कोणाला काही पत्ताच लागू नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:40 IST2016-11-11T00:40:43+5:302016-11-11T00:40:43+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे आणि त्याहून अधिक डेमोक्रॅट हिलरी क्लिन्टन पराभूत

Someone should not know the address? | कोणाला काही पत्ताच लागू नये?

कोणाला काही पत्ताच लागू नये?

अमेरिकेच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे आणि त्याहून अधिक डेमोक्रॅट हिलरी क्लिन्टन पराभूत झाल्याचे अनावर दु:ख काही अमेरिकनांसोबत भारतीयांनाही झालेले दिसते. अर्थात असेच दु:ख खुद्द भारतातही मे २०१४मध्ये केवळ नरेन्द्र मोदी यांच्यापायी भाजपा विजयी झाल्यामुळे अनेकांना झाले होते. त्यातील काहींच्या दु:खाचे कढ तर अजूनही सुकलेले नाहीत. त्यातच ट्रम्प आणि मोदी यांच्यात तुलना करण्याचा मोहदेखील अनेकांना आवरेनासा झाला आहे व त्यातूनच मोदींमुळे केवळ एकटा भारत संकटात सापडला पण आता ट्रम्प यांच्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. जसा विजयाचा एक उन्माद असतो तसाच पराभवाचाही तो असतो. स्वाभाविकच या पराभवी उन्मादात एक बाब नजरेआड केली जाते व ती म्हणजे अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे जगातील अत्यंत बलाढ्य लोकशाही राष्ट्रे आहेत आणि तेथील मतदार नागरिकांनी त्यांचा कौल ट्रम्प वा मोदी यांच्या बाजूने दिला आहे. जेव्हां दोहोंच्या या कौलावर म्हणजेच निर्णयावर जहरी टीका केली जाते तेव्हां त्यात कळत नकळत मतदारांच्या विवेकबुद्धीवर शंका व्यक्त केली जात असते, पण ते कोणी लक्षातही घेत नाही. एका इंग्रजी वचनानुसार ‘लोक ज्या दर्जाचे असतात, त्याच दर्जाचे सरकार त्यांना लाभत असते’. याचा अर्थ ट्रम्प आणि मोदी दर्जाहिन असतील तर मग अमेरिकन आणि भारतीय नागरिक यांचा दर्जादेखील खालावलेलाच आहे, असा निष्कर्ष त्यातून निघतो. आणि जेव्हां तो तसा निघतो तेव्हां बोल कोणी आणि कोणाला लावायचा असतो? पण यातील मुद्दा इतका मर्यादित नाही. तो एका वेगळ्या अर्थाने व्यापक आहे. सतत लोकांमध्ये वावरणारे नेते वा लोकप्रतिनिधी यांना लोकभावनेची नाडी अचूक ओळखता येते असे मानले जाते आणि माध्यमे ही तर म्हणे लोकांचे नाक-कान आणि डोळे असतात, असेही मानले जाते. कदाचित त्यामुळेच ट्रम्प वा मोदी विजयी होतात तेव्हां लोकांनी त्यांचा मनाचा अजिबात थांग लागू दिला नाही याचे संबंधितांना परम दु:ख झालेले असते व या दु:खातून येणारा स्वत:वरील राग तो दोहोंवर काढला जात असतो. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुद्द अमेरिकेतील काय किंवा भारतातील काय, लोकांनी अगोदरच मनोमनी हिलरी क्लिन्टन यांना विजयी करुन टाकले होते. रिपब्लिकन पक्षाचे अलीकडच्या काळातील रिचर्ड निक्सन वा काऊबॉय रोनाल्ड रिगन यांच्या कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची उटपटांग म्हणता येतील अशी विधाने व या विधानांमधील मुस्लीमांपासून कृष्णवर्णियांपर्यंत आणि चिनी लोकांपासून भारतीय लोकांविषयीचा विखार एकीकडे तर अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिलरी क्लिन्टन यांच्या रुपाने एक अनुभवी महिला राष्ट्रपती होईल आणि एक इतिहास घडेल अशी भावना यातून अनेकजण हिलरी यांचे पाठीराखे बनले. याचा अर्थ हा सारा भावनेचा खेळ होता, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. आणि खरा मुद्दा तोच आहे, वास्तव आणि लोकप्रतिनिधी व वास्तव आणि माध्यमे यामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असून तो सतत वाढत आहे. लोकांच्या मनाचा थांग एक तर या लोकांना लागत नाही वा लोकच तो लागू देत नाही. यातून मग उरते ती केवळ पोपटपंची. भारतात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचा उदय झाला तेव्हांपासून मतदानपूर्व चाचण्या, मतदानोत्तर चाचण्या (एक्झीट पोल), निवडणूक निकालांचे विश्लेषण आदिंचे पेव फुटले आणि त्यातूनच ‘सेफॉलॉजी’ नावाचे काही शास्त्र आहे याचा जनसामान्यांना पत्ता लागला. ज्या देशात तब्बल साठ कोटी वा त्याहून अधिक मतदार आहेत त्यांच्यापैकी केवळ काही हजारांच्या मनाचा कौल घ्यायचा आणि त्याआधारे आगामी निवडणूक निकालाचे ठोकताळे (अंदाज नव्हे) मांडायचे अशी पद्धत सुरु झाली. ते आजवर चुकीचेच ठरत आले आहेत. मतदानोत्तर चाचणी हा प्रकार तर अत्यंत मजेशीर. मुळात मतदान हे गुप्त असते व ते गुप्तच रहावे अशी लोकशाहीची अपेक्षा असते. पण मतदान केन्द्राबाहेर उभे राहायचे आणि केन्द्रातून बाहेर पडणाऱ्यास, त्याने कोणाला मत दिले हे विचारायचे व त्यावरुन अंदाज बांधायचे. आजवर अनेकदा या अंदाजांनीही गटांगळ्याच खाल्ल्या आहेत. निवडणूक निकालाचे विश्लेषण करणारे गंभीर चेहऱ्याचे लोक तज्ज्ञ कमी आणि विच्छेदक अधिक असतात. पूर्वीच्या काळी गणिताच्या पुस्तकात आधी गणिते मांडलेली असत व पुस्तकाच्या शेवटी त्यांचा उत्तरे दिलेली असत. जे विद्यार्थी ‘ढ’ असत, ते या उत्तरावरुन ताळा मांडून गणिते सोडवीत असत. तज्ज्ञवजा विच्छेदक नेमके हेच करीत असतात. आपण तज्ज्ञ आहोत असा आभास निर्माण करण्यासाठी मग ‘स्विंग’ वगैरेची भाषा करुन अपूर्णांकी अंक सांगत असतात. हेच सारे भारतातील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झाले आणि आता अमेरिकेच्या निवडणुकीबाबतही झाले. याचा अर्थ मोदी आणि ट्रम्प पराभूत व्हावेत हा संबंधितांचा ‘आशावाद’ होता, लोकांची नाडी ओळखून आलेला अचूक अंदाज नव्हे! साहजिकच विश्लेषण करताना, ट्रम्प यांनी वाढत्या इस्लामी दहशतवादावर अचूक बोट ठेवले पण हिलरी यांनी त्याचा उल्लेखदेखील केला नाही, असा अभिप्राय व्यक्त करुन ‘तज्ज्ञ’ मोकळे झाले. याचा अर्थ त्यांना काय पण कोणालाच काही पत्ता लागलेला नव्हता.

Web Title: Someone should not know the address?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.