कोमलची गोष्ट
By Admin | Updated: March 30, 2015 22:50 IST2015-03-30T22:50:23+5:302015-03-30T22:50:23+5:30
स्वत:च्या मनाचे पूर्ण समाधान व्हावे, यासाठी ती गायची. संगीत हेच तिचे भावविश्व होते. ती कुणी प्रथितयश गायिका नव्हती. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या गरिबाच्या घरची

कोमलची गोष्ट
गजानन जानभोर -
स्वत:च्या मनाचे पूर्ण समाधान व्हावे, यासाठी ती गायची. संगीत हेच तिचे भावविश्व होते. ती कुणी प्रथितयश गायिका नव्हती. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या गरिबाच्या घरची ती प्रज्ञावंत. तिचे नाव, कोमल अशोक चांदेकर. वडील चुन्याचे काम करतात. छोटी मुले पिढीजात वारसा, संस्कारातून घडतात. कोमलच्या बाबतीत तेही नाही. पण तरीही तिला गाणे कळले अन् तिने आत्मसात केले. तिचे स्वर सर्वांना मोहून टाकायचे.
संगीत हे मनोवेधक आणि आनंद देणारे असते. दु:खी-कष्टी जिवांना तो सुखाचा आधार असतो. कोमलच्या आई-वडिलांच्या आयुष्यात तिचे गाणे अमूल्य ठेवा झाले होते. राज्य, देशपातळीवरील शेकडो स्पर्धा कोमलने गाजवल्या. ती संगीत विशारदही झाली. टीव्ही चॅनल्सवरील गाण्यांच्या स्पर्धांमध्ये तिची निवड व्हायची, पण परिस्थितीमुळे ती पुढे जाऊ शकत नव्हती. मुंबईला एका मोठ्या स्पर्धेत तिची निवड झाली. जाण्यासाठी पैसे नव्हते. तत्कालीन आमदार आणि आताचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी तिला मदतीचा हात दिला. कोमल तिथे गेली आणि बक्षीस मिळवून आली. प्रत्येक वेळी कुणापुढे कितीदा हात पसरायचा? तिला हा सल बोचायचा. मग ती स्थानिक स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. चंद्रपूर येथील काँग्रेस सेवादल भवनाच्या मागे कोमलचे घर आहे. तिचा स्वरांकडे वळण्याचा प्रवास मन थक्क करणाराच. घराशेजारीच असलेल्या स्वरविहार संगीत विद्यालयातील मुलांचे स्वर नेहमी तिच्या कानावर पडायचे. ती पाच वर्षांची असेल तेव्हाची ही गोष्ट, कोमल संगीत विद्यालयाच्या भिंतीला टेकून तासन्तास उभी राहायची. कानावर येणारे स्वर मनात साठवून ती घरी यायची आणि तसेच म्हणून पाहायची. विद्यालयात मुले गात असलेली गाणी ती घरी म्हणायची. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ... तब्बल पाच तास संगीत शाळेच्या भिंतीशेजारी तिचे असे अखंड संगीत अध्ययन सुरू राहायचे. कुणी म्हणेल ही तर एकलव्यी निष्ठा. पण एकलव्याला गुरु ठाऊक होता, कोमलला तर कुणीच गुरु नव्हता. अनेक दिवस तिची ही अशी चार भिंतीबाहेरची संगीतसाधना सुरू होती. एके दिवशी शाळेच्या शिक्षिका सुरेखा दुधलकर यांनी तिला बघितले, जवळ बोलावले आणि नंतर तिचे रीतसर शिकणे सुरू झाले. कोमलला आता गुरु मिळाला होता आणि साधनेची दिशाही मिळाली होती. निसर्गदत्त प्रतिभेचे लेणे लाभलेल्या कोमलच्या गोड गळ्यातून निघणारे स्वर सर्वांनाच थक्क करायचे. यापेक्षाही चांगले गाता यावे यासाठी ती धडपडायची. खाण्यातले पथ्य पाळायची. आयुष्याचे सूर हरवलेल्या तिच्या आई-वडिलांना ते शक्य नव्हते. पण मुलीसाठी ते पोटाला चिमटा द्यायचे. माध्यमांच्या जगात नावारूपास आलेल्या व कुवतीपेक्षा थोडी जास्तच प्रसिद्धी मिळवलेल्या समवयस्क गायकांपेक्षा कोमल अनेक स्पर्धांमध्ये काकणभर सरस ठरायची.
कोमलला खूप शिकायचे होते. त्यासाठी तिची दिवस-रात्र साधना सुरू होती. पण वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले आणि गाणे थांबले. तेव्हापासून ती शांत राहायची. कदाचित गाणे थांबल्यामुळे असेल, ती फारशी बोलत नव्हती. तसेही आपण स्त्रीला फार बोलू देत नाहीत. तिला मन मारून जगावे लागते आणि रोज मरावे लागते. तिच्या मनात घोंघावणारी वादळे तिलाच शमवावी लागतात. कोमलचेही तसेच झाले असावे. शेवटी ती थकली आणि कायमची निघून गेली. आजार निमित्तमात्र ठरला. सहा महिन्यांपासून ती आजारी होती. वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. परवा ती गेली. तिला मोठी गायिका व्हायचे होते, या क्षेत्रात करिअर करायचे होते. तिची पात्रता होती आणि त्याच निष्ठेने ती परिश्रमही घ्यायची. तिचे स्वर साऱ्यांनाच ऐकू आले. पण अंतर्मनातली वेदना मात्र तशीच राहिली.
ही एकट्या कोमलची कहाणी नाही. अशा असंख्य कोमल आपल्या अवतीभवती असतात. गरिबीमुळे, स्त्री असल्यामुळे त्यांच्या प्रतिभेचे क्षितिज कुटुंब म्हणून आपण एका उंबरठ्यात करकचून बांधून टाकतो. त्यांच्या अपेक्षा, भावना आपण पायदळी तुडवतो. या प्रज्ञावंतांची स्वप्ने फुलण्याआधीच आपण कुस्करून टाकतो. आपले आयुष्य ते समृद्ध करतात, मात्र अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न मागे सोडून जातात.