सत्याची व विवेकाची कास न धरता सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:11 IST2017-11-21T00:11:31+5:302017-11-21T00:11:37+5:30
सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते.

सत्याची व विवेकाची कास न धरता सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच
ज्या समाजातील लोक आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सत्याची व विवेकाची कास न धरता आपण आधुनिक विचारांचे आणि विज्ञानवादी असल्याचा आव आणतात; परंतु प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते. वैचारिकदृष्ट्या तसेच समाजसुधारणेच्या बाबतीत सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते. यासाठी समाजसुधारकांच्या अनेक पिढ्याही खर्ची पडल्याचे दाखले इतिहासात नमूद आहेत. असे असतानाही या समाजातील काही घटक आजही शेकडो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेतच गुरफटून राहताना दिसणार असेल तर समाजधुरीणींचे प्रयत्न निष्फळ ठरले की लोकांची ओंजळ थिटी पडली, असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहू नये.
महाराष्ट्राची भूमी तशी साधुसंतांच्या वास्तव्याने संपन्न झालेली आहे. या प्रदेशाला पुरातन रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, अंधश्रद्धेला कायमस्वरूपी मूठमाती देण्यासाठी अनेक सुधारकांनी आयुष्य वेचले. राष्टÑ, राज्य सुसंस्कृत व्हावे, वैचारिक संपन्नता वाढीस लागावी आणि मानवजात गुण्यागोविंदाने नांदावी, हाच त्यांचा निर्मळ उद्देश त्यामागे होता. हा उद्देश अपवाद वगळता सर्वांच्याच मनात झिरपू न शकल्यानेच आजही बहुतांशी वर्गजादूटोणा, करणी, मूठ मारणे, चेटकीण असणे अशा भ्रामक कल्पनांना चिटकून बसलेला दिसून येतो. त्यात खतपाणी घालण्याचे काम संशयी वृत्तीने केले आहे. वास्तविक संशय ही एक पीडाच असून, यापायी अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका वृद्धाने केलेली आत्महत्यादेखील याच प्रकारात मोडणारी आहे. धामणकुंड गावातील मोलमजुरी करून गुजराण करणाºया पांडू धर्मा चौधरी या ७७ वर्षीय इसमावर भुताटकीचे देव असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गावातील माणसे व जनावरांचे अकाली मृत्यू होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गावकºयांकडून होणाºया या मानसिक जाचाला वैतागून गाव सोडून निघून गेलेल्या त्या वृद्धाला गावदेवाच्या पूजेच्या निमित्ताने गावात पुन्हा बोलावले गेले असता संयोगाने त्याच दिवशी गावातील एक रेडा मृत्युमुखी पडला. त्याचेही खापर या वृद्धावर फोडण्यात आल्याने त्याने अखेर आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. एकीकडे महाराष्टÑ विचारांनी आणि संस्कारांनी प्रगत होत असल्याच्या हाकाट्या पिटल्या जात असताना दुसरीकडे त्याउलट घटना जर घडत राहणार असतील तर या वृद्धाचा मृत्यू हा अप्रागतिक विचारांचाच बळी म्हणावा लागेल. २०१३ मध्ये राज्य शासनाने जादूटोणाविरोधी विधेयक संमत करूनही हे प्रकार थांबू शकलेले नाहीत. याचा अर्थ या विधेयकाच्या कठोर अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या की हा कायदा अद्याप लोकांपर्यंत पोहचलाच नाही, अशी शंका यावी.
जादूटोण्याच्या संशयामुळे केवळ या चौधरी नामक वृद्धालाच त्रास झाला असे नव्हे, अशा घटना महाराष्टÑात अनेक ठिकाणी घडल्या असून, आजही ती शृंखला कायम आहे. कोठे भुतीण असल्याच्या संशयावरून महिलांना विवस्र करून मारहाण करण्यात आली आहे, तर कोणावर झाडाला बांधून अमानुषपणे अत्याचार करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या घटना म्हणजे पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाºया राज्यासाठी शोभादायी म्हणता येऊ नयेत.