शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

विशेष मुलाखत : लेखक-प्रकाशकांनी रडारड कशाला करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:39 IST

पूर्वीचे लेखक-वाचक उच्च होते, आज सगळा ऱ्हास झाला हे काही खरं नाही. जे उथळ, वरवरचं असतं ते सगळं आपोआप वाहून जातंच!.. ते होऊ द्यावं!

दिलीप माजगावकर, संपादक, राजहंस प्रकाशनगेल्या वीस वर्षात प्रकाशन व्यवसायाला उतरती कळा लागल्याची, अन्य माध्यमांनी आक्रमण केल्याची चर्चा आहे...मराठी प्रकाशन व्यवसाय आणि उतरती कळा हे आता समीकरणच झालेलं आहे आणि माझ्या कळत्या वयापासून मी हे ऐकत आलो आहे. मध्यंतरीच्या या दीर्घ काळात आकाशवाणी आली, दूरदर्शन आले, खाजगी वाहिन्या आल्या आणि नंतर पंधरावीस वर्षात इंटरनेट आलं. ही सर्व माध्यमं आली तरी आपलं वाचन थांबलंय का?,  मराठी भाषेच्या गंभीर स्थितीविषयी शंभर वर्षांपूर्वीच राजवाड्यांनी चिंता व्यक्त केली होती. तरीही या शंभर वर्षात मराठी पुस्तकांचं वाचन सुरुच आहे व पुढेही ते चालू राहाणार आहे. नवीन माध्यमांमुळे काही काळ शहरातला वाचकवर्ग कमी होताना दिसतो, मात्र ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार वाढत गेला तसं तिथल्या वाचक-लेखकांनी ही जागा भरून काढली आहे. व्यवसायाला फटका बसतो पण, दीर्घ कालावधीमध्ये अशी स्थित्यंतरं मोठ्या व्यवसायात येतच असतात. ती  स्वीकारायला हवीत. उगीच रडारड करत राहून काय साधणार?

संकटं संधीही घेऊन येतात. कोरोना संकटात लेखक प्रकाशकांसाठी काय संधी दिसते? कोरोनाचं अकल्पित संकट भांबावून टाकणारं होतं, पण चार-सहा महिन्यांनी आपण त्यातून सावरायला सुरुवात केली. कोणीच कुठं जाऊ शकत नव्हतं. अशा वेळी  ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आणि ऑनलाईन पुस्तकांच्या विक्रीचं प्रमाण काही अंशी वाढलं.  समाज माध्यमांचं आकर्षण होतं, लेखक त्यावर भरभरून लिहू लागले. पण, विचार करणारे लवकरच गंभीर लेखनाकडे वळले. समाजमाध्यमांच्या आधी केवळ दैनिकं, मासिकं आणि पुस्तकं इथेच लेखन-संधी होत्या. तिथे आपल्याला प्रवेश नाही असं वाटणाऱ्या प्रत्येकाला इंटरनेटने एक खुलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.  लिहिल्यावर तत्काळ प्रतिसाद  हेही नवीन होतं. पण ताबडतोबीच्या प्रतिसादाचं अल्प समाधान फार काळ टिकत नाही हेही कळलं. त्यातून बोध घेऊन यातले काही गंभीर लेखनाकडे, वाचनाकडे वळले. 

सकस, दर्जेदार लेखन करणारा वर्ग हा सर्व काळात, सर्व ठिकाणी मुळात कमीच असतो. त्यामुळे पूर्वीचं साहित्य, नाटक, चित्रपटादी कला उच्च होत्या व आज त्या सर्वांचा ऱ्हास झाला हे काही खरं नाही.  तात्कालिक लेखनाच्या लाटा येतात तेव्हा, त्या येऊ द्याव्यात. त्यात जे उथळ आणि वरवरचं असतं ते सगळं वाहून जातं, ते होऊ द्यावं.  वाचकांच्या समजशक्तीवर  विश्वास हवा.  चांगलं - बेताचं - वाईट साहित्य वाचक त्याच्या नजरेतून जोखत असतोच.  वाचकाला कुणीही गृहित धरू नये.

