चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:44 PM2020-08-05T12:44:44+5:302020-08-05T12:47:41+5:30

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. ...

Shining sparked the agitation | चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

Next
लिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. स्वातंत्र्यचळवळीत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आपल्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविषयी आवाज उठविणे, प्रतिकार करण्याचे आंदोलन हे माध्यम आहे. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, नेल्सन मंडेला यांनी या आयुधाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. आंदोलनांचे देखील प्रकार आहेत. गांधीजींनी त्या आयुधाचा समर्पकपणे वापर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा आंदोलनातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुध्दचा रोष जसा प्रकट केला तशीच अन्याय, अत्याचाराविषयी जनभावना तयार होईल, हेदेखील आवर्जून बघितले. आंदोलन हिंसक होऊ लागले तर गांधीजींनी ते मागेदेखील घेतल्याची उदाहरणे आहेत. वृक्षांना वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो की, अलीकडे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द केलेले आंदोलन असो, त्यात जनसहभाग महत्त्वाचा ठरला. आंदोलनाचे कारण हे खूप महत्त्वाचे असते. गांधीजींनी स्वातंत्र्यचळवळीविषयी जागृती निर्माण करीत असताना विदेशी कपड्यांची होळी, मिठाचे आंदोलन असे मुद्दे घेऊन जनतेच्या मनात स्फुल्लींग पेटविले. नेल्सन मंडेला यांनी वांशिक विद्वेषाविरुध्द आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेविरुध्द आंदोलन करताना चवदार तळे, काळाराम मंदिराच्या प्रसंगात जनसामान्यांमधील असंतोष, अन्यायाच्या भावनेचे प्रकटीकरण केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सानेगुरुजींनी आंदोलन केले. आंदोलनाचे विषय संवेदनशील, जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचे असले तर त्याला जनसमर्थन मिळाल्याशिवाय राहत नाही. आंदोलनाची नेमकी वेळ, काळ निवडणे जसे महत्त्वाचे असते तसे ते थांबविणे, मागे घेण्याची वेळदेखील महत्त्वाची असते. वेगवेगळे विषय घेऊन सरकारला धारेवर धरणाºया अण्णा हजारे यांच्या धरसोडीच्या भूमिकेवर टीका झाली होती. टोल नाक्याविरोधात आंदोलन अर्धवट सोडल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर झाली होती. त्यामुळे आंदोलनाची अखेरदेखील महत्त्वाची असते. स्वातंत्र्योत्तर काळात संघटनकौशल्य असलेल्या संघटना, पक्षांनी केलेली आंदोलने गाजली. महाराष्टÑाचा विचार केला तर मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आंदोलनामुळे विस्थापित आदिवासींना घरे, जमिनी मिळाल्या. सरदार सरोवर धरण रोखले गेले नाही, पण आदिवासींसाठी त्या अद्याप झगडत आहेत. शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरले. कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष या सारख्या संघटनावर भर देणाºया पक्षांमध्ये आंदोलनाचे सातत्य आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. देशव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्हाठिकाणी होणारच, भले चार कार्यकर्ते का असेना, पण आंदोलन होणारच. अलिकडे मात्र आंदोलनांमध्ये चमकोगिरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विषय बाजूला पडून नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा प्रभावी ठरत आहे. त्यातून आंदोलनाविषयी तारतम्याचे भान राहत नाही. भाजपचे अलिकडचे दूधविषयक आंदोलन टीकेचा विषय ठरले. दूध व दुधाची भुकटी याला सरकारने अनुदान द्यावे, यामागणीसाठी हे आंदोलन होते. नंदुरबारात एकही शासकीय डेअरी नाही. त्यामुळे तेथे सरकारकडून दूध विकत घेण्याचा आणि मागणीप्रमाणे अनुदानाचा विषय उद्भवत नाही. तरीही तेथे आंदोलन झाले. जळगावात जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी जिल्हा दूध संघासमोर आंदोलन केले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असलेल्या या संघाचे संचालकपद भोळे यांच्याकडे आहे. मागणी सरकारशी संबंधित असताना दूध संघासमोर आंदोलनाचे प्रयोजन कळले नाही. माध्यमात आंदोलनस्थळ चर्चेचा विषय ठरले. कळसाध्याय ठरला तो चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याने दूध आंदोलन मागे पडून चव्हाणांविरोधात प्रतिआंदोलन सुरु झाले. मोबाईल, कॅमेरा समोर असल्यावर भल्याभल्यांची जीभ, वर्तन घसरताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. अशा वर्तनाने ते टीकेचे धनी ठरले आहेत. एवढे भान बाळगले तरी आंदोलनाचा मूळ हेतू साधला जाईल.

Web Title: Shining sparked the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव