हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पंजाबात भगव्या छावणीने दारे केवळ सताड उघडली नसून त्यांच्या बिजागऱ्याही उचकटून टाकल्या आहेत. अमित शाह यांची ‘दारे उघडी’ हे धोरण केवळ डावपेच नसून ती भाजपमधलीच एक अस्वस्थ पोकळी आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधील अनुभवानंतर भाजपसमोर एकच पर्याय आहे : तुम्हाला एखाद्या व्यवस्थेशी सामना करता येत नसेल, तर ती व्यवस्था चालवणारी माणसेच विकत घ्या! परंतु, पंजाब भाजपतील बुजूर्ग मंडळी मात्र यामुळे अस्वस्थ झाली आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या मंत्राचा जप करत त्यांनी कित्येक वर्षे घालवली. आता त्यांना जाग आली तेव्हा ‘भाजप काँग्रेसयुक्त’ झालेला दिसतो आहे.
सुनील जाखड यांच्या अंगात काँग्रेसच्या शतकी परंपरेची गुणसूत्रे वाहत आली; त्यांच्याकडे आता भाजपची सूत्रे गेली आहेत. रवनीत सिंग बिट्टू फुटून आले ते थेट केंद्रीय मंत्रिमंडळातच शिरले. ‘महाराजा’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला सगळा काँग्रेसी दरबारच कमळाच्या छावणीत आणून ठेवला. दिल्लीचा संदेश स्पष्ट आहे- ‘जिंकणे म्हणजेच निष्ठा’. खासगी कंपन्या ज्याप्रमाणे गुणवान माणसे शोधतात, तसा शोध चालला आहे. मग त्यात जीवरक्षक आधार हवा असलेले ‘आप’मधले बंडखोर खासदार असोत किंवा वाऱ्याची दिशा ओळखणारे अकाली दलातले बुजुर्ग असोत; त्यांच्यासाठी स्वागताच्या पायघड्या घालण्यात आल्या. आसाम मॉडेलच; पण आणखी ताकद भरून पंजाबात आणलेले. गुवाहाटीत मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ पाहिले तर त्यात पूर्वाश्रमीच्या काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांची मांदियाळी दिसते. पंजाब आता त्याच रस्त्याने धावत निघाला आहे. पक्षाच्या पडत्या काळात भाजपबरोबर राहणाऱ्या बुजुर्गांना मात्र कडवट घोट गिळावे लागत आहेत. काँग्रेसच्या हाताशी त्यांनी उभे आयुष्य दावा मांडला होता; त्याच हातात आता त्यांना कमळ पाहावे लागते आणि त्यांचे आदेश ऐकावे लागतात. काहीही करून शेतकरी आंदोलनाच्या भूमीत भाजपला पाय रोवायचे आहेत. दारे उघडी आणि महत्त्वाकांक्षा पक्क्या असल्याने मूळचा भगवा रंग आता काँग्रेसमध्ये मिसळून विरत चालला आहे.
राहुल गांधी यांची केरळमध्ये गुगली
‘राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास महिला मुख्यमंत्री झालेली पाहायला मला आवडेल’ असे म्हणून राहुल गांधी यांनी केरळमध्ये एक राजकीय गुगली टाकली. राहुल यांनी सोनिया गांधी इस्पितळात असताना त्यांना आलेला अनुभव निवडणूक प्रचारात कथन केला. केरळमधील एक परिचारिका आपल्या आईची किती बारकाईने काळजी घेते, याविषयी त्यांनी सांगितले. ‘केरळमधली ती परिचारिका दर तासाला येऊन माझ्या आईला तपासून जायची. अशा हजारो कुटुंबांना त्यांच्या संकटकाळात त्यांनी दिलासा दिला असेल,’ असे राहुल म्हणाले.
अर्थात हे त्यांचे भावनिक आवाहन असले तरी त्यात राजकारणसुद्धा आहे. त्यांच्या या विधानामुळे के. सी. वेणुगोपाळ, रमेश चैन्नीथाला, व्ही. डी. सतीशन यांच्यासारखे ज्येष्ठ काँग्रेस नेते अस्वस्थ झाले. केरळ काँग्रेसमध्ये महिला नेत्यांची संख्या फारशी नाही. पक्ष लढवत असलेल्या ९५ जागांपैकी आठ किंवा नऊ ठिकाणी महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राहुल यांना जे वाटते ते आणि वस्तुस्थिती यातला फरक उघड दिसतो. ज्यांची नावे घेतली जातात त्यात खासदार हिबी एडन यांचे नाव आहे. मात्र, त्या निवडणूक रिंगणात नाहीत. शनिमोल उस्मान, बिंदू कृष्णा, उमा थॉमस यांच्याही नावाची चर्चा आहे. शिवाय माजी खासदार आणि दलित नेत्या रम्या हरिदास यांचाही उल्लेख होतो. तूर्तास राहुल गांधी यांनी टाकलेला गुगली गडी बाद करील की नाही हे निकालाच्या वेळी आणि समोर येणाऱ्या आकडेवारीवर ठरेल.
अरिफ मोहम्मद ढाक्यात..?
बांगलादेशमध्ये राजदूत म्हणून ज्येष्ठ राजकीय नेत्याला पाठवण्याचा विचार मोदी सरकार गांभीर्याने करत आहे. तसे घडल्यास नवा पायंडा पडेल. उच्चायुक्त म्हणून राजकीय नेत्यांचा विचार व्हायला सुरुवात होईल. परवापर्यंत बिहारचे राज्यपाल असलेले अरिफ मोहम्मद खान यांच्या नावाची चर्चा ढाक्यासाठी सुरू आहे. राज्यपाल पदावरून त्यांना जावे लागल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले होते. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावरून जातील हे ज्या दिवशी ठरले, त्याच दिवशी त्यांना पदावरून हटवण्यात आले. अलीकडेच राष्ट्रीय सेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर मथुरेत अरिफ मोहम्मद खान दिसले होते. एखादा बंगाली बोलणारा राजदूत निवडला जाईल अशीही चर्चा आहे. बांगलादेशमध्ये झालेले राजकीय स्थित्यंतर आणि तारिक रहमान नवे पंतप्रधान झाले असताना तिथल्या नव्या उच्चायुक्तपदाची चर्चा सुरू झाली आहे. सध्याचे तेथील राजदूत प्रणय कुमार वर्मा लवकरच निवृत्त होत आहेत.
harish.gupta@lokmat.com
Web Summary : Punjab BJP welcomes Congress leaders, unsettling veterans. Assam model replicated, prioritizing victory. Rahul Gandhi's 'woman CM' remark stirs Kerala Congress. Arif Mohammad Khan eyed for Bangladesh envoy post.
Web Summary : पंजाब भाजपा कांग्रेस नेताओं का स्वागत करती है, जिससे अनुभवी नेता परेशान हैं। असम मॉडल दोहराया गया, जीत को प्राथमिकता। राहुल गांधी की 'महिला सीएम' टिप्पणी ने केरल कांग्रेस को हिला दिया। आरिफ मोहम्मद खान बांग्लादेश में राजदूत पद के लिए देखे जा रहे हैं।