मध्यमवर्गीय मनाेहर चेहऱ्याचे यश व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 09:08 PM2019-03-18T21:08:22+5:302019-03-18T21:27:29+5:30

गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली.

The success and limitations of manohar parrikar | मध्यमवर्गीय मनाेहर चेहऱ्याचे यश व मर्यादा

मध्यमवर्गीय मनाेहर चेहऱ्याचे यश व मर्यादा

googlenewsNext


- प्रशांत दीक्षित 

मनोहर पर्रिकर यांचे अकाली निधन ही देशातील बहुसंख्य जनतेसाठी चटका लावणारी घटना असली तरी मध्यमवर्ग, विशेषतः उच्चशिक्षित मध्यमवर्गाला याचे अधिक दुःख झाले. मध्यमवर्गाला आवडणारी मूल्ये जपणारा पर्रिकर हा चेहरा होता. ते गोव्याचे असले तरी महाराष्ट्रातील मराठी माणसांनाही पर्रिकरांमध्ये आपल्या मनातील आदर्श नेता भेटत होता.

गरिबीत जन्म घेऊनही कष्टाने साध्य केलेले उच्चशिक्षण, त्यातही आयआयटी सारख्या प्रख्यात संस्थेत गुणवत्तेवर प्रवेश, शिक्षणानंतरही वागण्या बोलण्यातील मध्यमवर्गीय साधेपणा, जवळच्या नात्यात प्रेमविवाह, त्यानंतरही नोकरी न करता व्यवसाय करण्याचे धाडस, मुंबईला चिकटून न राहता जन्मगावाची ओढ, तेथेच व्यावसायिक यश, त्यानंतर राजकारणात प्रवेश, राजकारणातही सचोटी, साधेपणाची जपणूक, तरीही राजकीय हुशारीची चुणूक, भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर निर्णय घेण्याची क्षमता, कित्येक वर्षे राजकारणात राहूनही सत्ता, संपत्ती वा बुद्धिमत्ता याचा दर्प नाही, पत्नीच्या अकाली मृत्यूनंतरही चारित्र्यसंपन्न कौटुंबिक आयुष्य आणि यश हाती असूनही महत्त्वाकांक्षेचा अभाव... पर्रिकरांमधील हे गुण मध्यमवर्गीयांना मनापासून भावणारे होते.

तथापि, याहून आणखी एक महत्त्वाचा पैलू पर्रिकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होता. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये हा पैलू महत्त्वाचा असावा. गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली.

गोव्याच्या पार्श्वभूमीवर पर्रिकरांच्या नेतृत्वशैलीतील हा पैलू फार महत्त्वाचा आहे. तसा तो देशासाठीही महत्त्वाचा आहे. गोव्याला हिंदू-ख्रिश्चन वादाचा इतिहास आहे. गोवा मुक्ती आंदोलनालाही या वादाची किनार होती. तेथे ख्रिश्चन २५ टक्क्यांहून अधिक आहेत. पर्रिकर हे लहान वयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले होते. संघाने आदेश दिल्यानंतरच ते भाजपामध्ये आले असे म्हणतात. संघावरील आपली निष्ठा पर्रिकरांनी कधीही लपविली नाही. तसेच अल्पसंख्यांकांच्या अनुनयाच्या विरोधात स्पष्ट बोलणेही टाळले नाही. पण राजकारण करताना किंवा सत्तेवर आल्यानंतरही गोव्यात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता पर्रिकरांना घेतली. त्यांच्या कारभाराला धार्मिक अजेंडा नव्हता, तर भ्रष्टाचारमुक्त कार्यक्षम कारभार करण्यावर त्यांनी फोकस ठेवला. यामुळेच त्यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांना चर्चचे पाठबळ मिळाले. हिंदुत्ववादी शक्ती आणि चर्च यांच्यात देशात इतरत्र संघर्ष उडत असताना गोवा त्यापासून मुक्त राहिले. पर्रिकरांच्या कारभाराचे हे वैशिष्ट्य होते.

असा कारभार करण्यासाठी सेक्युलर मुखवटा चढवावा लागत नाही हेही पर्रिकरांनी दाखवून दिले. हिंदू ओळख ठसठशीतपणे ठेवूनही वेगळा कारभार करता येतो याचे पर्रिकर हे उत्तम उदाहरण होते. मध्यमवर्गाला ते यामुळेच आपलेसे वाटत होते. मध्यमवर्गाला कडवे हिंदुत्व नको असते. पण हिंदू म्हणून घेतल्याबद्दल हिणवले गेलेले त्याला आवडत नाही. हिंदू असूनही चांगला कारभार करता येतो याचा पुरावा म्हणून पर्रिकरांकडे मध्यमवर्ग पाहात होता. योगी आदित्यनाथ व मनोहर पर्रिकर यांच्यात हा फरक होता.

मध्यमवर्गीय मूल्यांना राजकारणात काहीही स्थान नाही, अशी मध्यमवर्गाची, विशेषतः उच्चशिक्षित मध्यमवर्गाची खंत असते. राजकारणातील डावपेचात निष्णात तरीही मध्यमवर्गीय मूल्ये न सोडणारा असा नेता दिसला की राजकारणात आपल्यालाही काही स्थान आहे असा दिलासा या वर्गाला मिळतो. सत्तेच्या सापशिडीसाठी गोवा प्रसिद्ध आहे. तसेच भ्रष्ट राजकीय नेत्यांसाठी. या दोन्हींवर मात करीत पर्रिकर कारभार करीत राहिले. मुख्यमंत्री होणारे ते पहिले आयआयटीअन. ही लहानशी बाबही मध्यमवर्गाला सुखावणारी आहे. संघ परिवारातील लोकांना तर अधिक सुखावणारी.

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणारे पर्रिकर हे पहिले मुख्यमंत्री. मोदींची पाठराखण करण्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही. वाजपेयी-अडवाणींच्या प्रभावातून बाहेर पडल्याशिवाय भाजपाचा विस्तार होणार नाही हे पर्रिकर यांनी वेळीच ओळखले होते. लोणच्याची उपमा देऊन अडवाणींना त्यांनी वास्तवाची जाणीव करून दिली होती. भाजपमध्ये मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यात पर्रिकर कमी पडले नाहीत. पाकिस्तानशी कठोरपणे वागले पाहिजे हे सांगण्यात त्यांनी कुचराई केली नाही. पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका झाली असली तरी मध्यमवर्गाला ती आवडली होती.

खऱे तर पर्रिकरांसारखा कारभार अन्य काही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आणि एखादा अपवाद वगळता तेही सामान्य आर्थिक स्थितीतून वर आलेले आहेत. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढमधील रमणसिंह, नितीशकुमार, ओरिसातील नवीन पटनाईक तसेच ममता बनर्जी, अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ही चटकन आठवणारी काही नावे. अन्य नावेही सांगता येतील. साधेपणा व स्वच्छ कारभार ही या नेत्यांचीही वैशिष्ट्ये होती. मनमोहन सिंग यांच्यावर व्यक्तिगत किटाळ नाही हे येथे लक्षात घ्यावे.

मात्र हे नेते मध्यमवर्गाला पर्रिकरांइतके आपलेसे वाटत नाहीत. सुरेश प्रभू वाटतात, पण शिवराजसिंह चौहान वाटत नाहीत. चौहान यांचा कारभारही पर्रिकर यांच्याप्रमाणेच होता. चौहान व रमणसिंह यांनी तर बिमारू राज्ये प्रगतिपथावर आणली. देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक जीडीपी या राज्यांचा होता. पण या नेत्यांची सामाजिक पार्श्वभूमी वेगळी असल्याने त्यांचा कारभार उत्तम असूनही ते मध्यमवर्गाला रोड मॉडेल वाटत नाहीत. ममता बॅनर्जी या आक्रस्ताळ्या असल्याने नकोशा वाटतात. नवीन पटनाईक हे वेगळेच रसायन आहे. ते राजासारखाच कारभार करतात. पृथ्वीराज चव्हाण हा एक स्वच्छ व कार्यक्षम चेहरा असला तरी बहुसंख्य मध्यमवर्गाला काँग्रेसबद्दल थोडा आकस असतो.

