कोलकाता नाईटरायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याने आयपीएलमध्ये काल रात्री लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झालेला सामना गाजवला. या सामन्यात कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला असताना रिंकूने ८१ धावांची तुफानी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. एवढंच नाही तर या खेळीदरम्यान रिंकूने अशा एका विक्रमाला गवसणी घातली आहे की, ज्यामुळे युवराज सिंह आणि रवींद्र जडेजासारखे दिग्गजही मागे पडले आहेत.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या लढतीत रिंकू सिंहने ५१ चेंडूत नाबाद ८१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, रिंकूने ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यात दिग्वेश राठीने टाकलेल्या डावातील २० व्या षटकात रिंकूने हा अनोखा विक्रम रचला. डावातील अखेरच्या षटकात सलग ४ हून अधिक षटकार ठोकण्याची रिंकूची ही दुसरी वेळ आहे. त्याबरोबरच रिंकू हा आयपीएलमध्ये २० व्या षटकात चारहून अधिक षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने याबाबतीत युवराज सिंह, रवींद्र जडेजा या दिग्गजांना मागे टाकले आहे. याआधी रिंकूने या षटकात दिग्वेशच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले. याआधी २०२३ च्या आयपीएलमध्ये रिंकूने गुजरातविरुद्धच्या लढतीत यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून कोलकात्याला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.
दरम्यान, काल रात्री झालेल्या लढतीत रिंकू सिंहने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने २० षटकांत ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने डावातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने ठोकलेल्या षटकाराच्या जोरावर १५५ धावा करत सामना टाय केला होता. मात्र सुनील नारायणने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या फलंदाजांनी निराशा केली. तसेच त्यांना केवळ एकच धाव काढता आली. अखेरीस या सामन्याचा हिरो ठरलेल्या रिंकू सिंह याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.