शशी थरूर यांचे त्रिवार अभिनंदन!
By Admin | Updated: July 26, 2015 22:24 IST2015-07-26T22:24:11+5:302015-07-26T22:24:11+5:30
संसदेचे अधिवेशन म्हटले की ते काही ना काही कारणावरून गोंधळ होऊन बंद पडणार, याची आपल्याला आता कित्येक वर्षांची जणू सवयच झाली आहे

शशी थरूर यांचे त्रिवार अभिनंदन!
संसदेचे अधिवेशन म्हटले की ते काही ना काही कारणावरून गोंधळ होऊन बंद पडणार, याची आपल्याला आता कित्येक वर्षांची जणू सवयच झाली आहे. सभागृहाच्या कामकाजात परिणामकारकपणे सहभागी होता यावे यासाठी सर्वजण अगदी जय्यत तयारी करून येतात आणि कामकाज सुरळीतपणे होत नाही तेव्हा त्यांच्या पदरी निराशा येते. खरे तर संसद चालू न देणे हे आपल्या अपरिपक्व राजकारणाचे द्योतक आहे पण गोंधळ घालून सभागृह बंद पाडणाऱ्यांचा तसे करण्यात कसा नाईलाज असतो हे समजण्याएवढे आपण समंजसही आहोत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडाही असाच वाया गेला. पण त्यातही एक सोन्याचा किरण दिसला. दिल्लीपासून अगदी दूर असलेल्या लंडनमध्ये झालेल्या आॅक्सफर्ड युनियनच्या कार्यक्रमात दिलासादायक पक्षीय अभिनिवेश नसलेले वातावरण पाहायला मिळाले व त्याचे पडसाद संपूर्ण जगात उमटले. नेमके याचसाठी शशी थरूर यांचे मला त्रिवार अभिनंदन करावेसे वाटते!
शशी थरूर यांनी त्या कार्यक्रमात भारतातील २०० वर्षांच्या ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचे जे नर्मविनोदी शैलीत पण तरीही कुशाग्र बुद्धिमत्तेने विवेचन केले. राजकीय पातळीवर त्याची दखल घेतली जाण्याआधीच यूट्यूबवर लाखो लोकांनी ते पाहून त्याची खूप वाखाणणीही केली होती. पण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. थरूर यांच्या चतुरस्त्र वक्तृत्वाचे तोंड भरून कौतुक केले तेव्हा खरे सर्व वातावरण भारावले गेले. थरूर यांचे कौतुक करताना मोदी एका कार्यक्रमात म्हणाले, ‘आॅक्सफर्डमधील ही चर्चा महत्त्वाची आहे... त्यात शशीजी सहभागी झाले हे उत्तम झाले.. त्यांनी भारतीय नागरिकांच्या भावनाच भाषणातून व्यक्त केल्या. यानंतर ज्यांनी तो व्हिडीओ पाहिलाही नव्हता त्यांनीही त्यावर बोलायला सुरुवात केली आणि जणू काही विभागलेल्या राजकारणाच्या वातावरणात त्या भाषणाला एखाद्या राष्ट्रीय घटनेचे स्वरूप आले. मोदींचे मौन आणि भाष्य या दोन्हींना मोठा राजकीय अन्वयार्थ असतो हेही विसरून चालणार नाही. मोदींनी केलेल्या थरूर यांच्या या स्तुतीलाही राजकीय संदर्भ आहेत. सरकारचा निषेध करण्याचा एक मार्ग म्हणून संसदेत गोंधळ घालण्यास विरोध केल्याने आणि चर्चेच्या मार्गाने सरकारला उघडे पाडण्याचे मत व्यक्त केल्याने थरूर यांच्यावर काँग्रेस पक्षात टीका झाली तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांची खरडपट्टी काढली, अशाही बातम्या आल्या. याआधी मोदींनी थरूर यांना ‘स्वच्छ भारत मोहिमे’साठी ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर नेमले होते. त्यानंतर ही स्तुती केली. त्यामुळे थिरुवनंतपूरममधून निवडून आलेले थरूर हे काँग्रेसचे खासदार भाजपाशी जवळीक साधण्याच्या तर प्रयत्नांत नाहीत ना, अशीही चर्चा सुरू झाली. पण सच्च्या काँग्रेसवाल्याप्रमाणे थरूर यांनी या दोन्हींचे खंडन केले व आपली विचारसरणी आणि दृष्टिकोन पाहता आपण भाजपात असण्याची कल्पनाही करू शकत नाही, असे स्पष्ट केले. आॅक्सफर्डमधील भाषणाबद्दल सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी अभिनंदन केले, असेही त्यांनी नमूद केले.