मोदीही मध्यमवर्गाला आकर्षित करतात. परंतु, पर्रिकरांबद्दल जशी आत्मीयता मराठी माणसांना वाटते तितकी मोदींबद्दल वाटत नाही. कारण मोदींची सामाजिक पार्श्वभूमी ही मध्यमवर्गीय नाही.

पर्रिकरांसारख्या नेत्यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा का असू नये हेही एक कोडे आहे. आपल्या घरट्यात परतण्यासाठी ते आतुर असत. मोदींनी जशी राष्ट्रीय आकांक्षा बाळगली व ती तडीस नेली तशी नेतृत्व करण्याची रग पर्रिकरांसारख्या नेत्यांमध्ये आढळत नाही. गुजरातसारखे सुरक्षित राज्य सोडून वाराणसीत जाऊन निवडणूक लढण्याची तयारी मोदींनी दाखविली. असे राजकीय साहस ही मध्यमवर्गीय नेतेमंडळी क्वचितच दाखवितात. देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आलेला बेशिस्तपणा व स्तब्ध झालेला कारभार बदलण्याची मोठी संधी पर्रिकर यांना संरक्षणमंत्री म्हणून मिळाली होती. संरक्षण मंत्रालयात नवे वारे खेळविण्याच्या योजनाही त्यांनी आखल्या होत्या. देशाच्या भवितव्याचा विचार करता हे काम खूप महत्त्वाचे होते. पण विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला कमी जागा मिळताच पर्रिकर घराकडे धावले. तेथे त्यांनी राजकीय हुशारी दाखवीत सरकार स्थापन केले व ते चालविलेही. पण देशाच्या संरक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे ऐतिहासिक काम करण्याची संधी गमावली, हेही लक्षात घेतले पाहिजे.

मनोहर पर्रिकरांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करीत असतानाच अशा नेतृत्वाच्या काही मर्यादाही सांगणे आवश्यक आहे. पर्रिकर हे राजकीय नेत्यांसाठी रोल मॉडेल जरूर बनले असले तरी गोवा हे राज्य त्यांना रोल मॉडेल बनविता आले नाही.

गोव्यातील राजकारणात कोणताही गुणात्मक बदल पर्रिकर करू शकले नाहीत. गोव्यासारख्या लहान राज्यामध्ये गुणात्मक वेगळा कारभार करणे शक्य असते. पण बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा प्रदेशात जास्तीत जास्त स्वच्छ कारभार करणे खूप कठीण असते. आणखी एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे पर्रिकरांना नेतृत्वाची दुसरी फळी उभी करता आली नाही. प्रकृती अजिबात साथ देत नसताना त्यांनी शेवटपर्यंत कारभार केला याचे कौतुक जरूर करावे, पण पर्रिकर आजारी असताना त्यांना हवा तसा कारभार चालविणारी व्यक्ती सापडू नये हेही योग्य ठरत नाही. आजही गोव्यात भाजपाकडे पर्रिकरांचा उत्तराधिकारी नाही. हीच गत भाजपची अन्य राज्ये व देश पातळीवर आहे.

व्यक्तिगत कार्यक्षम नेटका स्वच्छ कारभार हे पर्रिकरांसारख्या नेत्यांचे वैशिष्ट्य असते व त्यामुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. पण असा कारभार करणारे एक-दोन विश्वासू त्यांच्याभोवती तयार होऊ नयेत, ही अशा नेतृत्वाची मर्यादा ठरते.

(लेखक लाेकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक आहेत. )

Web Title: The success and limitations of manohar parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.