मतासाठीचा एकच प्याला

By Admin | Updated: February 15, 2017 23:40 IST2017-02-15T23:40:57+5:302017-02-15T23:40:57+5:30

अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीने सहा बळी घेतले. हे बळी म्हणायला विषारी दारूचे आहेत. पण ते खरे निवडणूक व्यवस्थेचेच बळी

Single cup of votes | मतासाठीचा एकच प्याला

मतासाठीचा एकच प्याला

अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीने सहा बळी घेतले. हे बळी म्हणायला विषारी दारूचे आहेत. पण ते खरे निवडणूक व्यवस्थेचेच बळी आहेत. निवडणुकीत आपणाला मदत व्हावी म्हणून शिवसेनेच्या एका उमेदवाराने मद्याची पार्टी आयोजित केली होती. त्यात दारू प्यायल्याने अनेकांना त्रास सुरू झाला. त्यातून हे बळी गेले व आणखी काहीजण अत्यवस्थ आहेत.
मयत सर्वजण मोलमजुरी करणारे होते. एका मतासाठी अन् त्यापोटी मिळणाऱ्या बाटलीसाठी ते जिवाला मुकले. मतही गेले अन् जीवही. नेहमीप्रमाणे घटना घडून गेल्यानंतर प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. ही दारू बनावट होती का? ती आली कोठून? याचा शोध सुरू आहे. घटनेचे धागेदोरे शोधले जातील; पण या धाग्यादोऱ्यांचे पुढे करायचे काय? गोधडी शिवून त्यावर झोपायचे?
कुठल्याही घटनेनंतर जे राजकारण सुरू होते ते याही घटनेत सुरूझाले आहे. गुन्हा दाखल होताच शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘दारू आम्ही नव्हे, भाजपाने पाजली’, असा खुलासा केला. दोन्ही कॉँग्रेस तर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांपैकी कुणीही या घटनेबाबत भाष्य केलेले नाही. ते घटनास्थळीही गेलेले नाहीत.
दारूबद्दल बोलायचे काय? हा सर्वच पक्षांसमोर प्रश्न दिसतो. नगर जिल्ह्यात काही साखर कारखाने अधिकृतपणे दारूचे उत्पादनच घेतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यात होते. दारू ही आता निवडणुकांची बहुधा भांडवली गुंतवणूक मानली जाऊ लागली आहे.
मध्यंतरी नगर जिल्ह्यात दारूबंदीची मोठी लढाई झाली. अण्णा हजारे स्वत: या लढ्यात उतरले. पण जिल्ह्यातील एकही नेता अण्णांसोबत नव्हता. त्यामुळे दारू सेनेने पाजली की भाजपाने? हा मुद्दाच गैरलागू ठरतो. बहुतेक पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांसाठी दारूचे पेग भरलेले आहेत. इतरांच्या दारूने लोक अजून बळी पडलेले नाहीत म्हणून ते पक्ष व उमेदवार सुरक्षित आहेत एवढाच काय तो फरक आहे. अर्थात काही उमेदवार व पक्ष अपवाद आहेत. सब घोडे बारा टक्के करून चालणार नाही. मात्र ते अपवादच.
या घटनेनंतर दारूबंदी आंदोलन समितीचे हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयुक्तांना एक पत्र पाठविले. दारू पिणाऱ्या मतदाराला मतदान करण्यापासून रोखण्याचा कायदा आयोगाने करावा, ही महत्त्वाची मागणी त्यांनी केली आहे. दारू प्यायलेला माणूस आपला विवेक गमावून बसतो. त्यामुळे तो विवेकाने मताचा अधिकारच वापरू शकत नाही, हा मूलभूत मुद्दा त्यांनी मांडला आहे. दारूबंदी चळवळीच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनीही यापूर्वी ही मागणी नोंदवली आहे. सार्वजनिक उत्सवात मद्यपी माणसे ओळखण्यासाठी ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ हे मशीन वापरले जाते. निवडणुकीच्या काळात असे मशीन्स कोठे जातात? हा प्रश्न आहे. मतांच्या आमिषासाठी उमेदवाराने दारू पाजली असे सिद्ध झाल्यास त्याची उमेदवारी तत्काळ रद्द करावी व संबंधित पक्षाला नोटीस काढावी, अशीही दारूबंदी आंदोलनाची मागणी आहे.
निवडणुकांतील अवैध बाबी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती आहे. मात्र, ही समिती काय करते? नगरच्या घटनेतील दारू एका वाइन शॉपमधून नेण्यात आली होती. वाइन शॉपमधून नेमके कोण मद्य नेते? त्याच्याकडे परवाना असतो का? बनावट दारू कोठून येते? याची तपासणी उत्पादन शुल्क विभाग करतो का ? असे प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत. नगरच्या घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी गावातून पुढे आली आहे. मागणी माणुसकीच्या दृष्टीने रास्त आहे. मात्र, मतासाठी दारू पिणे हा लोकशाहीशी द्रोह आहे. पाजणारा व पिणारे दोघेही दोषी आहेत. दारूच नव्हे, मतासाठी पैसे व इतर आमिषेही असतात. ते बळी दिसत नाहीत.
- सुधीर लंके

Web Title: Single cup of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.