सन १७४७ ते १९४७ अशी सलग २०० वर्षे भारतात साम्राज्यवादी ब्रिटनची वसाहतवादी राजवट राहिली. काही जणांच्या मते ब्रिटिशांचे राज्य काही बाबतीत आपल्याला उपकारक ठरले. इंग्रजी भाषा, क्रिकेट हा खेळ, रेल्वे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही ही भारताला ब्रिटिशांकडूनच मिळालेली देण आहे, याकडे ही मंडळी लक्ष वेधतात. पण एक फर्डा वक्ता, लेखक व आंतरराष्ट्रीय राजनैतिक मुत्सद्दी या भूमिकांमधून असलेला दांडगा अनुभव वापरून थरूर यांनी आॅक्सफर्डच्या भाषणात या लोकांचे म्हणणे खुबीने खोडून काढले. थरूर यांच्या भाषणाचा मुख्य गाभा असा होता की, ब्रिटिशांनी केलेल्या वसाहतवादी जुलमासाठी खरे तर भारतीय लोकांनीच आर्थिक पाठबळ दिले. ते म्हणाले, ‘ब्रिटिश सर्वप्रथम भारतात आले तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा २३ टक्के होता. भारतीय भूमीवरून ब्रिटनचा युनियन जॅक अखेरचा खाली उतरविला गेला तेव्हा हा हिस्सा चार टक्क्यांवर घसरला होता. भारतातून केल्या गेलेल्या लुटीच्या जोरावर २०० वर्षे ब्रिटनची भरभराट झाली. खरे तर भारतातील औद्योगिकीकरण लयास नेऊनच ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती शक्य झाली.’ ब्रिटिशांनी भारताला लोकशाही दिली हे म्हणणे खोडून काढताना थरूर म्हणाले, ‘एका देशातील लोकांवर २०० वर्षे जुलूम करायचा, त्यांना गुलाम बनवायचे, प्रसंगी त्यांची हत्त्या करायची आणि वर, काही झाले तरी ते लोकशाहीवादी होते, असे म्हणायचे म्हणजे अतीच झाले.’ तसेच रेल्वेच्या बाबतीत ते म्हणाले की, जगात अनेक देशांनी वसाहतवादी गुलामगिरीत न जाताही रेल्वे आणि रस्ते बांधले आहेत. पण साम्राज्यवाद्यांच्या कृष्णकृत्यांचेही त्यांनी खास शैलीत वाभाडे काढले. यासाठी त्यांनी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता या नेहमी गर्वाने सांगितल्या जाणाऱ्या दर्पोक्तीचाच आधार घेतला. ते म्हणाले, ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नसे तेही बरोबरच आहे कारण काळोखात परमेश्वरही ब्रिटिशांवर विश्वास ठेवायला तयार नसायचा!
ब्रिटिश साम्राज्याने भारताची २०० वर्षे जी लूट केली त्याबद्दल त्यांनी कोणत्या तरी स्वरूपात भरपाई म्हणून भारताला अब्जावधी पौंड द्यायला हवेत, हा विचार याआधीही अनेकांनी मांडला आहे. पण शशी थरूर यांनी याला एक नैतिक अधिष्ठान दिले. ते म्हणाले, ‘ब्रिटनने त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) ठरावीक रक्कम भारताला मदत म्हणून देण्यापेक्षा झाल्या गोष्टीबद्दल मनापासून ‘सॉरी’ म्हणणे अधिक अर्थपूर्ण ठरेल. प्रत्यक्ष रकमेपेक्षा तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यानुसार मागच्या दोनशे वर्षांसाठी ब्रिटनने पुढील दोनशे वर्षे वर्षाला एक पौंड दिला तरी व्यक्तिश: माझे समाधान होईल. यावर्षी नंतर पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे थरूर यांच्या ‘पुढील २०० वर्षे दरवर्षी एक पौंड’ या सैद्धांतिक सूत्राचे पडसाद आणखी बरेच दिवस उमटत राहतील, हे नक्की. मोदी यांनी थरूर यांचे कौतुक केले आहे व त्यांच्या तात्त्विक भूमिकेलाही पाठिंबा दिलेला असल्याने हा विषय सार्वजनिक चर्चेतून जाईल, असे दिसत नाही.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
गोंदिया-भंडाऱ्यात स्थानिक राजकारणाचे पडसाद देशाच्या राजधानीच्या राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. येथे जिल्हा परिषदेची सत्ता टिकविण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने भाजपाशी ज्या प्रकारे हातमिळवणी केली त्याने एकूणच नेतृत्वाच्या हेतूविषयी शंका घेतली जात असल्याने काँग्रेस पक्षात तीव्र अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते स्थानिक काँग्रेसवाल्यांना हवे ते सर्व देऊन बरोबर घ्यायला तयार असूनही भाजपाची मदत घेण्यात आली. स्थानिक पातळीवर सोयीस्कर हातमिळवणी व राष्ट्रीय आणि राज्याच्या पातळीवर जराही जुळवून न घेता टोकाची प्रतिस्पर्धा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होऊ शकत नाहीत. यावरून जाणारे संकेत कोणाच्याच फायद्याचे नाहीत.
विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)