कपडे फाडणे थांबवा...

By Admin | Updated: May 20, 2014 08:40 IST2014-05-20T08:40:08+5:302014-05-20T08:40:08+5:30

सार्‍यांनी मिळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घालवा अशी मागणी करायची, हा सारा वस्त्रे गमावून बसलेल्यांनी एकत्र येऊन दुसर्‍या एकाला आपल्यासारखे बनविण्याचा चालविलेला पोरखेळ आहे.

Stop tearing clothes ... | कपडे फाडणे थांबवा...

कपडे फाडणे थांबवा...

माणिकराव ठाकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दोष द्यायचा, राण्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळायचा, कदमांनी त्याच्या जोडीने कदमताल करायचा आणि सार्‍यांनी मिळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घालवा अशी मागणी करायची, हा सारा वस्त्रे गमावून बसलेल्यांनी एकत्र येऊन दुसर्‍या एकाला आपल्यासारखे बनविण्याचा चालविलेला पोरखेळ आहे. माणिकराव ठाकरे यवतमाळात पडले, राणे रायगडात उताणे झाले, कदमांना त्यांचे बाळ पुण्यातून निवडून आणता आले नाही... थोड्याफार फरकाने गोंदियापासून मुंबईपर्यंतच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांची स्थिती अशीच राहिली. भाजप-सेनेच्या युतीविरुद्ध काहीएक करू न शकलेली ही माणसे आता सूडाने पेटून उठली आहेत आणि त्यासाठी त्यांना एक विषय हवा आहे. पृथ्वीराज चव्हाण हा चांगला व नेमका निशाणावर असलेला विषय आहे. दिल्लीहून मुंबईत आल्यापासून पृथ्वीराज कधीच स्थिर नव्हते. इथल्या कोणावर त्यांचा विश्वास नव्हता आणि इथल्याही कोणाला त्यांच्याविषयी आपुलकी नव्हती. कराड या त्यांच्या प्रत्यक्ष गावातला काँग्रेस पक्षही त्यांच्याकडे साशंकतेने पाहणारा व त्यांच्या स्वागताला फारसा उत्सुक नसलेला होता. पण, प्रथम मनमोहनसिंग व पुढे सोनिया गांधी यांचा कृपाप्रसाद प्राप्त केलेल्या पृथ्वीराजांना उघड विरोध करणे म्हणजे दिल्लीचा रोष ओढवून घेणारे असल्याने तेव्हा गप्प राहिलेले हे तेव्हाचे आशाळभूत व आताचे जखमी शिलेदार सामूहिक पराभवानंतर आपापला जुना राग घेऊन पृथ्वीराजांविरुद्ध एकवटले आहेत. मुळात ही काँग्रेसची संस्कृती नाही. ती खेकड्यांची संस्कृती आहे; पण जे बिळाबाहेर येऊन वाढण्याची क्षमता हरवून बसतात, त्यांना एकमेकांचे पाय ओढण्याची तीच रीत अवलंबावी लागते. काँग्रेसच्या झालेल्या पानिपताला दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सारेच काँग्रेसचे पुढारी, कार्यकर्ते, चाहते, हौसे आणि गवशे कारणीभूत आहेत. सरकारने गरिबांसाठी आणलेल्या व त्यांच्या लाभाच्या ठरलेल्या साध्या योजनाही त्यांना लोकांना सांगता आल्या नाहीत, आपसातील भांडणे मिटविता आली नाहीत, आपल्याच उमेदवाराविरुद्ध शत्रूंचे झेंडे वा झाडू खांद्यावर घेऊन प्रचारात वावरताना त्यांना खंत वाटली नाही. तिकिटे वाटल्यापासूनच त्यांच्या या अध:पतनाला आरंभ झाला. आपण, आपली पोरे, पोरी, सुना, बायका आणि नातेवाइकांना त्यांची लायकी असो व नसो थेट लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची सार्‍यांना घाई. राष्ट्रवादीच्या शरद पवारांना तर आपण ज्याला शेंदूर लावू तो देव बनेल, हा भ्रम. मग भुजबळांचा बळी, पद््मसिंहांची खांडोळी आणि प्रफुल्ल पटेलांचा पतंग होणे स्वाभाविक म्हणावे असेच नव्हते काय? सुशीलकुमार पडतात, संजय निरुपम हरतात, गावितांवर गावातच राहण्याची वेळ येते, शिवाजी मोघ्यांना सत्यसाईबाबांकडे आणि दत्ता मेघ्यांना चक्क नितीन गडकरींकडेच जावे लागते... ही वाताहत नाही. हा या सार्‍यांच्या राजकारणाचा शेवट आहे. आपण नापास झालो, हे एकदा मुकाट्याने मान्य करा आणि नव्या पाटीपुस्तकानिशी पुढच्या परीक्षेची तयारी करा. आता ते जुने धडे कामी यायचे नाहीत. पुन्हा दलित, आदिवासी आणि अल्पसंख्य ही गाणी कोणाला भुलवायची नाहीत. समाजासोबत राहण्याची, दुरावलेले जवळ आणण्याची, त्यातल्या दुखावलेल्यांची क्षमा मागण्याची आणि त्यांच्या पुढे नव्हे तर सोबत राहून चालण्याची तयारी करा. आपले साधे जातविरोधी वा पुतळाविरोधी वक्तव्य समाजातील केवढ्या मोठ्या वर्गाला दुखावून दूर नेते, याची गणिते मांडा. ज्ञानाचा व ज्ञानी माणसाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या मर्यादा ओळखा. आपल्या सामर्थ्याविषयीचे, बुद्धिवैभवाविषयीचे आणि लोकप्रियतेबाबतचे अजून डोक्यात असलेले भ्रम काढून टाका. नवी माणसे, नवे वर्ग, नव्या वस्त्या आणि नवी गावे शोधा आणि जोडा. जुने उमेदवार आणि जुनी कार्यशैली मोडीत काढा. नवे उमेदवार नवे कार्यक्रम आणि नवा जोम हाती घ्या. नव्यांना संधी द्या आणि नाइलाज म्हणून का होईना स्वत:ला बाजूला ठेवण्याची तयारी करा आणि हो, ते नवे उमेदवार निवडताना पुन्हा आपल्याच घरातले निवडू नका. आपण पडलो तसे आपल्या नव्या पिढ्यांनाही पाडू नका. महाराष्ट्रात उदयाला आलेली नवी पिढी अतिशय बुद्धिमान आहे. तिच्यातील गुणवंतांना, त्यांची जातपात व धर्म-पंथ न पाहता पुढे करा आणि त्यांचे झेंडे खांद्यावर घेण्यात धन्यता माना... तशीही येती पाच वर्षे तुम्हाला सत्तेपासून दूर राहून अध्ययनच तेवढे करायचे आहे. ते करा आणि शहाणे व्हा. आजवर केले, झाले ते भरपूर झाले, हाणामार्‍या पुरेशा झाल्या, आरोप-प्रत्यारोपही जुने झाले. आता तरी एकमेकांचे कपडे फाडणे थांबवा आणि जमेल तेवढी विधायक कामे हाती घ्या.

Web Title: Stop tearing clothes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.