अध्यात्म मन:शांतीसाठी की व्यवसायासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:46 AM2020-03-06T04:46:15+5:302020-03-06T04:46:26+5:30

ईश्वरावरील ही श्रद्धा म्हणजेच ईश्वर असतो का? आपल्या स्वत:च्या अस्तित्वाला तर्कबुद्धीच्या कसोटीवर खरे ठरविण्यासाठी मनुष्य अज्ञात शक्तीचे अस्तित्व मान्य करण्यात तयार होतो असे दिसते.

Spirituality for peace or business? | अध्यात्म मन:शांतीसाठी की व्यवसायासाठी?

अध्यात्म मन:शांतीसाठी की व्यवसायासाठी?

Next

- डॉ. एस. एस. मंठा
परमेश्वराचे अस्तित्व खरोखर आहे का? निरनिराळी देवालये ही परमेश्वराची निवासस्थाने आहेत का? परमेश्वराचे अस्तित्व तार्किकता आणि भावनात्मक यांच्यामध्ये कुठेतरी असते का? गूढ गोष्टी, माणसाचे अस्तित्व, त्याचे ज्ञान, त्याची ओळख, वेळेचे भान आणि वातावरण यांच्याशी निगडित असलेल्या अध्यात्मातून याची उत्तरे मिळतील का? आस्तिक आणि नास्तिक लोक हे याविषयीच चर्चा करीत असतात. सध्याच्या तणावपूर्ण जगात, आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी पलायनवादाचा सोपा मार्ग स्वीकारीत असतात. वाढत्या व्यावसायिकीकरणामुळे लोक तणावमुक्तीसाठी धर्माकडे वळत असतात. अशा स्थितीत विज्ञान हवे की धर्म हवा? असा संघर्ष मनात निर्माण होतो. या जगाच्या अस्तित्वाची उत्तरे विज्ञानातून मिळतात, असे अनेकांना वाटते तर अनेकांना ती ईश्वराच्या कल्पनेतून मिळतात असे वाटते. ईश्वरावरील ही श्रद्धा म्हणजेच ईश्वर असतो का? आपल्या स्वत:च्या अस्तित्वाला तर्कबुद्धीच्या कसोटीवर खरे ठरविण्यासाठी मनुष्य अज्ञात शक्तीचे अस्तित्व मान्य करण्यात तयार होतो असे दिसते.
ही अज्ञात शक्ती म्हणजेच ईश्वर आहे, अशी धारणा असते. आपल्यातीलच एखाद्या व्यक्तीस अधिक शक्तिशाली आणि अधिक श्रेष्ठ ठरवून आपल्याला त्यापासून अनेक फायदे मिळतात. या तर्कामुळे ईश्वराची अनेक रूपे असतात, या कल्पनेला बळ मिळते.


पृथ्वीवरील सम्राटांनी मानवांना एकत्र येण्यासाठी देवालयांची निर्मिती केली़ पण त्यामागील उद्देश आपल्या प्रजेवर नियंत्रण ठेवणे हाच होता. राजाचे म्हणणे ऐकले नाही, तर ईश्वराचा कोप ओढवेल, असे प्रजेस सांगण्यात येत होते. परमेश्वराच्या प्रतिमेभोवती जी दैवी आभा निर्माण करण्यात आली त्यामुळे प्रजेवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले. सुरुवातीला केवळ भगवान शिवाचीच देवालये निर्माण करण्यात आली; कारण तोच सृष्टीचा निर्माता, रक्षणकर्ता आणि विनाश करणारा आहे असा समज होता. त्यानंतर अनेक देवतांची देवालये निर्माण झाली.
वास्तविक, मंदिरांची किंवा प्रार्थनागृहांची निर्मिती ही शांतता, संयम आणि साधना यातून स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी झाली होती़ पण अलीकडे मंदिरांची निर्मिती ही शॉपिंग मॉलप्रमाणे होऊ लागली आहे; आणि ईश्वराचेदेखील व्यावसायिकीकरण झालेले आहे. मंदिरांच्या देखभालीसाठी श्रीमंतांकडून देणग्या मिळतात. या देणग्या पैसे, सोने, चांदी, जमिनीचे दान या स्वरूपात असतात़ या देणगीमुळे देणगीदाराला पुण्याची प्राप्ती होते अशी समजूत आहे. त्यामुळे काही देवालये ही श्रीमंत झाली आहेत. त्या समृद्धीसाठी देवालयांवर राजकारणी लोकांनी वर्चस्व स्थापन केल्यामुळे खऱ्या श्रद्धावानांना देवालयांपासून फारकत घ्यावी लागली आहे.
वास्तविक, मंदिरे आणि देवता यांनी मानवाला तिमिरातून प्रकाशाकडे नेले पाहिजे. माणसाच्या गरजांची पूर्तता करण्याची ती साधना बनता कामा नये. आॅस्कर वाईल्ड या लेखकाने म्हटले होते की, प्रार्थना ही परमेश्वराने माणसाला त्याच्या पापांबद्दल क्षमा करावी यासाठी नसून त्याच्या अनैतिक कृत्यांबद्दल शिक्षा देण्यासाठी असावी. प्रार्थनेला परमेश्वराचा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा नसावी; अन्यथा ती प्रार्थनाच राहणार नाही, तो परमेश्वरासोबत केलेला पत्रव्यवहार ठरेल. परमेश्वर हा वाईट करणारा आणि चांगले करणाराही असू शकतो. संपूर्ण जगात अगणित देवालये, चर्चेस, कबरी, प्रार्थनालये आणि पवित्र वास्तू अस्तित्वात आहेत. त्यातील काही स्थापत्यकलेचा सुंदर आविष्कार ठरली आहेत तर काही माणसाला गूढ विश्वात नेणारी आहेत.
एक अत्यंत प्राचीन मंदिर जे ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणून ओळखले जाते ते चेन्नईमध्ये आहे. त्यापासून सकारात्मक ऊर्जा मिळते असा समज आहे. दुसरे चिदंबरम देवालय हे जगातील पंचतत्त्वांचे अधिष्ठान समजले जाते. तिरूपती बालाजीच्या मंदिराविषयीसुद्धा गूढतेचे वलय आढळून येते. भाविकांच्या इच्छांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या देवतेत आहे असा समज आहे, पण सर्वांचे कल्याण व्हावे या प्रार्थनेसाठी तसेच कुटुंबात शांतता नांदावी, चांगले आरोग्य लाभावे, झालेले नुकसान भरून निघावे, या इच्छेसाठीही पैसे मोजावे लागतात. ही यादी बरीच लांबलचक असू शकते, मग तुमचे आराध्य दैवत कोणते आहे याला फारसे महत्त्व नसते!

आपले जीवन हे अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याच्या पायºया असतात. देवालय हे असे स्थान आहे, जेथे आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूती घेऊ शकतो. हिंदूंची मंदिरे असोत, ख्रिश्चनांची चर्चेस असोत, मुसलमानांच्या मशिदी असोत की शिखांचे गुरुद्वारा असोत; त्यांनी मानवाला अज्ञान, अंधकारापासून मुक्तीकडे नेले पाहिजे. तोच मुक्तीकडे नेणारा खरा मार्ग आहे.
(माजी चेअरमन, एआयसीटीई)

Web Title: Spirituality for peace or business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.