अजूनही आभाळाकडे डोळे

By Admin | Updated: August 10, 2016 04:09 IST2016-08-10T04:09:15+5:302016-08-10T04:09:15+5:30

पाऊस आला आणि सारे कसे सुजल सुफल झाले, असेच महाराष्ट्राचे वर्णन केले जात असले तरी मराठवाडा अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे़

Still eyes to the sky | अजूनही आभाळाकडे डोळे

अजूनही आभाळाकडे डोळे

पाऊस आला आणि सारे कसे सुजल सुफल झाले, असेच महाराष्ट्राचे वर्णन केले जात असले तरी मराठवाडा अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे़ वरूणराजा शेतीपुरता बरसला आणि बळीराजा काही अंशी समाधानी झाला तरी पेयजलाचे संकट अजूनही घोंघावते आहे़ मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा २५ टक्क्यांवर नाही़ बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा प्रकल्प तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सिना-कोळेगावमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे़
हिंगोली जिल्ह्यातील दोन-चार गावांपुरती झालेली अतिवृष्टी, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनीची अतिवृष्टी आणि पिके तगून जातील इतका पाऊस पाहून तुलनेने आनंदी वातावरण आहे़ गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील प्रत्यक्ष पावसाळा १८ ते २८ दिवस इतकाच असतो़ एक-दोन दिवसच धो-धो बरसतो़, सरासरी ओलांडतो, नदी-नाल्यांनी वाहून जातो़ अखेरीस टंचाईच्या झळा कायम ठेवून जातो़
मराठवाड्यात जलसंधारणाची कामे कमी़ मोठे जलसाठे गाळयुक्त तर लघु प्रकल्पांना झाडाझुडुपांनी खाऊन टाकलेले़ राळेगणसिद्धी, हिवरेबाजारची उदाहरणे देण्यापलीकडे काम होत नाही़ मराठवाड्याला चिकटून असलेल्या तेलंगणात बासरजवळ गोदावरीतून मोठा कालवा काढून शेजारच्या तलावात पाणी साठवण्याची सोय केली आहे़ आम्ही मात्र पूर रेषेतील गावांना इशारे देण्यापलीकडे काहीही केले नाही़ अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने नांदेडचे विष्णूपुरी भरले़, परंतु शेजारील तलाव तळाशी आहेत़ प्रत्यक्षात विष्णूपुरीचे दरवाजे उघडण्यापूर्वी तेथील पाणी जवळच्या तलावांमध्ये उचलण्याची कुठलेही नियोजन नाही़ राज्यात नव्हे, देशात चर्चिला गेलेला लातूरचा पाणीप्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त होत असला तरी तो आनंद दीर्घकाळ टिकण्यासाठी बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प भरणे आवश्यक आहे़
पूर आला म्हणून जायकवाडी ३३ टक्क्यांवर पोहोचले़ त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या पूर्णा-येलदरीत आठ टक्के जलसाठा आहे़ सिद्धेश्वर, निम्न तेरणा, मनार प्रकल्पांची स्थिती वेगळी नाही़ त्यामुळे जिल्ह्याची ठिकाणे असलेल्या लातूर, परभणी, जालना, बीड शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न नजीकच्या काळातच पुन्हा उभा राहणार आहे़ ग्रामीण भागात जलयुक्त शिवारने दिलेला अंशत: दिलासा दिसत असला तरी मराठवाड्याचा प्रश्न दीर्घकालीन मोठ्या योजनांशिवाय सुटणार नाही़ पावसाळ्यात का होईना वाहणाऱ्या नदीपात्राच्या परिसरात असलेल्या तलावांमध्ये पाणी उचलण्याची सोय करावी लागणार आहे़
सरकारी काम सहा महिने थांब़़़
गेल्या वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला़ ज्याद्वारे १८०० मिलिमीटर पाऊस पाडला, असा दावा राज्य सरकारने केला़ तो कोठे आणि कधी पाडला, हा प्रश्न असला तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात़ या वर्षी मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणाऱ १२३ टक्के पाऊस होणाऱ, १०६ टक्के पाऊस होणार, असे वेधशाळेचे अंदाज प्रसिद्ध होत राहिले़ परिणामी सरकारनेही कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर टाकला़ मराठवाड्यात शून्य टक्के उपयुक्त साठा असलेल्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी झाली़ सरकारने मात्र राज्यभर होत असलेल्या कोसळधारांकडे बोट दाखवत प्रयोगाला पूर्णविराम दिला़ याउलट प्रयोग झाला असता व तो यशस्वी केला गेला असता तर पेयजलाचे नियोजन दीर्घकाळ टिकले असते़ शेवटी पावसाच्या कृत्रिम प्रयोगासाठीही सरकारी काम सहा महिने थांब असेच झाले़
- धर्मराज हल्लाळे

Web Title: Still eyes to the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.