भटक्या कुत्र्यांना घरीच खायला घालायचे की रस्त्यावर?

By संदीप प्रधान | Updated: July 19, 2025 08:17 IST2025-07-19T08:15:25+5:302025-07-19T08:17:02+5:30

‘पराकोटीचे प्रेम’ व ‘टोकाचा विरोध’ हाच मानवी स्वभावाचा स्थायीभाव होऊ लागल्याने माणूस आणि भटक्या कुत्र्यांमधला जुना संघर्ष तीव्र होत चालला आहे.

Should you feed stray dogs at home or on the street? | भटक्या कुत्र्यांना घरीच खायला घालायचे की रस्त्यावर?

भटक्या कुत्र्यांना घरीच खायला घालायचे की रस्त्यावर?

- संदीप प्रधान,

सहयोगी संपादक, लोकमत, ठाणे

तुम्ही एकतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक असू शकता किंवा कट्टर विरोधक, अशा ध्रुवीकरण झालेल्या आजच्या जगात तुम्ही एकतर श्वानप्रेमी असू शकता किंवा श्वानद्वेषी. सोशल मीडियावरील रिल्समध्ये कुत्रे, मांजरी यांचे मुके घेणारे दिसतात तसे त्यांच्याशी क्रूर वर्तन करणारे दिसतात ते त्यामुळेच. नोएडातील एक श्वानप्रेमीने काही लोकांच्या विरोधामुळे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालू शकत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याची चांगलीच हजेरी घेतली. ‘तुम्ही भटक्या कुत्र्यांना स्वत:च्या घरात का खाऊ घालत नाही?’ असा सवाल न्यायमूर्तींनी केला. ‘या कामाकरिता आपण प्रत्येक गल्ली, रस्ता खुला ठेवायचा का? या प्राण्यांसाठी सर्वत्र जागा आहे. मात्र माणसांकरिता नाही. तुम्ही त्यांना स्वत:च्या घरात खाऊ घाला. सायकल अथवा मोटारसायकलवरून सकाळीच प्रवास करून बघा म्हणजे कुत्रे कसे मागे लागतात ते कळेल’, अशा शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्याला फैलावर घेतले. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान केलेली टिप्पणी म्हणजे अंतिम निकाल नव्हे. त्यामुळे जेव्हा या याचिकेवर न्यायालय अंतिम निकाल देईल तेव्हा निकालपत्रात कोणती भूमिका घेते, याकडे आता श्वानप्रेमींचे लक्ष लागले आहे. 

भटके कुत्रे ही जवळपास सर्वच लहान-मोठ्या शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही पोहोचलेली समस्या आहे. दिवसभर आडोशाला पेंगत असलेली कुत्र्यांची टोळकी रात्री ताजीतवानी होऊन समुहाने दहशत निर्माण करतात हे कुणीही नाकारू शकत नाही. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचा पाठलाग करणारी कुत्र्यांची झुंड हे सर्वच शहरांतले चित्र आहे. अर्थात बरेचदा मोटारी किंवा अगदी दुचाकीवरून प्रवास करणारे काही धटिंगण या कुत्र्यांच्या अंगावर वाहने मुद्दाम घालतात व त्यांची माथी भडकवतात, हेही खरे. मग कुत्रेही दिसेल त्या वाहनांचा  पाठलाग करतात.  कुत्र्यांची झुंड अंगावर आली म्हणून  बावचळलेल्या दुचाकीस्वारांचे अपघात नेहमीचे झाले आहेत. 

अनेक प्राणीप्रेमी नागरिक या मुक्या प्राण्यांसाठी कळवळतात. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे ‘प्राणीजन्म नियंत्रण नियम २०२३’च्या नियम २० नुसार कायदेशीर आहे. प्राण्यांना खाऊ घालण्याकरिता रहिवासी कल्याण संघटना, अपार्टमेंट मालक संघटना किंवा नगरसेवक यांनी स्वतंत्र व्यवस्था करणे मात्र आवश्यक आहे. हा नियम कुणीही पाळत नाही. रस्त्यावर कुत्रे दिसतील तिथे त्यांना  बिस्किटांपासून भात-चपात्यांपर्यंत वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात. कुत्र्यांनी खाऊनही ते उरले की, रस्त्यावर कचरा साचतो. गल्लीबोळात उंदीर, घुशी फोफावतात. काही श्वानप्रेमी नियमित अन्न देतात. मात्र, एखाद्या दिवशी अन्नदान जमले नाही, तर मग त्या भागातले अन्नाच्या शोधातले कुत्रे रस्त्यातून पिशव्या घेऊन जाणाऱ्यांच्या मागे लागतात. अनेकदा त्यातून श्वानदंशाच्या घटना घडतात. दुकानातून खाद्यपदार्थ घेऊन घरी चाललेल्या लहान मुलांच्या मागे लागून कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ले चढवल्याचे व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाणही हल्ली वाढले आहे.

मुक्या प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगली पाहिजे, यावर विश्वास असणारी शहाणीसुरती माणसेदेखील या अशा घटनांमुळे भटक्या कुत्र्यांचे शत्रू होतात. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना कुठे, किती, कोणते खाद्य द्यायचे याचे नियमन महापालिका, नगरपालिकांनी करणे गरजेचे आहे. मात्र, ज्या महापालिका त्यांच्या हद्दीत बहुमजली टॉवर बेकायदा उभे राहताना डोळ्यावर कातडे ओढून बसतात, त्यांना भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या आणि  त्यांना रस्त्यावरच खायला घालण्याच्या नागरी हट्टामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण या विषयात रस कुठे असणार? 
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबाबतही महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमालीची बेफिकिरी आहे. निर्बिजीकरणाचे कागदावरील अहवाल व वास्तव यात तफावत असते. अनेक शहरांत निर्बिजीकरण बंद असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे. मुंबईतील कबुतरखाने व त्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य हा विषय अलीकडेच विधान परिषदेत गाजला. कबुतरखाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले. लागलीच पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. कबुतरांना खाणे देण्यावरील निर्बंध न्यायालयाने लागलीच उठवले नाही. आता याबाबत दोन्ही बाजू ऐकून निवाडा केला जाईल. माणूस आणि प्राणी, पक्षी यांनी परस्परांना सांभाळून घेतले तरच समतोल राखला जाईल. मात्र, पराकोटीचे प्रेम व टोकाचा विरोध हाच मानवी स्वभावाचा स्थायीभाव होऊ लागल्याने माणूस आणि भटक्या कुत्र्यांमधला हा जुना संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.
    sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: Should you feed stray dogs at home or on the street?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा