- संजय नहार, पुणे येथील सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्षआठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार यदुनाथ थत्तेलिखित ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’ ही गोष्ट वगळल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या पाठात भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर कुर्बान सिंग यांचा उल्लेख होता. सुखदेव यांचे नाव या पाठात नसल्यामुळे काही संघटनांनी त्यावर आक्षेप नोंदविला होता. या सगळ्या प्रकारातून अखेर अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेत हा पाठच वगळून टाकण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सगळीकडेच चर्चा सुरू होती. त्यावर आज एकप्रकारे पडदा पडला आणि ही चर्चा फक्त थांबली. या घटना, घडामोडींच्या दरम्यान एक प्रश्न विचारला गेला, तो खूप अस्वस्थ करणारा होता. ‘कोण होता कुर्बान हुसेन?’ हा तो प्रश्न. या प्रश्नानं मला खूप अस्वस्थ केलं.
कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा सोलापूरच्या या चौघांना फाशीची शिक्षा झाली. १२ जानेवारी १९३१ रोजी आणि त्यानंतर दोनच महिन्यांनी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. मात्र, नंतर घडलेल्या या घटनेचे वलय इतके होते की, कुर्बान हुसेन यांची फाशीची शिक्षा स्थानिक स्वरूपाची मानली गेली. त्यामुळे देशभक्तीच्या या दोन्ही घटनांच्या वाट्याला देशाने दिलेला प्रतिसाद मात्र वेगवेगळा होता. साहजिकच कुर्बान हुसेन यांच्या स्मृती केवळ सोलापूरपुरत्या मर्यादित राहिल्या; पण हे जरी खरं असले तरीही याचा अर्थ ‘कुर्बान हुसेन कोण?’ हा प्रश्न विचारणं म्हणजे त्यांच्या देशभक्तीचा अपमान करण्यासारखंच आहे.
हुतात्मा अब्दुल रसुल कुर्बान हुसेन यांचा जन्म १९१० मध्ये झाला. फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्यांचे वय होते केवळ २२ वर्ष, पण अवघ्या २२ वर्षांच्या काळात त्यांनी मोठे योगदान देशासाठी दिले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान. स्वातंत्र्य, स्वदेशी, समता, समाजवाद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य ही त्यांची कार्यसूत्रे होती. ही पाच सूत्रे रुजवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. दंगलींच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतल्या. कामगारांच्या अन्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठविला. आपली भूमिका जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी कुर्बान हुसेन यांनी पत्रकारितेचे शस्त्र वापरत ‘गझनफर’ हे मराठी वृत्तपत्र सोलापूर जिल्ह्यात सुरू केले. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ सिंह असा आहे. त्यावरूनच टिळकांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कुर्बान हुसेन यांच्यावर किती असेल, हे लक्षात येते. या ‘गझनफर’ने सोलापुरात मोठी क्रांती घडवून आणली. परखड भाषेत लिखाण करणारा, कामगारांचे प्रश्न मांडणारा आणि वक्तृत्वाने प्रभावित करणारा हे सारे गुण त्यांच्यात होते. काँग्रेसच्या अनेक सभांमध्ये, मोर्चांमध्ये त्यांनी केलेली भाषणे गाजली. लेखनही भूमिका घेणारे असल्याने त्याचा परिणामही जनमानसावर होत असे. ‘रमजाने शरीफ आणि अन्नदान’ या एका लेखात त्यांनी रमजान सणाच्या वेळी परदेशी कापड घेण्याऐवजी स्वदेशी कापड घेण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली होती. स्वदेशीच्या माध्यमातून हाताला काम म्हणजेच भुकेल्याला पोटभर अन्न. इतके सोपे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
कुर्बान हुसेन यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सोलापूर ९, १० आणि ११ मे १९३० या तीन दिवशी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते. जणू ते स्वातंत्र्यात होते. ते दडपण्यासाठी आणि कुर्बान हुसेन यांच्या देशभक्तीला विरोध करण्यासाठी ब्रिटिशांनी कुर्बान हुसेन यांना एका पोलीस जळीत कटात गोवले. पुढे मग त्यांच्यासह मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांना फाशी झाली. सोलापूरकरांनी स्थानिक पातळीवर आजही कुर्बान हुसेन यांच्या स्मृती जपल्या आहेत. आयुष्यभर हिंदू-मुस्लिम ऐक्याची भाषा कृतिशीलपणे बोलणाऱ्या कुर्बान हुसेन यांच्याकडे फाशी झाल्यानंतर स्वतंत्र भारतात अशा पध्दतीने पहाणं, ही खूपच वेदना देणारी गोष्ट आहे. कुर्बान हुसेन यांना १९३१ मध्ये फाशी दिली तेव्हा त्यांचे शरीर गेले आणि पाठात आलेल्या कुर्बान हुसेन यांच्या नावामुळे जे घडले त्यातून त्यांच्या विचारांनाच फाशी दिली गेली आहे.