कहाणी ‘रित्या’ ताटाची
By Admin | Updated: June 1, 2016 03:18 IST2016-06-01T03:18:05+5:302016-06-01T03:18:05+5:30
१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे

कहाणी ‘रित्या’ ताटाची
१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे, तर माणसाचा आणि विचार करण्याचा पोतच बदलला. शेतीची घडी विस्कटली येथून आणि माणूस जमिनीपासून सुटला येथूनच. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण पाहातो आणि अनुभवतो. त्यापूर्वी शेतीमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती ती ६४-६५ च्या सुमारास. तेव्हा हायब्रीड बियाणे अवतरले. हरित क्रांतीचा तो काळ होता. बियाणे बदलले; पण पीक पद्धती कायम होती. पुढे नगदी पिकाचे आकर्षण वाढले आणि पिकेही बदलली. ४५ वर्षांपूर्वीची पिके आज मराठवाड्यात पाहायला मिळत नाहीत. औरंगाबाद विभागाच्या कृषी खात्याने या बदलाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष निघाले आहेत.
समाज बदलाच्या प्रक्रियेत शेतीचाही वाटा असतो. अगोदर म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यातील पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ज्वारी, बाजरी, भुईमूग, भात, तूर, मटकी, मूग, उडीद, कापूस अशी पिके शिवारात दिसायची. याच्या जोडीला भगर, राळे, तीळ, जवस, काराळे ही पिकेही होती आणि ही मिश्र पीक पद्धती आहाराचा आधार होता. पुढे नगदी पिके आणि कमी कष्टात अधिक उत्पन्न हा मार्ग निवडल्याने यातील काही पिके तर बाद झाली. राळे, काराळे, जवस, हुलगे या पिकांची नावेही नव्या पिढीला माहीत नाहीत. ज्वारी, बाजरी, भुईमूग ही तृणधान्ये आणि तूर, मूग, उडीद आणि मटकीसारखी डाळवर्गीय पिकेही हळूहळू बाद होत आहेत. कृषी खात्याने याचा अभ्यास केला तो १९९५ पासून, म्हणजे २0 वर्षांचा त्याचा निष्कर्ष धक्कादायक यासाठी की, आताचे क्षेत्र उणे ९३ टक्क्यांनी घटले. तीच स्थिती ज्वारी (-८२), बाजरी (-७३), भुईमूग (-८२), अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल संपत आला. या उलट मक्याचे क्षेत्र ४0 टक्क्यांनी वाढले. कापूस ५२ टक्क्यांनी, तर सोयाबीनच्या क्षेत्रात थोडीथोडकी नव्हे, तर ५३0७ टक्क्यांनी वाढ झाली. कडधान्याची अवस्था तर दखल न घेण्यासारखी आहे.
याचा अर्थ मिश्र पीक पद्धती बाद होऊन एकसुरी पिके घेण्याचा आग्रह दिसतो. याचा परिणाम मराठवाड्यातील आहारावर झाला. लोकांच्या आहारातील डाळींचे प्रमाण प्रचंड घटले. त्याची जागा भाजीपाल्याने घेतली. त्यामुळे प्रथिनांची कमतरता ही सार्वत्रिक बाब ठरली. तसेही शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांचा तुटवडा असतो.
त्यात आहारातील डाळींचे प्रमाण घटल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. तो इतका की, प्रथिनांची कमतरता हा आता मराठवाड्याच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनू पाहतोय. हे धान्य घरात असल्याने लोकांच्या आहारात त्याचा समावेश होता, आता शेतातच नाही, तर ताटात कोठून पडणार?
हा परिणाम एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, तो जमिनीच्या पोतावर झाला. एकसुरी पीक पद्धतीत मशागतीसाठी जनावरांची गरज कमी झाली, तशी जनावरांची संख्या लक्षणीय घटली. दावण नावाचा प्रकार संपुष्टात आला. बैलजोडी सांभाळण्याऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत सोयीची वाटू लागली; पण त्याचा थेट परिणाम म्हणजे जमिनीतील सेंद्रिय खत मिळेनासे झाले. सारा भर रासायनिक खतांवर पडला. जमिनीचा पोत बिघडला. पर्यावरणाचे किती नुकसान झाले हा भाग वेगळा.
याचा परिणाम म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसताना उत्पादन वाढले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. म्हणजे पीक पद्धतीतील बदलामुळे शेतकऱ्यांचा असाही फायदा झाला नाही. नुकसान मात्र पावलापावलावर झाले आहे. त्याची आणि जमिनीची अशी दोघांची भूक भागली नाही, दोघेही भुकेले आहेत.
- सुधीर महाजन