शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण - बड्यांसाठी मोठ्या बँका; पण सर्वसामान्य जनतेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:16 IST

सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केली आहे, त्याचा योग्य विचार व्हावा.

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

जागतिक पातळीवरील बँकिंग प्रणाली व तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून त्याद्वारे बँकांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांच्या कर्ज देण्याच्या व गुंतवणुकीच्या क्षमतेत वाढ करणे, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर इतर मोठ्या बँकांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना सक्षम करणे तसेच देशाचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत असून त्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केलेली आहे. 

याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने १२ व १३ सप्टेंबर रोजी दोनदिवसीय शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या बैठकीत बँकिंग क्षेत्रात आगामी काळात करावयाच्या सुधारणा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. भारताला २०४७ पर्यंत देशाच्या विकासदरात वाढ करण्यासाठी जवळपास साडेचार लाख कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या पायाभूत गुंतवणुकीची गरज असून, त्यासाठी डिजिटल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात व जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या तसेच देशातील मोठ्या प्रकल्पांना व उद्योगांना सहजगत्या मोठी कर्ज देऊ शकणाऱ्या मोठ्या व मजबूत बँकांची आवश्यकता आहे. जगातील पहिल्या १०० बँकांमध्ये भारताची केवळ स्टेट बँक असून, तीही मालमत्तेच्या आधारावर ४३व्या क्रमांकावर आहे. 

सन २०४७ पर्यंत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील किमान एक-दोन बँकांनी तरी जगातील पहिल्या २० बँकांमध्ये स्थान मिळवावे असे सरकारला वाटते. सरकारी मालकीच्या बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने २७ राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलीनीकरणाद्वारे १२ बँका करून बँकांच्या खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. २०२१-२२ सालासाठीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन सरकारी मालकीच्या बँका, एक सर्वसाधारण विमा कंपनी यांचे खासगीकरण करण्याची तसेच ‘आयडीबीआय’ बँकेची विक्री करण्याची घोषणा केली होती; परंतु विविध राज्यांच्या विधानसभांच्या तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने बँकांच्या खासगीकरणाचे धोरण काही काळ स्थगित ठेवले होते. आता सरकारने ‘आयडीबीआय’ बँकेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारी बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून १२ बँकांचे विलीनीकरण करून, तीन ते चार बँका करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

‘भारतातील विमा व बँकिंग क्षेत्र आमच्यासाठी खुले करा,’ ही अमेरिकेसह अन्य बड्या राष्ट्रांची गेल्या ४० वर्षांपासूनची सातत्याची मागणी आहे. या दडपणाखालीच सरकारने विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले असून आता विमाक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्के करण्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. 

वास्तविक आयुर्विमा महामंडळ ही प्रचंड वित्तीय ताकद असलेली देशातील सर्वांत मोठी व जगातील चौथी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. आयुर्विमा महामंडळ जगातील तिसरा सगळ्यांत मजबूत विमा ब्रँड म्हणून ओळखला जातो. असे असताना सरकारने आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करून त्याद्वारे खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल का सुरू केली आहे? देशी व विदेशी विमा कंपन्यांनी महामंडळाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले असून, सरकार लवकरच महामंडळामधील ६.५ टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या तीन ते चार बँका करण्याच्या नावाखाली त्या बँकांचे खासगीकरण करणे, हाच सरकारचा मुख्य हेतू आहे. 

सेवाशुल्कात भरमसाट वाढ करणे, ठेवींवरील व्याजदरात कपात करणे व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळविणे हाच खासगी बँकांचा मुख्य हेतू असतो. या बँकांनी बचत खात्याच्या किमान शिल्लक रकमेत केलेली भरमसाट वाढ पाहता देशातील कोट्यवधी सर्वसामान्य लोक बँकिंग सेवेला वंचित होण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय योग्य आहे का, याचा सांगोपांग विचार करण्याची आवश्यकता आहे.

kantilaltated@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Mergers: Big Banks for Corporates, What About Common People?

Web Summary : Public bank mergers aim for global competitiveness, but critics fear privatization, increased service charges, and reduced access for common citizens. Is it truly progress?
टॅग्स :bankबँक