मोहनजी भागवतांना हे का बोलावे लागले? कारण... समाजाला भांडणांची नव्हे तर एकजुटीची गरज!
By विजय दर्डा | Updated: January 6, 2025 07:31 IST2025-01-06T07:30:26+5:302025-01-06T07:31:00+5:30
रोज उठून नव्या तिरस्काराने नवे शत्रुत्व सुरू केले तर जगणे मुश्कील होऊन जाईल!

मोहनजी भागवतांना हे का बोलावे लागले? कारण... समाजाला भांडणांची नव्हे तर एकजुटीची गरज!
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
हिंदू या मुस्लीम के अहसासात को मत छेड़िए
अपनी कुर्सी के लिए जज्बात को मत छेड़िए।
हम में कोई हूण, कोई शक, कोई मंगोल है
दफ्न है जो बात, अब उस बात को मत छेड़िए।
गर गलतियां बाबर की थीं, जुम्मन का घर फिर क्यों जले?
ऐसे नाजूक वक्त में हालात को मत छेड़िए
हैं कहां हिटलर, हलाकू, जार या चंगेज खां
मिट गए सब, कौम की औकात को मत छेड़िए
छेड़िए इक जंग, मिल-जुल कर गरिबी के खिलाफ
दोस्त, मेरे मजहबी नग्मात को मत छेड़िए।
आपल्या तिखट शब्दांसाठी प्रसिद्ध कवी अदम गोंडवी यांनी लिहिलेली ही नज्म मी २०२२ सालच्या जून महिन्यात याच स्तंभात वापरली होती. कारण त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले होते. ‘इतिहास तो असतो जो आपण बदलू शकत नाही. ना तो आजच्या हिंदूंनी लिहिलेला आहे, ना मुसलमानांनी. आता प्रत्येक मशिदीत शिवलिंग कशासाठी शोधायचे?’
- भागवतजी यांनी पुन्हा एकदा हाच मुद्दा मांडल्याने मला त्या जुन्या ओळी आठवल्या. भागवतजी पुण्यात म्हणाले, ‘राम मंदिरावर हिंदूची श्रद्धा आहे; परंतु राममंदिर निर्माण झाल्यानंतर काही लोकांना असे वाटते आहे की नव्या जागी असेच नवे मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेतृत्व मिळवता येईल. मात्र, हे उचित नव्हे. तिरस्कार आणि शत्रुत्वातून रोज एक नवे प्रकरण उकरून काढणे ठीक नाही, हे असे चालणार नाही.’
यावेळी परदेश प्रवासात असताना एका व्यक्तीने सिंगापूरमध्ये मला विचारले, ‘भागवतजी यांच्या विधानावर आपले काय मत आहे?’ - मी त्यांना म्हणालो, ‘अनेक सरसंघचालकांशी निकट परिचयाची संधी मला मिळालेली आहे. भागवतजी पूर्णपणे वेगळे, व्यापक आणि समावेशक विचारधारेचे आहेत. सगळ्यांचा आदर केला पाहिजे, असे त्यांना वाटते. सर्व धर्मगुरूंना ते भेटत असतात. संघाची व्यावहारिक विचारधारणा बदलली नाही तर आपल्या विकासात अडथळा येऊ शकतो, हे भागवतजी यांना ठाऊक आहे. भारताच्या भविष्याचा रस्ता त्यांना दिसतो, म्हणून ते व्यावहारिक मुद्दा सांगत आहेत.’
- भागवतजी यांच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कधी ना कधी तरी अशाप्रकारच्या विवादांना पूर्णविराम द्यावाच लागेल. अन्यथा वाद वाढत जातील आणि त्यातून देशाचे हित साधणार नाही.
माझ्या माहितीनुसार तूर्तास देशात १० धार्मिक स्थळांच्या बाबतीत १८ खटले दाखल आहेत. अशा स्थितीपासून वाचण्यासाठी देशाने स्वीकारलेल्या ‘पूजास्थळ अधिनियम १९९१’ द्वारे १९४७ साली धार्मिक स्थळांची जी स्थिती होती, ती तशीच राखली गेली पाहिजे. आता या अधिनियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. जोवर ही सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर देशातील सर्व न्यायालयांनी अशा प्रकरणांवर निकाल, आदेश देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.
उकरूनच काढायचे म्हटले, तर शेकड्यांनी प्रश्न समोर येतील हेच सत्य आहे. इतिहासातील क्रूर घटना तशा पुष्कळ संधीही उपलब्ध करून देतील. न जाणो किती विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतावर हल्ले केले! हे आक्रमणकर्ते नेहमीच स्थानिक संस्कृतीवर हल्ले करत आले. त्यांनी संस्कृतीची प्रतिके नष्ट केली. भयाचे वातावरण निर्माण केले. आता आपण हा इतिहास उकरून काढत बसायचे की देशाच्या विकासाचा नवा अध्याय लिहायचा? संघ प्रमुखांच्या या विचारांना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही सहमती दर्शवली ही दिलासादायी गोष्ट आहे; परंतु भागवतजी यांनी हिंदूंच्या विषयांवर बोलता कामा नये असा सल्ला अनेक धर्माचार्य त्यांना देऊ लागले, ही चिंतेची गोष्ट आहे. विरोध करणारे धर्माचार्य काळाची गरज ओळखून वागतील, अशी आपण आशा करू.
मी इंडोनेशियातील बालीमध्ये प्रवास केला आहे. येथे सर्वांत जास्त मुस्लीम लोकसंख्या असून त्यांच्याबरोबर हिंदू प्रेमपूर्वक राहतात. हिंदू असल्याचा अभिमान बोलून दाखवू शकतात. अशीच सामाजिक समरसता एखाद्या देशाला विकासाच्या रस्त्यावर घेऊन जात असते.
सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना मी आशा व्यक्त करतो की इतिहास उकरून काढत बसण्यापेक्षा अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने आपण पुढे जाऊ. या घटकेला आपल्यासमोर सर्वांत मोठे, गंभीर असे आव्हान संस्कार, संस्कृती आणि भाषेच्या बाबतीत आहे. सिंगापूरमध्ये मूळची उत्तर प्रदेशमधील एक व्यक्ती मला भेटली, जिला हिंदी येत नव्हते. मूळच्या गुजराती माणसाला भेटलो, ज्याला गुजराती येत नव्हते. संस्कृतीची गोष्ट तर सोडूनच द्या. भारतात भाषा, संस्कृती आणि संस्कारांवर गंभीर संकट ओढवलेले आहे. भाषेत होत असलेली पडझड मला व्यथित करते. इंग्रजी जिंकताना दिसते याचे मला दुःख नाही; परंतु माझी भाषा आकसत चालली आहे, ही भीती मला त्रास देते. हस्तांदोलनाला मी विरोध करणार नाही; पण माझा नमस्कार, प्रणाम गायब होत असेल तर त्याचे भय मला वाटत राहील. मोहनराव भागवत यांच्याकडे एक मोठी संघटना आहे. त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. नवे वर्ष भाषा संस्कृती आणि संस्कारांचे रक्षण करणारे वर्ष ठरावे, अशी आशा आपण करू. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. जय हिंद !
vijaydarda@lokmat.com