मिंडी रासमुसेन ही अमेरिकन महिला आणि तिची कहाणी सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड व्हायरल आहे. ४७ वर्षीय मिंडी अमेरिकेच्या इलिनॉइस येथे राहते. नेहमीप्रमाणे तिचं आयुष्य सुरळीत चालू होतं. आपल्या परिवारात ती मग्न होती; पण अचानक एकदा पाकिस्तानच्या साजीद झेब खान या ३१ वर्षीय तरुणाशी तिची फेसबुकवर ओळख झाली. पाकिस्तानातील अप्पर दिर जिल्ह्यातील तो रहिवासी. सर्वसामान्य. आपल्या आई-वडिलांसह तो तिथे राहतो.
फेसबुकवरची ही ओळख हळूहळू वाढत गेली. फेसबुकवर ते एकमेकांशी चॅटिंग करू लागले. ओळख आणखी वाढली, मग ते एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलू लागले. परिचय आणखी वाढला. एकमेकांच्या खासगी गोष्टीही ते एक-दुसऱ्याशी शेअर करू लागले आणि एक दिवस मिंडीनं अचानक साजिदला लग्नासाठी थेट प्रपोजच केलं... साजीदही मनोमन तिच्या प्रेमात होताच; पण या संदर्भात तिच्याशी कसं बोलावं, विचारलं, तर तिला काय वाटेल, अशा संभ्रमात तो होता; पण आता तिनंच प्रपोज केल्यावर त्याचाही प्रश्न मिटला. तो तर तयारच होता!
मिंडी एवढ्यावरच थांबली नाही, ९० दिवसांच्या व्हिसावर ती थेट पाकिस्तानातच पोहोचली. पाकिस्तानात पोहोचल्यावर तिथे आपल्याला काय वागणूक मिळेल, याविषयी ती थोडी साशंक होती; कारण याआधी अशाच काही घटनांमध्ये पाकच्या तरुणांनी हात वर केले होते आणि परदेशातून आलेल्या आपल्या प्रेमिकांना ‘तू कोण आणि मी कोण?’ अशी वागणूक दिली होती!
यावेळी मिंडीचा अनुभव मात्र वेगळा होता. नेटकऱ्यांनाही याचं आश्चर्यच वाटलं; कारण मिंडी इस्लामाबाद विमानतळावर पोहोचली तेव्हा साजिद तिच्या स्वागतासाठी स्वत: तिथे हजर होता. त्यानं फुलं उधळून तिचं स्वागत केलं. नंतर तो तिला आपल्या गावी घेऊन गेला. तिथे गावकऱ्यांनीही ‘अनपेक्षितपणे’ त्यांचं स्वागत केलं. मिंडीवर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला. त्याहीपुढचं आश्चर्य म्हणजे साजिदच्या घरी गेल्यावर साजिदच्या घरच्यांनीही तिचं आनंदानं स्वागत केलं...!
आश्चर्याची ही मालिका इथेच थांबत नाही. मिंडीनं चक्क धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला आणि मिंडीची ती ‘झुलेखा’ बनली. पुढच्या गोष्टींना मग वेळ लागला नाही. त्या दोघांचा निकाह झाला. त्यांच्या निकाहला साजिदचे सर्व कुटुंबीय, गावकरी आणि स्थानिक पोलिसही हजर होते. खैबर पख्तुनख्वा येथील अप्पर दिर येथे सध्या ते राहत आहेत. मिंडीची व्हिसाची मुदत संपली की ती परत अमेरिकेत जाईल.
मिंडी सांगते, ‘साजिद माझ्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे; पण आमच्या या लग्नाला माझ्या घरच्यांचाही पाठिंबा होता आणि आहे. साजिदबरोबर लग्नाचा जो निर्णय मी घेतला, तो माझ्या वडिलांना, माझ्या मोठ्या बहिणीला आणि लहान भावालाही माहीत आहे. त्यांनी या लग्नाला पुरेपूर समर्थन दिलं आहे. शिवाय साजिदही खूपच प्रेमळ आणि आदर्श पती आहे.’ पाकिस्तान हा देश अतिशय सुंदर आहे. इथली संस्कृती, इथलं आदरातिथ्य दृष्ट लागावी असं आहे. जगातील सर्व नागरिकांनी या देशाला आवर्जून भेट द्यायला हवी, असंही ती आवर्जून सांगते. साजिद मात्र सावधपणे एवढंच म्हणतो, ‘माझ्याशी लग्न करण्याचा आणि झुलेखा बनण्याचा निर्णय तिचा स्वत:चा आहे. तिच्या निर्णयाचा मी आदर करतो!’