वेगाचे पुन्हा बळी
By Admin | Updated: June 11, 2015 00:35 IST2015-06-11T00:35:09+5:302015-06-11T00:35:09+5:30
सलमान खानच्या हिट अॅन्ड रन प्रकरणाचा अजून पुरता निकाल लागलेला नसताना एका वकिलीणबाईने पुन्हा रस्त्यावर दहशत निर्माण केली.

वेगाचे पुन्हा बळी
सलमान खानच्या हिट अॅन्ड रन प्रकरणाचा अजून पुरता निकाल लागलेला नसताना एका वकिलीणबाईने पुन्हा रस्त्यावर दहशत निर्माण केली. मुंबईतील फ्री वेवर प्रचंड दारु ढोसून जान्हवी गडकर या उच्चशिक्षित महिलेने आपल्या महागड्या आॅडीखाली टॅक्सीला चिरडत दोघांचा जीव घेतला. गरीब टॅक्सीवाल्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण गडकरबाईची गाडी आलीशान असल्याने त्यांना जरासे खरचटलेही नाही. पेशाने वकील असून म्हणजेच कायद्याची पुरेशी जाण असूनही या महिलेने मद्यप्राशन करुन गाडी चालविली यातच तिच्या बेदरकार वृत्तीचे दर्शन घडते. याआधी नुरीया हवेलीवाला तसेच अॅलेस्टर परेरा या दोघा गर्भश्रीमंतांनीही गाडीखाली गरीबांचे बळी घेतले. सलमान खानला शिक्षा जाहीर झाल्यानंतर न्याय व्यवस्थेचे कोडकौतुक झाले, परंतु लगेचच त्याची सुटका झाल्याने पैशाचा विजय झाल्याची चर्चा रंगली. मुंबईतल्या यापूर्वीच्या सर्व हिट अॅन्ड रन प्रकरणात केवळ सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होताना दिसते, त्याची आकडेवारी प्रसिद्ध होते, तरीही त्यातून कोणी बोध घेतल्याचे लक्षात येत नाही. पैशाच्या जोरावर इथली व्यवस्था वाकवली जाऊ शकते, हा माज असल्यानेच मिजासखोरी वाढते आहे. त्याला अटकाव करायचा तर रस्ता अपघाताचे स्वतंत्र न्यायालय ‘फास्ट ट्रॅक’च्या धर्तीवर उभे रहायला हवे. शिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई व्हायला हवी. पाश्चात्य देशात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या परिणामांची जाणीव असते. परंतु आपल्याकडे व्यवस्था कोळून पिणाऱ्या वृत्ती असल्याने वारंवार रस्ता अपघातातील बळींची संख्या वाढताना दिसते आहे. झटपट निकाल आणि लगोलग कारवाई हेच या प्रकरणाला उत्तर असू शकते. असे झाले तरच सलमान असो वा जान्हवी गडकर, दारु पिऊन गाडी चालवू शकणारच नाहीत. वाहतुकीच्या नियमांचा आदर नव्हे, तर दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते, हे मात्र खरे.