समाजाला फारसे देणे-घेणे नाही...
By Admin | Updated: September 6, 2015 04:41 IST2015-09-06T04:41:17+5:302015-09-06T04:41:17+5:30
‘खून झाला हे वाईट झालं.. विचारांसाठी एकाद्या माणसाला मारणं बरोबर नाही.. मारेकरी पकडले गेले पाहिजेत.. अनेक खून होतात त्यापैकी हे खून.. समाजामध्ये असंख्य घटना घडत आहेत

समाजाला फारसे देणे-घेणे नाही...
- निळू दामले
‘खून झाला हे वाईट झालं.. विचारांसाठी एकाद्या माणसाला मारणं बरोबर नाही.. मारेकरी पकडले गेले पाहिजेत.. अनेक खून होतात त्यापैकी हे खून.. समाजामध्ये असंख्य घटना घडत आहेत त्यापैकीच ही एक घटना आहे... इ.इ.’ असं एकूण जनमत आहे. एकुणात समाजाला फारशी पडलेली नाही. तीव्र आणि चिंतन करायला लावणाऱ्या प्रतिक्रि या जरूर उमटल्या; पण त्या अगदीच कमी लोकांकडून.
खून आखून, बेतून, ठरवून झालेले आहेत. दाभोलकरांच्या खुनाला तर आता दोन वर्षे होतील. मारेकरी सापडत नाहीयेत. सभा झाल्या. मोर्चे झाले. निदर्शनं झाली. निवेदनं दिली गेली. भाषणं झाली. वर्तमानपत्रांतून लेख आणि पत्रं प्रसिद्ध झाली. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर काही गोष्टी उमजतात.
समाजाच्या तळात आणि मुळात काही घडत आहे असं लोकांना वाटत नाहीये.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे तिघंही पुरोगामी. डावे. त्यांनी धर्म आणि धर्मव्यवहार यांना तर्काच्या कसोट्या लावल्या. श्रद्धा आणि परंपरा काळाच्या संदर्भात वेळोवेळी तपासून पाहाव्या असं ते म्हणत. त्यांना जुन्या श्रद्धा आणि परंपरा नकोशा होत्या, नव्या श्रद्धा आणि परंपरा स्थापित करायच्या होत्या. लोकशाही, सेक्युलर व्यवहार, सर्व माणसं समान असतात ही मूल्यं नव्या परंपरांमधे स्थापित करण्याचा तिघांचाही प्रयत्न होता.
ही तिन्ही मूल्यं कमी-अधिक तीव्रतेनं अमान्य असणारी माणसं आणि संघटना भारतात आहेत. पूर्वीपासून. ही मूल्यं समाजात रूढ होण्याआधीच राजकीय स्वातंत्र्याची चळवळ प्रबळ झाली, निवडणुकीच्या राजकारणानं समाज व्यापला. राजकारणातली माणसं वरील मूल्यांच्या गोष्टी कधीकधी करतात; पण त्यांच्या एकूण उद्योगांमधे ही मूल्यं ठाशीवपणे मांडली जात नाहीत, त्यांच्यावर भर दिला जात नाही. वरील तीन माणसं मात्र इतर गोष्टी न करता सर्व वेळ ही मूल्यं समाजासमोर ठेवत होती.
दाभोलकरांची एक संघटना होती, पानसरे राजकीय पक्षात होते आणि कलबुर्गी संशोधक प्राध्यापक होते. तिघांच्याही प्रतिमा वरील मूल्यांचा आग्रह धरणारे अशी होती.
भारतीय माणसांना परंपरा आणि श्रद्धांना हात लावलेलं आवडत नाही. फुले, आंबेडकर, आगरकर, रानडे यांनी परंपरा आणि श्रद्धांमधे बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागला. तो १९व्या आणि २०व्या शतकातला काळ होता. नाकं मुरडत, कटकट करत का होईना पण माणसं समाजात बदल करू पाहणाऱ्या सुधारकांचं ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत होती. त्यामुळं समाजानं रानडे-फुले-आंबेडकरांचं ऐकून घेतलं आणि काही बदल स्वीकारले. २१व्या शतकाच्या सुरुवातीला स्थिती बदललीय.
आर्थिक प्रश्न बिकट होत आहेत. विषमता वाढीला लागलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ समाजाची वाईट स्थिती दर्शवत आहेत. राजकीय स्वातंत्र्य मिळूनही सुखी जीवन का मिळत नाहीये याची उत्तरं सामान्य माणसांना मिळत नाहीयेत. राजकीय आणि आर्थिक विचारधारा उत्तरं देऊ शकत नाहीयेत. माणसं सैरभैर आहेत, घायकुतीला आली आहेत. जगणंच कठीण झाल्यावर सामाजिक मूल्य इत्यादींचा विचार करायला माणसं तयार होत नाहीत. सेक्युलर, समानता, लोकशाही इत्यादी विचार म्हणजे चैन आहे असं माणसांना वाटत असावं. त्यामुळंच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनात काही गंभीर घडलंय असं बहुतेकांना वाटत नाहीये.
गांभीर्य वाटेनासे झालेय..
सेक्युलर, समानता, लोकशाही इत्यादी विचार म्हणजे चैन आहे असं माणसांना वाटत असावं. त्यामुळंच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनात काही गंभीर घडलंय असं बहुतेकांना वाटत नाहीये.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)