शरीफ यांची शराफत
By Admin | Updated: February 19, 2016 03:05 IST2016-02-19T03:05:04+5:302016-02-19T03:05:04+5:30
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतावर कारगिल युद्ध लादणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून भारताच्या पाठीत खंजीर खुपसणे होते अशी जाहीर कबुली देऊन

शरीफ यांची शराफत
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतावर कारगिल युद्ध लादणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून भारताच्या पाठीत खंजीर खुपसणे होते अशी जाहीर कबुली देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जी शराफत दाखविली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदनच केले पाहिजे. १९९९मध्ये पाकने कारगिल युद्ध लादण्याच्या काहीच दिवस अगोदर वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रेचे आयोजन केले होते व उभय देशांदरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता व त्याचे साऱ्या जगानेही कौतुकच केले होते. त्या काळातही नवाझ शरीफ हेच पाकिस्तानचे निर्वाचित पंतप्रधान होते. लाहोर बसयात्रेमुळे जे सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती तिला कारगिल युद्धाने मोठा छेद दिला. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची जी भावना भारतात पसरली ती योग्य होती आणि वाजपेयी यांच्या जागी आपण असतो तर आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न झाली असती असेदेखील शरीफ यांनी आता म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनीच अतिरेक्यांचा वेष करुन कारगिल या उंचावरील ठाण्यावर कब्जा केला आणि श्रीनगर-लेह महामार्ग संपर्कहीन करण्याचा पाकी लष्कराचा डाव होता असेही शरीफ यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरातील मुझफ्फराबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी संबंधित कबुली दिली याला एक महत्व आहे. अर्थात भारत सरकारने या कबुलीबाबत सावध प्रतिक्रिया देताना अद्याप पाक सरकारकडून प्रस्तुत कबुलीसंबंधी अधिकृतपणे काहीही कळवले गेले नसले तरी शरीफ खरोखरीच तसे बोलले असतील तर ते स्वागतार्हच असल्याचे म्हटले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख होते आणि कारगिल युद्ध सुरु करण्याचा निर्णय त्यांनी पंतप्रधानांना अंधारात ठेऊन घेतला होता, असे खुद्द शरीफ यांनी याआधीच म्हटले होते. परंतु त्यावर भारतात विश्वास ठेवला जाणे कठीणच होते. कारगिल युद्धात मार बसल्यानंतर त्याच वर्षी मुशर्रफ यांनी एका लष्करी उठावात शरीफ यांना सत्ताच्युत करुन पाकिस्तानची सत्ता आपल्या हाती घेतली होती. जोवर ते पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते तोवर तेदेखील भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचीच भाषा करीत होते. त्या काळात त्यांनी भारताचा दौरादेखील केला होता आणि दिल्लीतील स्वत:च्या जन्मस्थळाला भेटदेखील दिली होती. पण वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्या दरम्यानची त्याच दौऱ्यातील आग्रा वार्ता मात्र निष्फळ ठरली होती. पाकिस्तानातील मुशर्रफ यांची लोकप्रियता घसरणीला लागल्यानंतर तिथे सार्वजनिक निवडणुका पार पडून नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर आरुढ झाले. त्यानंतर मात्र मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाच्या बढाया मारायला सुरुवात केली आणि आपण भारताला कसे जेरीस आणले याच्या कथा प्रसृत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘आॅल पाकिस्तान मुस्लीम लीग’ नावाच्या एका राजकीय पक्षाची स्थापनादेखील केली आहे. या पक्षामार्फत बोलताना अलीकडेच त्यांनी वाजपेयी आणि मोदी यांची तुलना करताना वाजपेयी यांची प्रशंसा करताना मोदी यांना अनेक दूषणे प्रदान केली आहेत. पण मग वाजपेयी सच्चे होते तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला याबाबत मात्र ते चकार शब्द बोलायला तयार नाहीत. आता प्रथमच तो उच्चार किंवा तशी कबुली नवाझ शरीफ यांनी दिली आहे. परंतु ती देतानाच कारगिल प्रकरणी तक्रार करायची म्हटले तरी कुठे आणि कोणाकडे असा हतबलता व्यक्त करणारा प्रश्नदेखील त्यांनीच उच्चारुन दाखविला आहे. तरीदेखील शरीफ आता जे बोलत आहेत तो त्यांच्या अंतर्मनाचा आवाज आहे असे गृहीत धरायचे झाले आणि पाकिस्तानी लष्कराच्या कपटीपणाचे त्यांनी केलेले रहस्योद्घाटन प्रामाणिक असल्याचे मान्य करायचे झाले तर पठाणकोटच्या हवाई तळावर अलीकडेच जो अतिरेकी हल्ला केला गेला आणि त्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे भारताच्या हाती लागले त्याबाबत शरीफ नेमके काय करणारा हा प्रश्न विद्यमान परिस्थितीत भारताच्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. त्याबाबत पाकिस्तानकडून किंवा व्यक्तिश: शरीफ यांच्याकडूनही कोणतेही नि:संदिग्ध आश्वासन अथवा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. आजवर त्या राष्ट्रात जितके म्हणून लोकनियुक्त पंतप्रधान होऊन गेले ते कधीही भारताशी ठेवावयाच्या संबंधांबाबत स्वायत्तपणे कोणताही निर्णय वा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करु शकलेले नाहीत. लष्करच तिथे सर्वोसर्वा असल्याची स्थिती आहे. रशियातील उफा येथे जे ठरले व त्याची पुढे जी वासलात लागली तो इतिहास ताजाच आहे. परिणामी नवाझ शरीफ यांनी कबुली देण्याची जी हिंमत आणि शराफत दाखविली आहे तिच्याबाबत किती आशा बाळगायची हा प्रश्नच आहे.