शिवसेनेतील साठमारी

By Admin | Updated: April 27, 2016 05:22 IST2016-04-27T05:22:10+5:302016-04-27T05:22:10+5:30

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय.

Shivsena Storm | शिवसेनेतील साठमारी

शिवसेनेतील साठमारी

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय. विसर पडलेल्या राडा संस्कृतीची भाषा अलीकडे लोप पावत चालली होती; पण औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे महानगरपालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांना ही धमकी देणे म्हणजे गजबच. त्यावर जंजाळही त्याच संस्कृतीचे. त्यांनी दुसऱ्या दिवशी उघड्या जीपमध्ये बसून खैरेंचे घर गाठले आणि असेल हिंमत तर तोडा तंगडी, असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. खैरे घरी नव्हते, नाही तर पुन्हा राडा झाला असता. तीन वर्षांपूर्वी याच खैरेंनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना मारहाण केली होती. याची आठवण अजून ताजी आहे. त्यावेळी दानवे हे जायकवाडीच्या पाण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरातांना अडवायला निघाले होते आणि ते खैरेंना मंजूर नव्हते. हा झाला इतिहास.
खैरेंनी जंजाळांना धमकी द्यावी आणि जंजाळांनी त्यांना प्रति आव्हान द्यावे हा मराठवाड्यातील त्यापेक्षा औरंगाबादच्या शिवसेनेतील दोन फळ्यांमध्ये असलेला सत्तासंघर्ष हेच कारण आहे. गेले पावशतक हे सेनेचे औरंगाबादेतील सर्वेसर्वा म्हणून वावरतात. या पंचवीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि सेनेत अंतर्गत संघर्ष नव्हता, असेही म्हणता येणार नाही. शिवसेना आणून ती रुजवण्यासाठी राबणारे सुभाष पाटील १९९२मध्ये बाहेर पडले त्यावेळीही वादळ उठले होते. शिवसेनेसाठी हा धक्का होता. पुढे अशोक चोटलानींचे तिकीट कापून खैरेंनी विधानसभेची उमेदवारी मिळविली. त्यावेळी राडा होणार, अशी परिस्थिती होती. वादळ उठले होते; पण तेव्हा सेना जोमात आणि सैनिक जोशात होते. ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,’ अशी सर्वांची धारणा होती. पुढे परशुराम वाखुरे, राधाकृष्ण गायकवाड, रमेश आमराव हे बिनीचे शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याचे तरंग उमटले; पण ही हाडाची कार्यकर्ते मंडळी एकापाठोपाठ का बाहेर पडली याचा गांभीर्याने विचार सेनेतील ज्येष्ठांनी केला नाही. कारण तोपर्यंत खैरेंचे मातोश्रीवर चांगले ट्युनिंग झाले होते.
१९९५ ते ९९ हा सेनेचा औरंगाबादेतील सुवर्णकाळ आणि प्रथमच सत्तेवर आलेल्या युतीचाही. यानंतर नव्या शतकात सेनेत नव्या फळीचा उदय झाला. आता ही नवी फळी तरुण झाली; पण त्यांना कर्तृत्व दाखविण्यासाठी अवकाशच नाही. येथे घुसमटीला प्रारंभ झाला आणि सत्तेसाठी शह-काटशहाचे राजकारणही जोरावर आले. विशेष म्हणजे या पाव शतकात सेनेत मराठा नेतृत्व पणपले नाही. नामदेव पवार, अण्णासाहेब माने, संदीपान भुमरे पुढे आले; पण तालुक्यापुरतेच ठरले. यापैकी कोणी सेनेचा चेहरा बनू शकले नाही आणि सर्व सूत्रे मछलीखडकातूनच हलत राहिली. गेल्या वर्षभरापासून ही अंतर्गत धुसफूस जाहीर व्हायला लागली. धाक संपला. पालकमंत्री रामदास कदमांनी खैरेंविरुद्ध उघड भूमिका घेत त्यांची महानगरपालिकेत कोंडी केली आणि तरुण फळी सक्रिय झाली. त्याचीही कारणे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेने मार खाल्ला. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे संख्याबळ घटले. ही तर सेनेची एका अर्थाने नामुष्कीच होती आणि परवा झालेल्या सातारा-देवळाईच्या निवडणुकीत सेनेला एकही जागा मिळाली नाही. राजकारण आणि अर्थकारणातील हितसंबंधांना अडसर निर्माण झाला की, संघर्ष अटळ असतो आणि औरंगाबादच्या शिवसेनेत नेमके हेच घडत आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘समांतर’ कंपनीच्या कामात अडथळे आणण्याचे धोरण खैरे विरोधकांनी ठरविले. कारण खैरेंचा प्राण ‘समांतर’मध्येच आहे. त्याद्वारे त्यांच्या शक्तिस्थानावर विरोधक हल्ले करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांचा असंतोष आणि धुसफुशीचे रूपांतर आता उघडपणे सत्तेच्या साठमारीत झालेले दिसते. सेनेत राडा होणार नाही; पण कदमांनी बळ दिल्याने साध्या प्याद्यांनासुद्धा हत्तीचे बळ आले आहे. रंगात आलेला खेळ पूर्ण होतो की ‘मातोश्री’वरून पट उधळला जातो, हेच पाहायचे.
- सुधीर महाजन

Web Title: Shivsena Storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.