वारी उपवासी पदार्थांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 03:50 IST2016-07-10T03:50:59+5:302016-07-10T03:50:59+5:30
सध्याचा महिना आहे भक्तिरंगात न्हाऊन निघण्याचा. या काळात खवय्ये साध्या जेवणाला पसंती देतात, तसेच उपवासाचेही पदार्थ याच काळात मोठ्या प्रमाणात केले जातात.

वारी उपवासी पदार्थांची
- भक्ती सोमण
सध्याचा महिना आहे भक्तिरंगात न्हाऊन निघण्याचा. या काळात खवय्ये साध्या जेवणाला पसंती देतात, तसेच उपवासाचेही पदार्थ याच काळात मोठ्या प्रमाणात केले जातात. येणाऱ्या आषाढी एकदशीचे निमित्त साधत उपवासाच्या पदार्थांची केलेली ही खमंगवारी.
आषाढ महिना सुरू झाला आहे. सगळ््यांना आस लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची. हे असे भक्तीने भरलेले दिवस पावसाळा सुरू झाल्यावर येतात. चिंब पावसात कांदाभजीचा आनंद घेताना आई चातुर्मास सुरू होणार असल्याची आठवण करून देते. म्हणजेच आता आपल्याला साबुदाणा खिचडी, वडे असे पदार्थ खायचे आहेत, असे मनसुबे तयार होतात. आषाढी एकादशी जशी जवळ येते, तसे उपवासाच्या पदार्थांच्या सामानाची जुळवाजुळव प्रत्येक घरात सुरू होते. अगदी आता कांदा-लसूण शक्यतो नाहीच, सात्विक साधं अन्न खायचं, असा चंगही अनेक जण बांधतात. यावरून आता पुढचे काही दिवस अथवा महिने फलाहार करायचा आहे, हे लक्षात यायला लागते.
उपवासाला मोठ्या प्रमाणात साबुदाणा खाल्ला जातो, त्याशिवाय वऱ्याचे तांदूळ, विविध फळे आणि बटाटा, रताळे प्रामुख्याने खाल्ले जाते, पण हे सगळे आलेय कु ठून? हा प्रश्न पडतो ना! अनेकांना वाटत असेल की, हे पदार्थ आपल्या भारतातच तयार झाले आहेत, पण यातच खरी गंमत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे, १९४०च्या आसपास पोर्तुगीजांनी साबुदाणा भारतात आणला. रोजच्या जेवणापेक्षा वेगळा पर्याय म्हणून लोकांनी हे सहज स्वीकारले, असेच बटाटा, रताळे यांचे झाले. मात्र, साबुदाणा तयार होण्याची विशिष्ट पद्धत आहे. दक्षिणपूर्व आशियाई राज्यातील जंगलांमध्ये टी३१ङ्म७८’ङ्मल्ल २ँ४ हे एका विशिष्ट पामचे झाड आहे. जेव्हा ते १५ वर्षांचे होते, तेव्हा त्याला आधी फुले, मग फळे येतात. जेव्हा त्याची उंची ३० फूट होते, त्या वेळी त्याचा बुंधा कापून त्यातला स्टार्च काढून घेतला जातो. मग त्याची पावडर केली जाते. एका पामच्या झाडातून ३५० किलो स्टार्च निघू शकतो. या पावडरला चाळणी आणि कपड्यावर पाणी घालून मळले जाते. दोन-चार वेळा धुतल्यावर ते पीठ वापरण्यायोग्य होते. त्यानंतर त्याचे छोटे गोळे केले जातात. तो म्हणजे साबुदाणा. भारतातही अशा प्रकारे साबुदाणा तयार होतो.
