समाजमनच खिन्न झाले...

By Admin | Updated: February 16, 2015 23:42 IST2015-02-16T23:42:35+5:302015-02-16T23:42:35+5:30

रावसाहेब रामचन्द्र उपाख्य आर.आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सत्शील व सात्त्विक वृत्तीचे आणि सरळसाध्या मनाचे नेतृत्व हरपले आहे.

The society was sad ... | समाजमनच खिन्न झाले...

समाजमनच खिन्न झाले...

रावसाहेब रामचन्द्र उपाख्य आर.आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सत्शील व सात्त्विक वृत्तीचे आणि सरळसाध्या मनाचे नेतृत्व हरपले आहे. १९८९ मध्ये सांगली जिल्हा परिषदेचे सभासद असताना त्यांच्यात जेवढे साधेपण होते तेवढेच १९९० पासून आतापर्यंत ते आमदार व मंत्री असतानाही त्यांना टिकविता आले आणि दीर्घकाळ राजकारणात राहूनही एखाद्याला अहंकारापासून कसे दूर राहता येते याचा आदर्शच त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून राजकारणासमोर ठेवला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन जी माणसे आपले आयुष्य घडवितात त्यांच्याच वृत्तीत असे साधेपण कायमचे टिकत असते. तासगाव तालुक्यातील त्यांचे राहते घर व त्यातील त्यांची राहणी ज्यांनी पाहिली त्यांना त्यांच्या आयुष्यातली व व्यक्तिमत्त्वातली ‘गरिबी’ही पाहता आली आहे. आपली ही गरिबी त्यांनी आपल्या सांस्कृतिक वैभवाने दूर केली आणि साऱ्या महाराष्ट्रात एक आदर्श नेता व प्रभावी वक्ता अशी आपली प्रतिमा कायम केली. गांधी ही आबांची पहिली श्रद्धा होती. यशवंतराव व शरदराव यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करण्यात त्यांची हयात गेली. ते दीर्घकाळ राज्याचे गृहमंत्री होते. काही काळ ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही राहिले. मात्र एवढे दिवस सत्तेत राहिल्यानंतरही त्यांची प्रतिमा स्वच्छ व बिनडाग राहिली. त्यांना चिकटू शकेल असा कोणताही आरोप त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्यावर करता आला नाही. आबा हे शांत वृत्तीचे राजकारणी होते. मात्र त्या वृत्तीत एक विलक्षण धाडस दडले होते. गृहमंत्री असताना त्यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडे घेतले आणि ते नावासाठी राखले नाही. दर महिन्याला ते त्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर राहत. त्या जिल्ह्यातील नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारांतील विविध खात्यांना हलवून जागे केले आणि तब्बल सात हजारांवर सैनिकांना त्या जिल्ह्यात त्यांनी तैनात केले. गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य माणूस केवळ आबांमुळेच सुरक्षित झाला व आपल्या संरक्षणासाठी सरकार जागे आहे याची जाणीव त्याला झाली. केवळ सुरक्षेवर आबा थांबले नाहीत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचा वर्ग अतिशय मागासलेला व दरिद्री आहे. त्यातील अनेकांनी अद्याप रेल्वेगाडीही पाहिली नाही. आबांनी या समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविण्याचीच नव्हे तर त्यात राहून ज्ञानार्जन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मुले आज पुण्याच्या व मुंबईच्या शाळांमधून कोणताही खर्च न करता शिक्षण घेऊ शकत आहेत. आबांच्या जाण्याने या शेकडो मुलांवरचे पालकाचे छत्र हरवले आहे. दीर्घकाळ मुंबईत राहूनही आबा त्यांचे तासगावी खेडूतपण विसरले नव्हते. शेतकरी माणसांत दिसतो तो सहजसाधा पण विलक्षण निर्णयक्षम स्वभाव त्यांनी आत्मसात केला होता. तो राखत असताना त्यांनी आपले वाचन व अध्ययन वाढवून आपली भाषणे अद्ययावत संदर्भांनी भरली असतील याची काळजी घेतली. परिणामी अनेक जाहीर सभांत उपस्थित असलेल्या वजनदार वक्त्यांच्या तुलनेत आबांचीच भाषणे अधिक प्रभावी व परिणामकारक होत. दिलेली वेळ पाळणे आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेळेआधी उपस्थित राहणे हाही त्यांच्या राहणीमानातला विशेष गुण होता. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत आबांवर एकदाच टीका झाली. मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याची एका मोठ्या शहरात घडलेली साधी घटना अशी त्यांनी संभावना केली तेव्हा सारी वृत्तसृष्टी त्यांच्यावर तुटून पडली. त्यातच त्यांना त्यांच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्या घटनेनंतरही त्यांच्याविषयी समाजमनात व वृत्तसृष्टीत असलेला आदर व आत्मीयता यांना कोणताही तडा गेला नाही. लोक पूर्वीसारखेच त्यांच्याविषयी प्रेमाने व जिव्हाळ्याने बोलत राहिले. मृत्यूसमयी आबांचे वय अवघे ५७ वर्षांचे होते. हे वय जाण्याचे नव्हते. त्यांच्याविषयीच्या समाजाच्या अपेक्षा उंचावत जाण्याचे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवणारे होते. त्यांना जवळून पाहणाऱ्या व त्यांच्या संबंधात असणाऱ्या कोणालाही आबांचा अंतकाळ एवढा जवळ आहे असे कधी वाटले नाही. मात्र एका तंबाखूच्या व्यसनाने त्यांचा बळी घेतला. आबांना तंबाखू आवडायची आणि त्याविषयीची आपली आवड ते दडवूनही ठेवायचे नाहीत. त्यांच्या तंबाखूची वृत्तपत्रात चर्चा झाली आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीही त्याविषयी त्यांना वेळोवेळी सांगून पाहिले. मात्र सगळ्या वडीलधाऱ्यांचा सल्ला नम्रपणे ऐकून घेणाऱ्या आबांना तंबाखूविषयीचा त्यांचा सल्ला मनावर घेणे जमले नाही. परिणामी त्यातूनच त्यांना कर्करोगाचा संसर्ग झाला आणि तो वाढत जाऊन त्याने या उमद्या माणसाचा अल्पवयात बळी घेतला. राजकारणातच नव्हे तर साऱ्या आयुष्यात स्वच्छंदपणे पण प्रामाणिकपणे जगणाऱ्या व जगू इच्छिणाऱ्या साऱ्यांनीच आबांच्या या अकाली निधनातून व्यसनमुक्तीचा धडा घ्यावा असा आहे. तंबाखूवर निर्बंध आणण्यासाठी सरकार करीत असलेली धडपड अपुरी असल्याचेच आबांच्या जिवाची किंमत चुकवून महाराष्ट्राला समजले आहे. आबांचे असे जाणे त्यामुळेच सारे समाजमन खिन्न करणारे ठरले आहे.

सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)

 

Web Title: The society was sad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.