- मेघना सामंतएकटा बाबा किंवा सिंगल डॅडचा अर्थ मुळात वेगळा. पत्नी वारल्यावर किंवा काही प्रसंगी घटस्फोट झाल्यावर मुलांचा सांभाळ एकहाती करणारे वडील म्हणजे ‘सिंगल फादर’ अशी आतापर्यंतची साधी व्याख्या होती, पण भारतात गेल्या दोन वर्षांत या संज्ञेने नवे रूप धारण केले आहे. आजच्या फादर्स डे निमित्ताने हा विशेष लेख.अविवाहित राहून स्वत:हून पालकत्व स्वीकारायला उत्सुक असणारे, त्यासाठी सरोगसीचा अवलंब करून, मुलं अगदी तान्ही असल्यापासून त्यांचं सगळं काही करणारे दोन सेलिब्रिटी डॅड आपण सध्या बघतोय. तुषार कपूर आणि करण जोहर. अभिनेता राहुल बोस यानेही सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अंदमान निकोबार बेटांवरची सहा मुलं (त्याची स्वत:ची सामाजिक संस्था आहे तिच्या माध्यमातून) दत्तक घेतली असून, तोही त्यांचं पितृत्व निष्ठेने निभावतो आहे.या आधी चर्चा जोरात असायची, ती सिंगल मदर्सची. लग्नाच्या बंधनात अडकायचं नाकारून फक्त मातृत्वाच्या ओढीतून मुलं दत्तक घेणाऱ्या स्त्रिया समाजाने बºयाच अंशी सकारात्मकतेने स्वीकारल्या, पण एकल मातांना मुलं दत्तक घेणं हे कायद्याने तुलनेने सोपं आहे. मुलं दत्तक देणारे अनाथाश्रम किंवा अन्य संस्था एकट्या राहणाºया महिलांना सहजपणे मूल दत्तक देतात, पण एकट्या पुरुषाने मूल दत्तक घेण्याचा मानस व्यक्त केला, तर त्याच्या हेतूबद्दल सरसकट शंका व्यक्त केली जाते. पुरुषांनाही पिता/पालक व्हावंसं वाटू शकतं, हे अजूनही स्वीकारलं जात नाहीये, असा त्यांचा स्वत:चाच अनुभव आहे. त्यामुळेच करण जोहर आणि तुषार कपूर या दोघांनीही सरोगसीचा मार्ग निवडला.खरं म्हणजे स्त्रियांना आई व्हावंसं वाटतं, तितकंच पुरुषांना पिता व्हावंसं वाटणं हे नैसर्गिक नाही का? एकेरी मातृत्व जेवढं कठीण आहे, तेवढंच एकेरी पितृत्वही! साधं उदाहरण आहे- घराघरात आपण बघतो की, आईने कडकलक्ष्मीचा अवतार धारण केला की, बाबा थोडं मुलांच्या कलाने घेऊन त्यांना समजावून सांगतात किंवा बाबा रागावला, तर आई जवळ घेते. तसं या एकल पालकांच्या मुलांच्या बाबतीत कधीच होऊ शकणार नाही. मूल लहान असेपर्यंत ‘शिअर डिलाइट’ असतं, त्याचे लाड केले की झालं, असं वाटू शकतं, पण पुढे त्याच्या मानसिक, शैक्षणिक, भावनिक गरजा भागविता येण्यासाठी ‘एकट्या पालकांसाठी विशेष’ पालकत्वाचं प्रशिक्षण आवश्यक ठरेल, असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.सेलिब्रिटी सिंगल फादर्सना समाजमाध्यमांनी बºयापैकी उचलून धरलं खरं, पण त्यांच्याकडे ‘नुसतेच एक फॅड’ या दृष्टीने न बघता, गांभीर्याने बघण्याची मानसिकता थोड्या-फार प्रमाणात तरी तयार झालीय का? आणि हा ट्रेंड चार-दोन उदाहरणांपुरताच सीमित राहतो की, आणखीही काही पुरुष ‘एकटे बाबा’ बनायचा निर्णय घेतात, हे येत्या काळात आपल्याला समजेलच.मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अविवाहित राहिलेल्या पुरुषांच्या आयुष्यातही असा एक टप्पा येतो, जेव्हा त्यांना पालक बनण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. त्यामुळे त्यांनी मूल दत्तक घेणं/ सरोगसीतून मूल जन्माला घालणं यात आक्षेपार्ह काही नाही, परंतु केवळ क्षणिक इच्छेपोटी असा निर्णय घेतला जाऊ नये. कारण पालकत्व म्हटलं की, जबाबदारी आलीच आणि ती पूर्णपणे पेलता येणं हे महत्त्वाचं आहे.