साबुदाण्याच्या प्रकारांविषयी शेफ प्रसाद कुलकर्णी म्हणाला की, ‘आपल्या भारतात दोन प्रकारचा साबुदाणा मिळतो. पहिल्या प्रकारात साबुदाणा भाजून ठेवतात आणि खिचडीला वापरला जाणारा साबुदाणा हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. त्याचे आकारही वेगवेगळे आहेत. मोतीदाणा, खिरदाणा आणि बडादाणा असे आकार यात येतात, पण खिचडीसाठी अमकाच साबुदाणा पाहिजे, असे काही नसते. दाण्याचे कूट, बटाटा, मिरच्या आणि तूप घालून केलेली गरमागरम खिचडी खायला मिळावी, यासाठी हट्टाने उपवास करणारे अनेक जण आहेतच की!
उपवासाच्या काळात शिंगाडा, राजगिऱ्याचे पीठ, दाण्याचे कूट, बटाटा, रताळे यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यापासून तयार होणारे पदार्थ तर घरोघरी तयार होतातच, पण ज्यांना उपवास करायचा नाही आणि घरात जर हेच पदार्थ असतील, तर त्यापासून आणखी कोणते पदार्थ तयार होतील, याचा विचार मात्र आता व्हायला लागला आहे. दाण्यापासून तयार झालेले पिनट बटर आता बाजारात सर्रास मिळते. ज्यांचा उपवास नाही, ते ब्रेडबरोबर हा पर्याय अवलंबवू शकतात. याशिवाय रताळे, बटाटे यांचे आलं, लसूण, कांद्याचा वापर न करता तयार होणारे कोफ्तेही अत्यंत चविष्ट लागतात. याशिवाय कच्च्या केळ्याचे दहीवडे, साबुदाण्याचा वरीचे तांदूळ, मीठ, मिरच्या घालून केलेला डोसा, नारळाचा उत्तपा, भाजणीचे भाज्या घालून केलेले थालिपीठ असे असंख्य प्रकार तर उपवासाव्यतिरिक्त कधीही खाता येऊ शकतात. उकडलेल्या बटाट्याचा गोड शिरा तर लहान मुलांना खूपच आवडतो, तसेच नुसती फळे खाण्यापेक्षा दूध, साखर, क्रीम आणि केळ, सफरचंद अशी आपल्याला आवडणारी फळे एकत्र मिक्सरमधून थोडे घट्टसर करून तयार केलेल्या स्मूदीनेही पोट मस्त भरते. याशिवाय फळांचे ज्यूस तर आहेतच. असे असंख्य प्रकार उपवासाच्या काळात तयार होतात, पण या सर्व पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातले साधर्म्य तेच ठेवून वेगळ््या मार्गाने ते तयार केले, तरी अंतिम सत्य तो पदार्थ चविष्टच लागण्याकडे पोहोचते. म्हणूनच या चार महिन्यांत उपवास करणारे आणि उपवास न करणारे कसे खूश राहतील, याकडे घरातल्या माउलीचे बारीक लक्ष असते आणि त्याप्रमाणेच ओट्यावर तिची वारी सुरू असते, खरं ना...!
जाता जाता- गेल्या महिन्याच्या ओट्यावर आपण चायनिज पदार्थांचा पुढची गंमत पाहू असे म्हटले होते, पण उपवासाचे दिवस आहेत, तर प्राधान्य याच पदार्थांना देणार ना... त्यामुळे त्याविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊच!
न्याहारीचे नवे पर्याय : परदेशात साबुदाण्याला ‘सागो’ म्हणतात. साउथ आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स अशा अनेक भागांत सागोपासून पदार्थ केले जातात. सागोपासून म्हणजेच साबुदाण्यापासून डेझर्ट करता येऊ शकते. गुलामेलाका हे मलेशियन डेझर्ट उपवासाचे पुडिंग म्हणून खाता येऊ शकते. हे डेझर्ट साबुदाणा, नारळाचे दूध, गूळ, कंडेन्स मिल्क, मध, ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून बनवता येते, तर साबुदाणा, केवडा, रोझवॉटरचा वापर करीत ‘मोलाबिया’ हे अरेबिक स्टाईल डेझर्ट करता येते. भातात ज्याप्रमाणे आवडीच्या भाज्या एकत्र करून रिझोतो केला जातो, त्याप्रमाणे शिजलेल्या साबुदाण्यात भाज्या घालून सॅगो रिझोतो करतात.