खट्टर निवडीने नवे पर्व सुरू
By Admin | Updated: October 24, 2014 03:01 IST2014-10-24T02:54:05+5:302014-10-24T03:01:21+5:30
जेव्हा कुठला राजकीय पक्ष बहुमतात येतो, तेव्हा त्याला आपला एक नेता निवडावा लागतो. संसदीय लोकशाहीतली ही एक सामान्य प्रक्रिया आहे
खट्टर निवडीने नवे पर्व सुरू
अवधेश कुमार (ज्येष्ठ पत्रकार) -
जेव्हा कुठला राजकीय पक्ष बहुमतात येतो, तेव्हा त्याला आपला एक नेता निवडावा लागतो. संसदीय लोकशाहीतली ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या नात्याने भाजप हायकमांडने हरियाणाच्या मुख्यमंत्र्याच्या रूपात मनोहरलाल खट्टर यांची निवड केली तर तिला सामान्य प्रक्रियेचेच एक अंग मानले पाहिजे. पण कुणाची निवड अशीच होत नाही. तिला काही आधार लागतो. खट्टर यांच्या निवडीमागे काय आधार होता, याचे विश्लेषण केले तर नव्या पर्वाचे संकेत मिळतील. कुठल्या कसोटीवर हायकमांड नवा नेता निवडते? काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांचे युग असो की राजीव गांधी किंवा सोनिया गांधी, या तिघांच्याही काळात गांधी घराण्याप्रतिची निष्ठा ही एक कसोटी मानली गेली. प्रादेशिक पक्षांमध्ये तर त्या पक्षाचा नेताच स्वत: मुख्यमंत्री बनतो. त्याची इच्छा नसेल तर आपल्या घरातल्या एखाद्याला बनवतो. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी स्वत:च्या मुलाला- अखिलेश यादव याला मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर बसवले. लालुप्रसाद यादव यांना तुरुंगात जाण्याची पाळी आली तेव्हा त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी हिला आपली खुर्ची दिली. राजा आपल्या मुलाला गादी देतो तशी फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्रिपदी बसवले. कित्येक वेळा कामाची नसतानासुद्धा एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते; कारण दबाव असतो. नेत्याची लोकप्रियता आणि सरकारमध्ये काम केल्याचा अनुभवही अनेकदा मोजला जातो. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री या साऱ्या कसोट्यांपलीकडचे आहेत. वयाच्या ६० व्या वर्षी यंदा ते पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. हरियाणातले ते पहिले भाजपचे मुख्यमंत्री. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या राजकारणावर जाट समाजाचे वर्चस्व राहिले आहे. जाट समाजाची लोकसंख्या या राज्यात २१ टक्के आहे. जाट समाजाचाच मुख्यमंत्री इथे येत गेला. या आधी भजनलाल हे बिगर-जाट नेते १९९६ मध्ये पायउतार झाले. त्यानंतर ही खुर्ची जाटांकडेच राहिली. ९० जागांच्या विधानसभेत ४७ जागा देऊन भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवली. त्यामुळे देशाच्या राजकारणात हरियाणा एकाएकी चर्चेत आले आहे.
कर्नाल मतदारसंघातून खट्टर ६३ हजार मतांनी आमदारकीची निवडणूक जिंकले. एवढी मोठी लीड ही मोठी गोष्ट असली तरी त्यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची लोकप्रियता स्वत: सिद्ध केली आणि नेता बनले. पण खट्टर यांच्याबद्दल तसे म्हणता येणार नाही. त्यांना आताशा कुठे आपले नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. मग प्रश्न निर्माण होतो की, ४७ आमदारांमध्ये त्यांनाच का निवडण्यात आले? भाजप नेते म्हणून रामविलास शर्मा का नाही? सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अनिल वीज का नाही? कृष्णपाल गुर्जर, कॅप्टन अभिमन्यू, चौधरी वीरेंद्रसिंग यांच्यापैकी कुणी का नाही? अशी अनेक नावं घेतली जाऊ शकतील? या सर्वांमध्ये खट्टर हेच मोदी आणि अमित शहा यांना आवडले. त्याचे कारणही तसलेच जबरदस्त असेल. पण केवळ मोदींची पसंती म्हणून या निवडीचे महत्त्व कमी करता येणार नाही. मग काय आहे या निवडीचे महत्त्व?
