचढ ठरत गेली, तर काय होते, हे सध्या काश्मीर खोऱ्यात पाहायला मिळत आहे. श्रीनगर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ (एनआयटी) या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेत विद्यार्थ्यांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने जो गदारोळ उडाला आहे, त्यामागचे खरे कारण संघ परिवाराची रणनीती, हिंदू राष्ट्र निर्मिताच्या अंतिम उद्दिष्टापेक्षा वरचढ ठरत गेली, हे आहे. या संंस्थेतील एकूण तीन हजार विद्यार्थ्यांपैकी दोन हजार बिगर काश्मीरी आहेत तर उरलेल्या एक हजारापैकी प्रत्येकी ५०० जम्मू व काश्मीर खोऱ्यातील आहेत. संस्था स्थापन झाल्यापासून गेल्या नऊ वर्षांत तेथील उभय विद्यार्थ्यात हाणामारी सोडा, नुसती तेढही कधी निर्माण झाली नव्हती. या संस्थेच्या परिसरातच काश्मीर विद्यापीठ आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्याच्या घटना कधी घडलेल्या नव्हत्या. या काळात काश्मीर खोऱ्यात विद्यार्थ्यांची अनेक आंदोलने झाली व त्यात भारत विरोधी घोषणा दिल्या जाऊन पाकिस्तानी झेंडेही फडकावले गेले. त्यात काश्मीरी विद्यार्थ्यांपैकी काही सामीलही होत आले. किंबहुना दर शुक्र वारीच नमाज झाल्यावर श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर काही शहरे व गावात भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जात असतात. जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ च्या अखेरीस निवडणुका झाल्यावर मुफ्ती महमद सईद यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी’ (पीडीपी) व भाजपा यांचे आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावरही हे घडत राहिले होते. आजही ते घडत असते. मात्र त्यावेळी कधी ‘देशविरोधी’ घोषणा हा मुद्दा अटीतटीचा बनला नव्हता. राज्यातील साडेतीन महिन्यांच्या राष्ट्रपती राजवटीनंतर मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री होऊन भाजपा-पीडीपी यांचे आघाडीचे नवे सरकार स्थापन होऊन दोन दिवस उलटायच्या आतच हा वाद उफाळून आला व त्याचे पर्यवसान आता राजकीय पेचप्रसंगात झाले, हा निव्वळ योगायोग नाही. मेहबुबा मुफ्ती यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपा हा तेथील सरकारचा एक घटक असतानाही संस्थेत राज्य पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केल्याचे सांगून केंद्राने तेथे स्वत:चे राखीव दल पाठवले आहे. एक प्रकारे ‘आम्ही सरकारात असलो, तरी राज्यातील पोलिसांवर आमचा विश्वास नाही’, असेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना भाजपा सांगत आहे. भाजपाला कल्पना आहे की, हे आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही आणि पुन्हा एक दीड वर्षांच्या कालावधीतच निवडणुका होतील. त्या दृष्टीने जे काही डावपेच खेळायचे ठरविण्यात आले आहेत, त्यातील पहिला डाव हा ‘एनआयटी’च्या निमित्ताने खेळला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण ही संघाची रणनीती आहे. त्यापायीच छोटे-मोठे भाजपा नेते आणि संघ परिवारातील सरसंघचालकांपासून इतर हवशे-नवशे-गवशे यांच्यापर्यंत सर्व जण हेतूत: ‘भारतमाते’च्या मुद्यावरून उलट सुलट विधाने करीत आले आहेत. पण ‘जेएनयू’ किंवा हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ येथे केवळ राजकारणासाठी हा ‘राष्ट्रभक्ती’चा खेळ खेळणे आणि काश्मीरात तसा प्रयत्न करणे, यात मूलभूत फरक आहे. हा फरक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमीचा. तीच संघाला मान्य नसल्याने ‘या घटनेच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच राष्ट्रभक्तीचा हुंकार उमटत आहे’, अशी संघाची भूमिका आहे. ‘आम्हाला राष्ट्रध्वज घेऊन संस्थेच्या प्रांगणात मोर्चा काढायला परवानगी नाकारण्यात आली, आमचा राष्ट्रध्वज काढून घेण्यात आला’, असा आरोप या संस्थेतील सर्वसामान्य बिगर काश्मीरी विद्यार्थी अचानक करू लागले आहेत आणि तसाच आरोप मनुष्यबळ विकास खात्याने पाठवलेल्या दोन सदस्यांच्या पथकापुढे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांनी केला. ‘आम्हाला आमचा राष्ट्रध्वज परत द्या, तो संस्थेच्या प्रांगणात फडकावयाची परवानगी द्या’, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर आम्हाला आता या संस्थेत राहायचे नाही, आम्हाला देशातील इतर संस्थात प्रवेश द्या किंवा ही संस्था राज्याबाहेर हलवा, असेही त्यांचे म्हणणे आहे. आज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचे मोठे आव्हान नाही. तेथील दहशतवाद काबूत आणला असला तरी राजकीय पेचप्रसंग कायम आहे आणि संघ परिवाराच्या या रणनीतीमुळे तो अधिक बिकट व गुंतागुंतीचा बनत जाणार आहे. धोका असा आहे की, तो जर टोकाला गेला, तर दहशतवाद पुन्हा उफाळून येण्याचा तो टप्पा ठरू शकतो. हे घडणे देशाच्या हिताचे नाही; कारण नव्याने उफाळून येण्याची शक्यता असलेल्या दहशतवादात खोऱ्यातील तरूणांचा मोठा सहभाग असेल. पाकला नेमके तेच हवे आहे. ही १९८९ ची पुनरावृत्ती ठरेल. त्यामुळे संघ परिवाराच्या ‘देशभक्ती’च्या व्याख्येत ‘देशहित’ बसत असेल, तर त्याने विस्तवाशी चालवलेला हा खेळ ताबडतोब थांबवायलाच हवा.