शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

एक देश, एक निवडणूक भाजपला का हवी आहे? एखाद्या राज्यातील सरकार कोसळेल तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:33 IST

पुन्हा निवडणुकीच्या फंदात पडूच नये ही भूमिका विरोधी पक्षांच्या गळी उतरवून स्वत:ची खुर्ची वाचवण्याचे उत्तम साधन सरकारच्या हाती द्यायचे आहे का?

कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ

‘एक देश, एक निवडणूक ‘ही एक निव्वळ राजकीय घोषणा आहे. देशभरात एकाच वेळी निवडणुका घेणे हा भाजपाचा अजेंडा आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका त्यांना एकत्रित हव्या आहेत.  परंतु ‘ एक देश ‘ या कल्पनेशी याचा सुतराम संबंध नाही. १९५२ पासून आजवर अशा समकालिक निवडणुका घेण्याचा कायदा अस्तित्वात नव्हता. या प्रदीर्घ काळात आपण एक देश नव्हतो की काय? 

‘एक निवडणूक’ हाही चुकीचा शब्दप्रयोग आहे. रामनाथ कोविंद समितीच्या शिफारशीनुसार ही ‘एक निवडणूक’ आरंभी एकत्र घेतली जाईल खरी पण अध्ये-मध्येच निवडणूक घेणे भाग पडणारी परिस्थिती पुढे उद्भवतच राहणार. केंद्रातील किंवा एखाद्या राज्यातील सरकार कोसळेल तेव्हा लोकसभेच्या किंवा संबंधित विधानसभेच्या निवडणुका केवळ उर्वरित कालावधीसाठी घेण्यात येतील. त्यामुळे ‘एक निवडणूक’ ही घोषणा आणि त्यामागचा उद्देश तद्दन राजकीय आहे. आता या एकत्रित निवडणुका म्हणे २०२९ मध्ये घ्यावयाच्या आहेत. १७ राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्ती पूर्वीच बरखास्त कराव्या लागतील.  हे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन ठरेल. कारण प्रत्येक सरकारला आपला कालावधी पूर्ण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. लोकांनी आपल्यालाच मत द्यावे म्हणून  राजकीय पक्ष  जाहीरनाम्याद्वारे आपला कार्यक्रम जनतेसमोर ठेवतात. निहित कालावधीत सत्तारूढ पक्षाने कशी कामगिरी केलेली आहे हे जाणून घेण्याचा नागरिकांना हक्क असतो. परंतु मुदत मध्येच संपुष्टात आल्यामुळे पक्षांच्या विश्वासार्हतेला हकनाक हानी पोहोचू शकते.

एकाच वेळी निवडणूक घेण्यामुळे  खर्चात बचत होईल असा युक्तिवाद केला जातो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ६०,००० कोटींचा खर्च झाला होता तर २०२४ साठी तो १,३५,००० कोटी इतका झाला. एकत्रित निवडणुका झाल्या तर सरकारची  आणि राजकीय पक्षांचीही  बरीच बचत होईल असे मानले जाते. सतत निवडणुका होत राहिल्याने धोरणात्मक कुंठा  निर्माण होते.  ती शासकीय दृष्ट्या योग्य नाही असाही युक्तिवाद केला जातो. याशिवाय प्रशासकीय कार्यक्षमता, अंतर्गत सुरक्षा, लोकानुनयी योजनात कपात, प्रत्यक्ष मतदानात वाढ,  सामाजिक सुसंवादाची अनुभूती आणि राजकीय स्थैर्याशी निगडित अन्य अनेक कारणेही यासाठी दिली जातात. 

निवडणूक घेण्यासाठी होणारा खर्च आणि अनुषंगिक बचत हा मुद्दा एखादा राजकीय पक्ष  राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या उल्लंघनाच्या समर्थनार्थ  पुढे करतो हे अजबच वाटते. माझ्या मते १५ घटना दुरुस्त्या करणे भाग पाडणाऱ्या   उपक्रमासाठी दिले जाणारे हे कारण अत्यंत बेगडी आणि असंबद्ध आहे. शिवाय खर्च कमी होईल असे मानण्यालाही कोणतेच संयुक्तिक कारण दिसत नाही. कारण एकत्रित निवडणुका घेण्यास सुरुवात झाल्यानंतरही राज्य विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका वारंवार घ्याव्याच लागण्याची शक्यता शिल्लक राहतेच.  

या अत्यंत अविचारी प्रस्तावाचा सर्वात गंभीर परिणाम हा की  त्यामुळे लोकशाही अनेकांगाने दुबळी होईल. एक म्हणजे,  प्रत्येक आमदार खासदार जाणून  असतो की त्यांच्यातले निम्मे लोक पुन्हा निवडून येण्याची फारशी शक्यता नसते. साहजिकच  पाच वर्षांची मुदत पूर्ण होईल. आपले सदस्यत्व टिकवण्याचीच  इच्छा प्रत्येकाला  असणार. समजा निवडणुकीनंतर दोन किंवा तीन वर्षांनी  केंद्र किंवा राज्यातील सरकारवर विश्वास राहिला नाही तरीही  कोणालाच पुन्हा निवडणूक व्हावीशी  वाटणार नाही. उर्वरित दोनतीन वर्षांच्या अर्धवट मुदतीसाठी पुन्हा  भरमसाठ खर्चात पडावे असे कुणाला वाटेल? अशा परिस्थितीत विरोधी सदस्यालाही हे सरकार मुळीच पडू नये असेच वाटणार.

उगाच पुनर्निवडणुकीच्या फंदात पडू नये ही भूमिका विरोधी पक्षांच्या गळी उतरवून स्वत:ला वाचवण्याचे हे एक उत्तम  साधन सत्तारूढ सरकारच्या हाती पडेल. अशी घटनात्मक व्यवस्था आपाेआप लोकशाही विरोधी ठरते. भारतातील  निवडणुकांमागची मूळ संकल्पना हा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही प्रयत्न असंवैधानिक ठरेल. 

निवडणुका एकत्रित असोत नसोत, मोफत वाटप व्हायचे तसे होतच राहील. मध्येच घ्याव्या लागलेल्या निवडणुकीतही अशा गोष्टी दिल्या घेतल्या जातीलच.  प्रशासन आणि विकास बाजूला ठेवून  निव्वळ आपली सत्ता बळकट करणे आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी तिचा दुरुपयोग करणे यावरच भाजपाने कसा भर दिलाय हे आपण पाहिले आहे. निवडणूक दृष्टिपथात नसतानाही ते सामाजिक सौहार्द नष्ट व्हायला  कारणीभूत ठरले आहेत. 

राज्याच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होण्याचा एक मोठा फायदा असा की त्यामुळे  राज्य विशिष्ट स्थानिक समस्यांवर देशव्यापी चर्चा होते आणि  त्या  देश आणि राज्य अशा दोन्ही पातळीवरच्या निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी येतात. एकत्रित निवडणुकीत राज्यांना हा लाभ मिळणार नाही. एक देश, एक निवडणूक ही केवळ आणखी एक अविचारी घोषणा आहे. परिवर्तनासाठी आकांत करत असलेल्या राष्ट्राच्या विकासविषयक प्रश्नांशी तिचा तिळमात्र संबंध नाही.

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनElectionनिवडणूक 2024