खोलात जाऊन पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी नरेंद्र मोदींनी काही निकष ठरवून दिले आहेत. त्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा डाग नसावा. थोडक्यात, ‘मिस्टर क्लीन’ असावा ही पहिली कसोटी. मुख्यमंत्री सामान्य कुटुंबातून आलेला असला पाहिजे ही दुसरी कसोटी. दांडगा जनसंपर्क ही तिसरी कसोटी. मनोहरलाल खट्टर या तिन्ही कसोट्यांवर टिकले. त्यांची संपत्ती फक्त अडीच लाख रुपये आहे. म्हणजे पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वांत गरीब. अशा व्यक्तीला तर कुणी राजकीय पक्ष तिकीटही देणार नाही. हरियाणाच्या राजकारणात तर अशक्यच. खट्टर समाजाच्या तळागाळातून आले आहेत. त्यामुळे त्यांना गरिबांच्या सुखदु:खाची जाणीव असणार. अविवाहित आहेत. म्हणजे कुटुंब नाही. भ्रष्टाचार करतील कुणासाठी? मागेपुढे कुणीच नाही. व्यवसाय नाही, म्हणजे कायदा बदलवून लाभ उपटण्याचा वा दुसऱ्याला फायदा मिळवून देण्याचा धोका नाही. या साऱ्या कसोट्यांमध्ये पास होणे सोपे नाही हे सांगायची आवश्यकता आहे काय?
या आधीच्या सरकारांनी हरियाणात स्वत:ला, नातलगांना किंवा काही व्यावसायिक घराण्यांना फायदा मिळवून देण्यासाठी काम केले, ते लपून राहिलेले नाही. हरियाणाच्या दावेदारांमध्ये अनेक दावेदार होते. अनेक योग्य व्यक्ती होत्या. त्यांच्या कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा होती. पण त्यांच्यामध्ये असा कुणी नव्हता की, जो साऱ्या कसोट्यांमध्ये पास होऊ शकेल. एका नेत्याने ओमप्रकाश चौटाला यांच्या राजवटीत लहानसहान कामं करवली. त्या बदल्यात पैसेही घेतले, अशी चर्चा झाली. समजा त्यांना मुख्यमंत्री बनवले असते तर! ज्यांनी त्यांची कामे केली, त्यांच्यापुढे हे आत्मविश्वासाने उभे राहू शकले नसते. कित्येक पुढाऱ्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. व्यवसाय करणे पाप नाही; पण तो करताना नेहमी एक धोका असतो. त्याच्या धंद्याला नुकसान पोचवणारे निर्णय तो कसा घेईल?
मोदींनी बऱ्याच विचारांती खट्टर यांची निवड केली. जरा तुलना करा. मोदी हे संघाचे प्रचारक राहिले आहेत आणि मनोहरलाल हेही प्रचारक होते. मोदी राष्ट्रीय पातळीवर संघटनेचे काम पाहत होते, तर खट्टर प्रादेशिक पातळीवर सक्रिय होते. मोदी हे खट्टर यांना जवळून ओळखतात. शिस्तप्रिय, कठोर निर्णय घेण्यात मागेपुढे न पाहणारे नेतृत्व म्हणून खट्टर यांची कीर्ती आहे. तळागाळावर त्यांची पकड असणार. प्रत्येक भागाचे प्रश्न त्यांना ठाऊक असणार. पुढे मुख्यमंत्री कसे असतील, याची झलक मोदी यांच्या या पसंतीमध्ये दिसते. स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला प्राधान्य दिले जाईल ही गोष्ट मोदी यांनी खट्टर यांना निवडून स्पष्ट केली आहे. खरोखरच अशा पद्धतीने मुख्यमंत्री निवडले गेले तर भारताच्या राजकारणात एका सुखद पर्वाची ती सुरुवात असेल.
मोदी आणि अमित शहा ही जोडी हरियाणाला ‘शतप्रतिशत भाजप’ करू पाहतात. जाट समाजाची मतं भाजपला यंदा कमी मिळाली. ज्यांची मदत मिळाली त्या वर्गाला सशक्त करणे. सवर्ण आणि मागास जातीचे समीकरण तयार होत आहे. चौटाला परिवार दुबळा पडला आणि काँग्रेस लंगडी झाली. अशा हवेत जाट समाज भाजपकडे धावत जाऊ शकतो. अशा प्रकारे खट्टर यांच्या निवडीने जातीच्या भिंतीही कोसळायला सुरुवात होणार आहे. नव्या पर्वाचा पाया घातला गेला आहे.