पूर्वी दिवाळी अंकांमधून, वाङ्मयीन नियतकालिकांमधून नवे लेखक हेरले जायचे. आजघडीला कसे शोधता? एकेकाळी मासिकांमधून लिहिते राहिलेले  लेखक प्रस्थापित होऊ शकले. पुलंचं ‘अपूर्वाई’सुद्धा आधी ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झालं होतं. या अंकांनी खूप चांगले लेखक समाजासमोर आणले. नव्वद नंतर मासिकांना ओहोटी लागली. काही प्रकाशकांनी केवळ दिवाळी अंकच काढायचा निर्णय घेतला. या काळात नवे लेखक शोधण्याचा मार्ग खुंटला म्हणून आमच्यासारख्या प्रकाशकांची कोंडी होत होती. मात्र  दैनिकांच्या साप्ताहिक आवृत्त्यांमधून  नवीनवी नावं समोर येऊ लागली. २००५ नंतर इंटरनेट वापरात सुलभता आली आणि मोठ्या प्रमाणात लेखक लिहिते झाले. अलीकडे सोशल मीडियावरील गजबज प्रचंड वाढली असली व ती खटकत असली तरी जाणकार प्रकाशक, संपादक आपला लेखक इथं शोधू शकतो असा माझा अनुभव आहे.

शांतपणे खोलवर विचार करण्याच्या क्रियेचाच हल्ली माणसांना कंटाळा येतो, असं वाटतं का? या प्रश्नाला सोपं उत्तर नाही. एक गोष्ट खरीच की गेली वीसेक वर्षं सर्वसामान्य माणसाला भोवळ येईल इतक्या वेगानं जीवनशैली बदलते आहे. या बदलाशी जुळवून घेत स्वत:ला स्थिर करणं, काय हवं-नको याचं भान येणं ही गोष्ट कठीण झालेली आहे. त्यात इंटरनेट, समाज माध्यमं, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, चॅनल्सचे अगणित पर्याय यामुळं अवधान कमी झालं आहे.  या सगळ्या पार्श्वभूमीवर माणसं खोलवर विचार करत नाहीत की, काय असं वरवर पाहता वाटू शकतं. पण,  दुसरीकडे याही काळात मराठीमध्ये मोठमोठ्या चांगल्या कादंबऱ्या आल्या. वैचारिक लेखन झालं. संपूर्ण जगभरच गंभीरपणे साहित्य, चित्रपट, नाटकांकडे बघणारा लेखक वर्ग किंवा प्रेक्षक वर्ग हा सदासर्वकाळ कमीच असतो. त्यामुळं ‘अन्य मोहां’पायी त्यानं स्थैर्य गमावलंय असं मला वाटत नाही.

मराठी वाचणारा नवा वाचकवर्ग कोण, त्याचा वयोगट, आवडी, कल असा काही तपशील हाताला लागतो का?प्रकाशन क्षेत्रात शास्त्रीय पद्धतीनं काम करण्यासाठी अशा तऱ्हेचे पाहणी अहवाल कोणाकडेही उपलब्ध नाहीत. आपला वाचक वर्ग कथा किती वाचतो?, कादंबऱ्या वाचतो का?, उपयोजित पुस्तकं  किती हवी असतात?, यातही ग्रामीण व शहरी, निमशहरी अशा वर्गीकरणासह पाहणी केली गेली तर, दिशा-दिग्दर्शन म्हणून काही प्रमाणात उपयोग होईल. मात्र तरीही अमुक ठिकाणी अमुक प्रकारची कादंबरी खपते, तमुक ठिकाणी कविता-कथा असा डाटा कुठलेही पाहणी अहवाल तुम्हाला देणार नाहीत. या व्यवसायात किंवा कुठल्याही परफॉर्मिंग आर्टस्मध्ये अशी गणिती उत्तरं मिळवता आली असती आणि मोठ्या वाटचालीसाठी दिशादर्शन झालं असतं तर, टाटा-बिर्ला-अंबानी-अदानी आमच्या आधीच या क्षेत्रात आले असते. हुकमी फॉर्म्युला सापडल्याने जे सपाटीकरण होतं ते झालं, तर त्यानं प्रकाशनातलं थ्रिल जाईल.

कविता हे तुमचं प्रेम! , त्यामुळं माणसाच्या आयुष्यात काय बदलतं असं वाटतं? कविताच नव्हे तर एकूण ललित वाङ‌्मय आपलं विचारविश्व व भावविश्व समृद्ध करण्याचं काम करत असतं.  वाचनविचारातून सौंदर्यदृष्टी किंवा संवेदनाशक्ती तीव्र होऊ शकतात. भोवतालच्या जगाकडे तुम्ही केवळ पांढऱ्या व काळ्या रंगातून न बघता अनेक रंगा-कोनातून बघण्याची शक्यता निर्माण होते. माणसाची सुखदु:खं, प्रेरणा, नात्यातल्या गुंतागुंती, महत्त्वाकांक्षा, स्वार्थादी आदिम प्रेरणा याचा शोध ललित साहित्य घेत असतं. हा शोध समजुतीची पातळी उत्क्रांत होण्यासाठी फार महत्त्वाचा.

मुलाखत : सोनाली नवांगुळ

टॅग्स :Diwaliदिवाळीinterviewमुलाखत