निरपराधांचे मरण थांबवा
By Admin | Updated: November 3, 2016 04:52 IST2016-11-03T04:52:09+5:302016-11-03T04:52:09+5:30
‘पंधरा पाकिस्तानी सैनिकांना दाखविलेली मरणाची वाट’ या कारवायांचा फारसा परिणाम त्या दहशती देशावर झाला नाही हेच सिद्ध होते.

निरपराधांचे मरण थांबवा
सांबा, राजौरी, जम्मू, पूंछ, रामगड, नौशेरा आणि बालकोटे एवढ्या मोठ्या सीमावर्ती प्रदेशांत घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ भारतीय नागरिकांचा बळी घेतला असेल तर भारताचे ‘सर्जिकल आॅपरेशन’, ‘ चौदा पाकिस्तानी चौक्यांचा खात्मा’ आणि ‘पंधरा पाकिस्तानी सैनिकांना दाखविलेली मरणाची वाट’ या कारवायांचा फारसा परिणाम त्या दहशती देशावर झाला नाही हेच सिद्ध होते. सीमेवरील कारवायांत गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ झाली आहे आणि एकेकाळी काश्मीर खोऱ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या या हालचाली आता जम्मू आणि पूंछपर्यंत दक्षिणेत उतरल्या आहेत. गोळीला गोळीने आणि माऱ्याला माऱ्याने उत्तर देण्याची आपल्या संरक्षण यंत्रणेची भाषा व कारवाई अद्याप फारशी प्रभावी ठरली नाही हे उघड करणारे आताचे हत्याकांड आहे. सीमेवर हल्ला करणारे दहशतखोर पाकिस्तानी लष्करातून आले आहेत की ते नुसतेच स्वयंघोषित आतंकवादी आहेत याची चर्चा करण्याचे दिवस आता संपले आहेत. या दहशतखोरांना पाकच्या लष्कराचेच नव्हे तर सरकारचेही पूर्ण सहाय्य आहे व ते अनेक पुराव्यांतून आजवर सिद्धही झाले आहे. कोणताही निर्ढावलेला गुन्हेगार त्याच्यावर केलेले आरोप जसे ठामपणे नाकारतो तसाच या आरोपांविषयीचा पाकचा नाठाळ पवित्रा आपण आजवर पाहिला आहे. खरे तर यापुढे असे पुरावे त्या देशाला व जगाला देण्याची गरजही आता संपली आहे. ज्या दिवशी पाकिस्तानच्या नवाज शरीफांनी काश्मीरातील असंतोषाला स्वातंत्र्याचा लढा म्हटले आणि बुऱ्हाण वाणी याचा स्वातंत्र्यवीर म्हणून गौरव केला त्याच दिवशी त्या देशाने या संदर्भातील त्याच्या गुन्हेगारीचा स्वीकार अधिकृतपणे केला आहे. आताची जबाबदारी आपली आहे व ती आपल्या नागरिकांच्या जीवित व वित्त रक्षणाची आहे. जम्मू आणि काश्मीरला भारताच्या अन्य भागांशी जोडणाऱ्या प्रदेशाच्या कडेला पाकिस्तानने आपले मोठे लष्कर आणून उभे केले आहे. भारताची जम्मू व काश्मीरला मिळणारी रसद तोडण्याचा इरादा त्यामागे आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे लष्करशहा काश्मीर प्रश्नावर कायमचे युद्ध चालू ठेवण्याची भाषा बोलत आहेत. ‘गरज पडली तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करून दिल्लीची राखरांगोळी करू’ अशी भाषा त्या देशाचे अणुवैज्ञानिकही बोलताना दिसले आहेत. याच काळात चीनची त्या देशाशी असलेली मैत्री अधिक घट्ट झाल्याचे व रशियाचे आपल्याशी असलेले जुने सख्य काहीसे पातळ झाल्याचे आढळले आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानला दहशतखोर देश म्हणायला नकार दिला आहे. तात्पर्य, यापुढचा लढा व त्याची सिद्धता भारताला स्वबळावर करायची आहे. त्यासाठी नुसत्या घोषणा, झेंडेबाजी आणि टोकाचे धर्मजागरण कामाचे नाही. हा देश व त्यातील सर्व धर्मांची माणसे यांची एकजूट उभारणे आणि तिचे बळ लष्कराच्या मागे उभे करणे आता आवश्यक आहे. भारताचे व पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांची युद्धसाधने यांचा विचार येथे आवश्यक नाही. मात्र त्याचे भान साऱ्यांनी राखणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराने नुकत्याच केलेल्या सर्जिकल आॅपरेशनचा प्रचंड गाजावाजा आपण केला. ते आॅपरेशन इतिहासातले पहिले असल्याचेही आपण आपल्यालाच सांगितले. त्या कारवाईने पाकिस्तानचे सारे इरादे नेस्तनाबूत होतील हे संरक्षण मंत्र्यांनीही आपल्याला सांगून टाकले. प्रत्यक्षात मात्र तसे काही होताना दिसले नाही व दिसतही नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे अफाट भाषणांसाठी आता चांगलेच परिचित झाले आहेत. पूर्वी कधीही नव्हती एवढी भारताची सीमा आता मजबूत व सुरक्षित आहे हे सांगणारे त्यांचे भाषण ज्या दिवशी झाले त्याच दिवशी सीमेवर आठ निरपराध माणसे मारली गेलेली देशाने पाहिली. दर दिवशी सीमेवर आक्रमण होते आणि आपले सैनिक त्याला प्रत्युत्तर देतात. ते म्हणतात, ‘आपले मारले’, आपण म्हणतो, ‘त्यांचे मारले’. सीमेवर खरोखरीची शांतता हवी असेल तर त्याविषयीची द्विपक्षीय वा त्रिपक्षीय बोलणी का होत नाहीत? मित्रांना व मित्र देशांना मध्यस्थ का केले जात नाही ? ज्यावर भारत आणि पाक या दोहोंचाही विश्वास आहे असे देश जगात आहेत. त्यांच्या मदतीने या आक्रमणाचा शांततापूर्ण शेवट करण्याऐवजी परस्परांची माणसे मारतच एकमेकांना नमविण्याचे राजकारण कितीसे लाभदायक? मोदींना शरिफांशी बोलता येते, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात हजर होता येते आणि देशात नसली तरी विदेशात त्यांची माणसे व खेळाडू आपल्या माणसांशी व खेळाडूंशी बोलत व खेळत असतातच. मग या कृतीला शांततेच्या वाटाघाटीचे वळण देण्यात कशाचा अडसर आहे? दोन्ही बाजूंचा अहंकार की एकाचे धर्मवेड आणि दुसऱ्याचे धर्मनिरपेक्षपण? काही का असेना आपली माणसे वाचविण्याच्या राजकारणावरच सरकारचा यापुढचा भर असणे गरजेचे आहे. तशी बुद्धी व प्रेरणा पाकिस्तानच्या व आपल्याही राज्यकर्त्यांना व्हावी हीच साऱ्यांची प्रार्थना राहणार आहे.