प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांचे चेहरे आणि त्यांचे कुटुंबीय... भारताच्या डिजिटल आसमंतात समाजमाध्यमांच्या लक्षावधी वापरकर्त्यांनी हा विषय खदखद उकळत ठेवला. त्यानंतरच्या वेगाने बदलत्या वातावरणात अचानक बिनचेहऱ्यांचे ट्रोल्स अनामिकतेचा बुरखा पांघरूण आग ओकू लागले. कीबोर्डचे रूपांतर त्यांनी जणू चाबकात केले होते. ते जणू विष ओकत होते.
कोण होते त्यांचे लक्ष्य? पतीच्या वियोगानंतर विलाप करणारी स्त्री, क्रिकेटमधील बडी असामी, एक टेनिसपटू, बॉलिवूडमधला तारा, क्रीडा समालोचक आणि अन्य अनेक जण. जणू डिजिटल चिता भडकल्या होत्या. खासगीपणा पायदळी तुडवून -आभासी का होईना, समोरच्याला ठेचून मारण्यासाठी लोक पुढे सरसावले होते. या धगधगत्या गोंधळाच्या कर्त्या करवित्या अल्गोरिदमने व्यक्तिगत दुःखाचे रूपांतर चव्हाट्यावरील हत्याकांडात केले. पहलगामला सांडलेले रक्त त्यांनी डिजिटल महामारीत बुडवून टाकले. लग्नानंतर काही दिवसांतच पहलगामच्या हल्ल्यात आपला सैनिक पती गमावलेल्या एका स्त्रीने ऐक्यासाठी हात जोडले. 'कोणत्याही समाजाविरुद्ध आम्हाला राग, द्वेष नको आहे. शांतता आणि न्याय हवा आहे.' या तिच्या विनंतीला प्रतिसाद मिळाला तो रोरावत आलेल्या क्रौर्याचा. 'हुतात्म्यांच्या पैशासाठी मगरीचे नक्राश्रू' असा शेरा एक्सवर झळकला आणि त्याला हजारो लाइक्सही मिळाले. तिच्या दुःखावर मीठ चोळले गेले. अल्गोरिदमच्या झुंडीने तिची प्रतिष्ठा पायदळी तुडवली. आता 'ऑपरेरशन सिंदूर'ने तात्काळ न्याय दिला असता तिची प्रतिक्रिया तितकीच धारदार होती. 'ज्यांनी विद्वेष पसरवला त्यांना या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार नाही' असे ती म्हणाली.
त्याआधी एकेकाळी भारताचा मानदंड असलेल्या क्रिकेटपटूलाही अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. २०२३च्या विश्वचषकातील अपयशामुळे वादळ उठले. 'सेल्फीगंडाने पछाडलेला' अशी पोस्ट त्याच्याबद्दल व्हायरल झाली. 'माझ्या खासगीपणाचा भंग योग्य नाही' असे त्याने इन्स्टाग्रामवर म्हटले त्याचीही थट्टा केली गेली; इतकेच नव्हे तर २०२१ साली त्याच्या लहानग्या मुलीला बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. त्याच्या कौटुंबिक सौख्याचे लचके तोडण्यात आले.
सीमेपलीकडील देशात लग्न झालेल्या टेनिसपटूला अखंड द्वेषाचा सामना करावा लागला. 'पाकिस्तानला विकली गेलेली गद्दार' अशी पोस्ट २०२० साली समाजमाध्यमांवर फिरत होती. तिने पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती दर्शवली तेव्हाही तिला 'तुझ्या नवऱ्याच्या देशात जा' असे ऐकवण्यात आले.
हा कल्लोळ काही आपापतः झालेला नव्हता, तो केला गेला होता. भारताच्या भल्यामोठ्या डिजिटल लोकसंख्येने जणू एक नवे 'द्वेष कुंड'च तयार केले आहे. एक्स आणि टिकटॉक यासारखे प्लॅटफॉर्म्स बॉट्स आणि हॅश टॅगच्या माध्यमातून फूट पसरवतात. हे डिजिटली ठेचून मारणे, जाहीरपणे सुळावर देणेच आहे. बातम्यांतून दाखविलेले विधवेचे दुःख हातोहात पळवून ट्रोलर्सच्या जत्रेत नेले गेले. 'ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे' अशा पोस्ट लक्षावधी लोकांमध्ये गेल्या. परिणामी समाजात दुहीची बीजे पेरणारा सांस्कृतिक चिखल पसरवला गेला. या महिलेच्या ट्रोलिंगबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतला तरीही डिजिटल जमाव मागे हटला नाही. भारताचा डिजिटल चौक ही काही लोकांनी एकत्र येण्याची जागा उरलेली नाही... निर्दोष लोकांना भस्म करणारे ते एक सरण झालेले आहे.
भारताची कायदेशीर चौकट या बाबतीत फारशी मदत करू शकत नाही. सायबर छळाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा २००० शिक्षेची तरतूद करतो. परंतु प्रत्यक्ष अंमल कठीण होऊन जातो. पहलगामनंतर विदेशी यू-ट्यूब वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. परंतु देशातील ट्रोलर्स मात्र खुलेआम फिरत आहेत. 'अल्गोरिदम व्यसनासारखे असल्याने द्वेष पसरविणाऱ्यांचे फावते' असे २०२३च्या एका अहवालाने दाखवल्यानंतरही कोणतीही सुधारणा झाली नाही. स्वाभाविकच ट्रोलर्सचा धीर चेपला आणि तेन घाबरता बळी घेत सुटले.
अनामिकता हे ट्रोलर्सचे हत्यार असते. टोपणनावाच्या मागे विकार लपवला जातो. आत्मकेंद्रितता, मानसिक आजार, सत्तापिपासू वृत्ती याला प्रोत्साहन मिळते. अनामिकता आणि आक्रमकता याचा संबंध असल्याचे २०२०च्या एका अभ्यासात आढळून आले आहे. बुरख्याआड तोंड लपवता येत असल्यानेच त्यांना गरळ निर्भयपणे ओकता आली.
शांतताप्रेमी भारतीय या विषयावर गप्प आहेत, ही दुसरी फसवणूक होय. गंमत पाहणे किंवा असा द्वेष टाळून पुढे जाणे यामुळे ही साथ आणखी पसरली आहे. आपल्याच पित्तप्रकोपाने भारताची घुसमट होत आहे. ट्रोलिंग हे सांस्कृतिक अरिष्टच होय. भामटा, गद्दार, विकला गेलेला यासारखे ट्रोल्सचे शब्द देशाच्या छातीत सुरा खुपसत आहेत. डिजिटली ठेचून मारण्याच्या अहमहमिकेत सहानुभाव आणि शहाणपणाचा बळी जातो आहे. एक्स, इन्स्टाग्राम अशी समाजमाध्यमे मानवी आत्म्याचे कत्तलखाने झाले आहेत. यावर तातडीने कृती केली पाहिजे. सायबर कायदे तातडीने कडक केले पाहिजेत. नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. ट्रोलर्सना बळी पडलेल्यांची वेदना ही भारताची जखम आहे. देशातला द्वेषपूर्ण अल्गोरिदम संपवला पाहिजे. ट्रोलर्सच्या क्रौर्याने भारताची इभ्रत जात असताना आपण गप्प राहिलो, तर सामाजिक विनाश अटळ आहे.