पुरुषार्थ सिद्धी
By Admin | Updated: August 2, 2016 05:06 IST2016-08-02T05:06:17+5:302016-08-02T05:06:17+5:30
भारतीय तत्त्वज्ञानाने मानवी जीवनाचे चार पुरूषार्थ मानले आहेत. धर्म, अर्थ, काम तथा मोक्ष.

पुरुषार्थ सिद्धी
भारतीय तत्त्वज्ञानाने मानवी जीवनाचे चार पुरूषार्थ मानले आहेत. धर्म, अर्थ, काम तथा मोक्ष. धर्म म्हणजे मूळ स्वभाव किंवा मूल तत्व. माणूस, मूलत: आनंदमय तथा चेतन असतो. धर्माचा दुसरा अर्थ, योग्य तथा शास्त्रोक्त मार्गाने जाणे. अर्थ म्हणजे ज्यामुळे जीवन चालतं अशा भौतिक साधनांचं प्रतीक. माणसाला कार्य करण्यास पे्ररित करणाऱ्या इच्छा तथा वासनांचा समूह म्हणजे काम. तर चतुर्थ पुरूषार्थ मोक्ष म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात स्थापित होणे.
या चारही पुरूषार्थाच्या प्राप्तीवर माणसाच्या जीवनाची सफलता अवलंबून असते. ज्या व्यक्तीच्या मनात यापैकी एका पुरूषार्थाची आसक्ती निर्माण होते ती निंदनीय ठरते.
धर्म हा भारताचा प्राण आहे. माणसाचा मूळ स्वभाव शुध्द तथा परम चेतन असतो, म्हणून त्याचं मूळ कर्तव्य तेच असतं, जे शुध्दता तथा चेतना वाढवतं. जी कर्मे, शुद्धता तथा चेतना वाढवितात तीच धर्म असतात. धर्म नसेल तर माणूस बुद्धिभ्रष्ट होतो आणि त्याचं अध:पतन सुरू होतं. अधर्मी माणसाला धर्मशास्त्रात पशुतुल्य मानलं गेलं आहे. मानवी जीवनाचा दुसरा पुरुषार्थ, अर्थ. तो पहिल्या पुरुषार्थावर अवलंबून असतो. धर्म नसेल तर अर्थ कल्याणकारी होत नाही. म्हणूनच वाम मार्गाने मिळवलेले धन, माणसाला आनंद देत नाही. धर्माला अनुसरुन कमविलेले धन व्यक्तिगत तथा सामाजिक जीवन सुखद बनविते. धर्माला अनुसरुन कमावलेल्या धनाने योग्य काम अर्थात इच्छा उत्पन्न होतात. गीतेमध्ये भगवान म्हणतात,
धर्माविरुद्ध: कामोऽस्मि
म्हणजे मी असा काम आहे जो धर्माच्या विरोधात नाही.
धर्माचे पालन करुन कमविलेले धन अथवा योग्य इच्छा माणसाला मोक्षाकडे नेतात. मोक्ष ही मानव चेतनेची अशी अवस्था आहे जिच्यात द्वंद्व तथा भेद नष्ट होतात आणि एका अखंड चेतनेचा संचार होतो. माणसाची चेतना पूर्णत: शुद्ध रुप प्राप्त करते आणि संपूर्ण सृष्टीत एकत्व दिसू लागते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर मानवी शरीराची सर्व बंधने तुटून जातात आणि माणूस अनंतात विलीन होतो. हा मोक्ष मृत्यूपश्चत नव्हे तर हयातीतच प्राप्त होतो.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय