शनिशिंगणापूर ते हाजी अली
By Admin | Updated: February 2, 2016 03:15 IST2016-02-02T03:15:46+5:302016-02-02T03:15:46+5:30
शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी आंदोलन सुरू केले असतानाच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी करीत मुसलमान समाजाच्या स्त्रियाही पुढे आल्या

शनिशिंगणापूर ते हाजी अली
शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी आंदोलन सुरू केले असतानाच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी करीत मुसलमान समाजाच्या स्त्रियाही पुढे आल्या आहेत. एका चांगल्या व पुरोगामी पावलासाठी ही राष्ट्रीय पथावर सुरू झालेली स्वागतार्ह वाटचाल आहे. ती तत्काळ यशस्वी होईल याची चिन्हे अर्थातच कमी आहेत. कोणतेही पुरोगामी पाऊल सहजासहजी पुढे पडणार नाही अशी सनातनी मानसिकता हिंदूंएवढीच अन्य धर्मीयातही आहे. या धर्मांचे मुखंड आपल्या जुन्या व सनातन परंपरांना घट्ट चिकटून असणारे आणि त्या परंपरांसमोर येणारे प्रत्येकच पुरोगामी आव्हान प्राणपणाने थोपवून धरणारे आहेत. अतिशय साधे, शैक्षणिक व सामाजिक अधिकार आपल्या समाजातील स्त्रियांना मिळावे यासाठी हमीद दलवाई यांनी आयुष्यभर दिलेला लढा येथे साऱ्यांना आठवावा. मुळात सारेच धर्म परंपरानिष्ठ व जुन्या रूढींनी बांधलेले असतात. नवऱ्यामागून स्त्रीने सती जाण्याची परंपरा हिंदू धर्मात होती. ती संपविण्यासाठी राजा राममोहन राय यांना केवढे कष्ट घ्यावे लागले याची कहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे. वपनासारख्या क्रूर रूढी मोडायला महाराष्ट्राला किती वर्षे लागली आणि अल्पवयीन मुलींची लग्ने करू नये यासाठी किती सुधारकांना लढे द्यावे लागले याचा इतिहासही साऱ्यांना ठाऊक आहे. दलिताना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून गांधी, आंबेडकर आणि साने गुरुजी यांनी अपार कष्ट घेतले. आताचे शनिशिंगणापूरचे आव्हानही तसेच आहे. मंदिर प्रवेश हा आजच्या काही टीकाकारांना वाटतो तसा सांकेतिक प्रकार नाही. स्त्रियांच्या अधिकारांशी संबंध असणारा तो सैद्धांतिक व प्रगतिशील विचार आहे. शनी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या हिंदूंमधील सनातनपासून किती संघटना उभ्या झाल्या आहेत आणि त्यांनी नाशिकसारख्या शहरात मेळावे भरविण्याचे राजकारण कसे उभे केले आहे ते पाहिले की एका क्षणात सोडविता येणारे सामाजिक प्रश्नही प्रसंगी केवढे बिकट होतात याची कल्पना येते. शनी मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या स्त्रियांबाबत द्वारकापीठाच्या शंकराचार्याने काढलेला एक फतवाही येथे नोंदविण्याजोगा आहे. ‘या स्त्रियांना प्रवेश देण्याऐवजी शिंगणापूरच्या शनीलाच तेथून पळवून द्या’ असा उपदेश त्यांनी आपल्या अनुयायांना केला आहे. अलीकडच्या शंकराचार्यांनी त्यांच्या मूळ श्रीमद् आद्यशंकराचार्यांची कीर्ती व प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचेच काम आताशा चालविले आहे. नेमके तेच काम हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करणारे मुस्लिम धर्मगुरू करीत आहेत. राष्ट्र ही धर्माहून श्रेष्ठ कल्पना आहे आणि माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. त्या दिशेने होणारी वाटचाल रोखणारेच खरे धर्मविरोधी व समाजविरोधी आहेत हे अशावेळी लक्षात घेतले पाहिजे. विद्यापीठात पीएच.डी.चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आत्महत्त्या करतात आणि त्यांना तसे करायला भाग पाडणारेही तेथेच असतात. साध्या वैचारिक मतभेदाचे व संशयाचे पर्यवसान खुनात होते आणि विचार मागे पाडला जातो ही उदाहरणे आपण अलीकडे अनुभवत आहोतच. या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरच्या मंदिरातील प्रवेशाचे हिंदू स्त्रियांचे व हाजी अलीच्या दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणून पुढे झालेल्या मुस्लिम स्त्रियांचे सगळ्या उदारमतवादी व पुरोगामी भारतीयांनी स्वागतच केले पाहिजे. सनातनी माणसे फार हटवादी असतात. त्यांना कोणतेही नवे पाऊल चांगले दिसत नाही. ते पुढे आले तर त्यात बेड्या अडकविण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो. शनी मंदिरात स्त्रियांनी प्रवेश केल्याने शनी देवाचे पावित्र्य अडचणीत येत नाही कारण चांगल्या व पुढे पडणाऱ्या पावलात बेड्या अडकविणारा देव वा अल्ला नसतो. त्याच्या नावाने आपली पुरोहितशाही वा मौलवीपण मिरविणारेच तसली कामे करीत असतात. एक बाब मात्र येथे महत्त्वाची आणि विशेषत्वाने नोंदविण्याजोगी आहे. आपल्या धार्मिक वा सामाजिक अधिकारांसाठी मुस्लिम स्त्रियांनी आंदोलनाचे पाऊल उचलणे ही गोष्ट भारतात तरी प्रथमच घडत आहे. भारतातील स्त्रियांच्या सबलीकरणाच्या व हक्कांच्या प्रस्थापनेसाठी लढणाऱ्या संघटना प्रामुख्याने हिंदू समाजातच आहे. हमीद दलवार्इंनी मुस्लिम स्त्रियांसाठी उभारलेल्या अशा आंदोलनांना अतिशय अल्पसा प्रतिसाद मिळाला. उलट त्यांच्या विरोधातच धर्मगुरुंनी मोठाले मोर्चे संघटित केलेले देशाने पाहिले. हमीद भार्इंना मुस्लिम कब्रस्तानात जागा मिळू न देण्याएवढे हे प्रतिगामी आंदोलन मोठे आणि दुष्ट होते. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याहून मुस्लिम समाजात बदल घडविणे जास्त अवघड व जिकिरीचे काम आहे. मात्र पुरोगामी चळवळींना विरोध करणाऱ्या सर्वच धर्मातील सनातन्यांनी एक गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. त्यांचे विजय नेहमीच अल्पजीवी असतात. याउलट पुरोगामी आंदोलनाचे पहिलेच पाऊल महत्त्वाचे असते. पुढची पावले मग आपोआपच पडत राहतात.