एकांतवास हाच आत्मावलोकन घडविणारा..

By किरण अग्रवाल | Published: September 24, 2020 10:45 AM2020-09-24T10:45:13+5:302020-09-24T11:23:47+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हाच सर्वोत्तम उपाय ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Solitude is what makes you introspective. | एकांतवास हाच आत्मावलोकन घडविणारा..

एकांतवास हाच आत्मावलोकन घडविणारा..

googlenewsNext

-  किरण अग्रवाल

संकटेच शिकायची संधी देतात हेच खरे, कारण आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांनी आजवर जीव तोडून एकांतवासाचे महत्त्व विशद केले असले तरी त्यावाटेने जाणारे अपवादात्मकच राहिले आहेत. आयुष्याच्या रहाटगाडग्यात जगण्यासाठीची धावपळ व कोलाहल इतका काही अंगवळणी पडून गेला आहे, की त्यापासून दूर होऊन राहणे हे अनेकांना जमतच नाही. भौतिकतेतील हे गुरफटलेपणच मनुष्याला एकांत लाभू देत नाही. त्यामुळे तो आत्मचिंतनापासूनही दूर राहतो. पण सध्याच्या जागतिक पातळीवर चिंतेच्या ठरलेल्या कोरोनाच्या महामारीपासून बचावण्यासाठी आता याच एकांतवासाकडे वळणे सर्वांसाठी गरजेचे व सुरक्षेचे खात्रीशीर साधन ठरून गेले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हाच सर्वोत्तम उपाय ठरत असल्याचे दिसून येत आहे. बाधितापासून होऊ शकणारा संसर्ग रोखायचा असेल किंवा तो फैलावू नये असे वाटत असेल तर संबंधित बाधिताचे विलगीकरण करणे आवश्यक असते. असे विलगीकरण रुग्णालयातही केले जाते किंवा घरच्या घरीसुद्धा होऊ शकते. हे विलगीकरण म्हणजेच त्या रुग्णासाठीचा एकांतवास. पण याही बाबतीत तितकेसे गांभीर्य बाळगले जात नसल्याने संसर्ग बळावत चालल्याचे दिसून येत आहे. अर्थात, आपल्याकडील पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे लोकसंख्येची घनता ही इतर देशांपेक्षा अधिक आहे. आपल्याकडे कमी जागेत अधिक लोक राहतात. प्रारंभी मालेगावमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक झाला याचे कारण हेच होते. तेथे एका खोलीत आठ ते दहा लोकांचे कुटुंब वास्तव्यास असते. त्यामुळे त्यापैकी एक जरी बाधित झाला तरी त्या खोलीतील सर्वच सहकाऱ्यांना तो बाधित करण्यास पुरेसा ठरतो, ही साखळी तोडण्यासाठी विलगीकरण हाच यावर उत्तम उपाय ठरतो. तेव्हा या निमित्ताने का होईना, एकांतवासाचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले असून, यातून आत्मावलोकनाची संधी लाभून जाणे स्वाभाविक ठरले आहे.



प्राचीन ऋषिमुनींनी एकांतवासातच घनघोर तपस्या व साधना केल्याचे असंख्य दाखले मिळतात. कसल्याही भौतिक सुखाच्या वा साधनांच्या आहारी न जाता ते आपल्या गुहेत राहिलेत, म्हणूनही त्यांना दीर्घायुष्य लाभले व ते मनावर नियंत्रण मिळवू शकले. एकटेपणात आपणच आपली सोबत करून आपल्याला जाणून घेणे व त्यातून आत्मानुभूती घडून येणे हे यात होते. अखिल मानव जातीपुढे आपल्या दिव्य ज्ञानाने प्रज्ञा, शील व करुणा या त्रिसूत्रीचे आचरण ठेवणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे कैवल्य ज्ञान याच एकांतवासाच्या मार्गाची फलश्रुती आहे. भगवान महावीर यांनीही अहिंसा, अपरिग्रह व एकांतवासाचा सिद्धांत मांडला, जो मनुष्याच्या संकटमुक्तीचा राजमार्ग ठरला. केवळ हिंदू, जैन, बौद्ध धर्मीयांतच हा एकांतवास आहे असे नाही, इस्लाममध्येही तो ऐतेकाफ म्हणून ओळखला जातो. ख्रिश्चनांमध्ये त्याचे धागेदोरे ईसा मसिहापर्यंत आढळतात. तेव्हा या एकांतवासाचे महत्त्व व आचरण असे प्राचीन काळापासून आहे, आज कोरोनामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने उजाळा मिळून जात आहे.

एकांतवासात मनाची एकाग्रता साधणे शक्य होते. त्यातून मनाची विचलित अवस्था टाळता येते. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करता येते. या एकाग्रतेतूनच आत्मचिंतन घडून येते. विचाराच्या, ज्ञानाच्या व जाणिवेच्याही कक्षा त्यामुळे रुंदावतात. ‘स्व’ला म्हणजे आपल्या अंतरात्म्याला ओळखण्याची प्रक्रिया यातून घडून येते. आत्मा ते परमात्मा असा आध्यत्मिक प्रवास यातून घडून येतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नसतो. इतरांना ओळखणे अगर जाणून घेणे हे तसे खूप सोपे असते; पण स्वत:ला ओळखणे महाअवघड. ते ज्याला जमले तो सिकंदर. आजचेही संत-माहात्मे असोत, की मोटिव्हेशनल स्पीकर्स; स्वत:ला जाणून घेण्यावरच तर भर देताना दिसून येतात. तेव्हा कोरोनाबाधितांना विलगीकरण म्हणजे एकांतवासानिमित्त तीच संधी लाभून गेली आहे. कारण, खास एकांतवास पत्करून कुणी आत्मावलोकन करण्याची शक्यता हल्ली नाही. सध्याच्या कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढायचे तर यापुढे अधिक वेगाने धावावे लागणार आहे. त्यात कुठे मिळणार एकांतवास? तेव्हा कोरोनामुळे लाभणारच असेल ही संधी तर स्वार्थात परमार्थ साधायला काय हरकत असावी?

Web Title: Solitude is what makes you introspective.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.